News

चिखली तालुक्यायातील भरोसा येथे गोठ्यासमोरील कंपाऊंडमधील 10 बकऱ्या लांडग्यांनी ठार केल्या आहेत. ही घटना रविवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Updated on 12 April, 2021 2:18 PM IST

चिखली तालुक्यायातील भरोसा येथे गोठ्यासमोरील कंपाऊंडमधील 10 बकऱ्या लांडग्यांनी ठार केल्या आहेत. ही घटना रविवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

भरोसा येथीक अल्पभूधारक शेतकरी समाधान सदाशिव थुट्टे यांनी शेतीला जोड धंदा म्हणून स्वतःच्या शेतात गट नंबर 319 मध्ये गोठा बांधून तेथे शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. भरोसा शिवारात पाटाचे पाणी सुटत असल्याने येथे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, बाजरी, मकाची पेरणी केलेली आहे. समाधान थुट्टे यांच्या शेतातही मकाची पेरणी केलेली असल्यामुळे रात्री रोही हे वन्यप्राणी शेतीचे नुकसान करू नये म्हणून शेतकरी शेतात जागलीवर असतात. थुट्टे हेसुद्धा इतर शेजारच्या शेतकऱ्यांसोबत जगलीवर होते. सकाळी उठल्यानंतर जनावरांचा व शेळ्यांना कुटार टाकून ते गावात निघून गेले असता मकाच्या शेतात दडून बसलेल्या तीन ते चार लाडग्यांनी टिनाच्या फटीतून गोठ्या समोरील कंपाऊंडमध्ये प्रवेश केला.

 

आतील शेळ्यावर हल्ला चढवला. शेळ्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतकरी समाधान थुट्टे यांच्या गोठ्याकडे धावले पण तोपर्यंत लांडग्यांनी लहान मोठे असे 6 बोकड आणि 4 शेळ्या ठार केल्या होत्या. लोकांचा आवाज ऐकून वन्यप्राणी शेजारच्या मकाच्या शेतात पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन अधिकारी युवराज रंगतवान, तलाठी हरीभाऊ उबरहंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

 

यावेळी साक्षीदार म्हणून पोलीस पाटील लक्ष्मण लेंढे, संतोष थुट्टे, सागर थुट्े, रघुनाथ थुट्टे, समाधान धोडगे उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर देण्यासह तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे भरोसा येथील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

English Summary: 10 goats killed in wolf attack at Bharosa; Loss of Rs. 90,000
Published on: 12 April 2021, 02:18 IST