1. बातम्या

1083 लाख टन ऊस गाळप तर 113 लाख टन नवे साखर उत्पादन

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
3 जानेवारी 2019 पर्यंत देशभरात 481 साखर कारखाने कार्यरत झाले असून त्यांनी 1083 लाख टन ऊस गाळप करून 113 लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशाचा सरासरी साखर उतारा 10.44 टक्के नोंदला गेला आहे. यामध्ये महाराष्ट्राने 441 लाख टन गाळप व 46 लाख टन साखर उत्पादन करून आघाडी घेतली आहे.गतवर्षीच्या तुलनेत 45 लक्ष टन गाळप व 6 लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.

महाराष्ट्राच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशाने 308 लाख टन गाळप व 34 लाख टन साखर उत्पादन करुज दुसरा क्रमांक मिळविला आहे. कर्नाटक मध्ये 194 लाख टन गाळप व 20 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या पाठोपाठ गुजरात 46 लाख टन गाळप व 4.5 लाख टन साखर उत्पादन  करून चौथ्या स्थानावर आहे. हंगाम अखेर देशपातळीवर जेमतेम 300 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज असून त्यात उत्तर प्रदेशात 115 लाख टन, महाराष्ट्रात 90 लाख टन, कर्नाटकात 35 लाख टन नवे साखर उत्पादन होण्याचा ताजा अंदाज असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

हंगाम सुरुवातीचा देशपातळीवरील 104 लाख टन शिल्लक साखर साठा व 300 लाख टनचे नवे उत्पादन लक्षात घेता विक्रमी 404 लाख टन अशी उपलब्धता असेल ज्यातून 260 लाख टन स्थानिक खप व 30 लाख टन ची निर्यात लक्षात घेता सप्टेंबर 2019 अखेर देशपातळीवरील शिल्लक साखरेचा साठा 114 लाख टन अशा विक्रमी पातळीवर राहण्याचे अंदाजित आहे. याच्या परिणाम स्वरूप स्थानिक साखर दरावरील दबाव वर्षभर राहण्याचे संकेत आहेत.

सध्याचा साखर उत्पादन खर्च सरासरी 3,500 रु. प्रति क्विंटल असल्याने व साखरेची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या 2,900 रु. प्रति क्विंटल या न्यूनतम पातळीवर पोचली असल्याने प्रति क्विंटल विक्री मागे 600 रुपयाचे नुकसान साखर कारखान्यांना होत आहे व त्यामुळेच त्याना उसाचा किमान दर देणे अशक्यप्राय झाले आहे. 

आजमितीला महाराष्ट्रातील ऊस थकबाकी 3,500 ते 4,000 कोटीच्या घरात पोहोचली असून शेतकऱ्यांप्रती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थीची जाणीव माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 20 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून लक्षात आणून दिली आहे व त्यावर तातडीने काही उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे असेही श्री. नाईकनवरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters