मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणात 90 टक्के पाणीसाठा झाला असून 31 वर्षानंतर प्रथम जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत व त्या माध्यमातून 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. जर आकडेवारीचा विचार केला तर 30 जुलै 1991 ला जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते.
जायकवाडी धरण भरल्यामुळे आता मराठवाड्यातील बीड, परभणी तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील एक लाख 84 हजार हेक्टरला फायदा होणार आहे. गेल्या चार वर्षापासून जायकवाडी धरण सलग भरत असून मागच्या वर्षी 29 सप्टेंबरला जायकवाडी धरणातून दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते.
36 हजार 129 क्युसेक्स पाण्याची आवक
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे हंगाम देखील उत्तम येणार असून सोमवारी संध्याकाळी जायकवाडीत 36 हजार 129 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून त्यामुळे गोदापात्राच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी विसर्ग वाढविण्यात येणार असून लोकांनी गोदावरी पात्रात तसेच काठावर जनावरे सोडू नयेत.
तसेच येणाऱ्या काळासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून जायकवाडीतून आठ दिवसापासून धरणाच्या जलविद्युत केंद्रातून 1589 उजव्या कालव्यातून 600 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात अवघा 35 टक्के पाणी साठा होता.
Published on: 26 July 2022, 01:29 IST