मुंबई : कोरोनाने देशात थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. पण हा लॉकडाऊन रोजंदारी, मजूर, शेतकऱ्यांसाठी घातक ठरला. अनेक नोकरदरांनी आपला रोजगार गमावला. या दरम्यान महाराष्ट्रातून विविध राज्यातील मजूर आपल्या गावी परतल्याने राज्यात मजुरांची कमतरता भासत आहे. काहींना काम नसल्याने बेरोजगार राहावे लागत आहे. या संकटाच्या काळात कौशल्य विकास विभागाच्या कामामुळे १७ हजार जणांना रोजगार दिल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून यासर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात.
अशाप्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६० तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार ०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे.
Published on: 28 July 2020, 06:54 IST