News

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी या गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनी स्थापन केली. मात्र या कंपनीला दुबई येथील व्यापाऱ्यांनी १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांना गंडा घातला आहे.

Updated on 19 March, 2022 2:17 PM IST

केंद्र सरकारच्या नियमन मुक्त धोरणाने अनेक शेतकऱ्यांना चांगले बळ मिळाले आहे. त्यामुळे काही शेतकरी एकत्र येऊन शेतमाल संबंधित व्यवसाय करू लागले आहेत. तर स्वतः शेतकरी आपल्या मालाचा व्यापार करण्याचे धाडस करत आहे. मात्र काही शेतकऱ्यांना हा प्रयोग मोठा धक्का देऊन गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी या गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनी स्थापन केली. मात्र या कंपनीला दुबई येथील व्यापाऱ्यांनी १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांना गंडा घातला आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फार्म रूट कंपनी एल. एल. सी. या शेतकरी कंपनीची स्थापना करून या मार्फत परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असलेल्या केळी, द्राक्ष व कांदे या पिकांची निर्यात दुबईला सुरु केली होती. या कंपनीत संतोष बापू भोर, सुहास शांताराम नेहरकर, देवेंद्र पानसरे, दीप्ती जाधव, भगवान काकडे, हरिश्चंद्र पवार, सुभाष जगताप, शांताराम नेहरकर, बापू भोर, इंदूबाई नेहरकर, सुधीर नेहरकर, ज्ञानेश्वर नेहरकर, सुरेखा ज्ञानेश्वर नेहरकर असे एकूण १३ शेतकरी आहेत.

या कंपनीची स्थापना करून या शेतकऱ्यांकडून शेतमाल दुबई येथील कंपन्याना निर्यात केला जातो. या कंपनीतर्फे जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत केळी, द्राक्ष, कांदे आदी शेतमाल दहा कंपन्याना निर्यात केला. शेतमाल दुबईला पोहचल्यानंतर शेतमालाची तीस टक्के रक्कम व पंधरा दिवसांनी उर्वरित रक्कम देण्याचे कंपनी सोबत ठरले होते. शेतमाल पोच झाल्यानंतर दुबईच्या कंपन्यांनी शेतमालाची तीस टक्के रक्कम शेतकरी कंपनीला दिली.

असे असताना मात्र, उर्वरित १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची रक्कम वारंवार मागणी करूनही सदर कंपन्यांनी दिली नाही. शिवाय सदर कंपनीच्या चालकांनी मोबाईल नंबर बंद केला. शेतकऱ्यांनी दुबई येथे सदर कंपनीचा शोध घेतला कंपनीचे कार्यालयही बंद असल्याचे आढळुन आले. यावेळी फसवणूक झाल्याचे निश्चित झाल्याने शेतकऱ्यांच्या वतीने संतोष बापू भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी जबेल अल नज्जर फूड स्टफ ट्रेडिंग एल. एल. सी. व सदर कंपनीचा मालक व कामगार दुबई, दुर्गा प्रसाद कुणा, अब्दुल रहेमान अब्दुला इब्राहिम शराफ, आनंद देसाई, सना खान, मुंबई, फॅनॅस्को फूड स्टफ ट्रेडिंग एल. एल. सी. व त्याचे मालक दुबई, अब्दुल नासिर पडिकमनील, अल्ताश हुसेन, सेगलावी फूड स्टफ अँड बेव्हरेज ट्रेडिंग एफ. झेड. या कंपनी व त्याचे मालक दुबई तसेच मंगेश गांगुर्डे रा. नाशिक जि नाशिक महाराष्ट्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर याबाबत नारायणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ठरलं!! आता मराठवाड्याच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न पश्चिम महाराष्ट्र मिटवणार, बैठकीत झाला मोठा निर्णय..
घोषणा फक्त विधानसभेत, शिवारात मात्र विजतोडणी सुरूच, सरकारच्या मानत नेमकं आहे तरी काय?
आंबा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!! पणन मंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय..

 

 

English Summary: 1 crore fraud of farmers selling goods to Dubai, office also disappears ..
Published on: 19 March 2022, 02:17 IST