1. फलोत्पादन

मोसंबी फळबागेमधील फळमाशीचे नियंत्रण

KJ Staff
KJ Staff


मोसंबी फळबागेमध्ये फळे पक्वतेच्या वेळी फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. फळमाशीच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे फळाची गळ होऊन फळामधून दुर्गंधीयुक्त रस बाहेर पडतो परिणामी या फळांना बाजारभाव चांगला मिळत नाही. तसेच निर्यातक्षम दर्जा देखील राहत नाही. मोसंबीमध्ये बॅक्ट्रोसेरा झोनाटा आणि बॅक्ट्रोसेरा डोर्सालीस या फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक पहावयास मिळतो.

ओळख आणि जीवनक्रम:

 • मोसंबी फळबागेतील फळमाशी घरातील माशीप्रमाणे असते. परंतु मोसंबी फळावरील फळमाशी घरातील माशीपेक्षा आकाराने मोठी दिसते व फळमाशीचा रंग पुढील भागात काळसर असून मागील भाग तपकिरी रंगाचा असतो.
 • फळमाशीचा मध्यभागावर सोनेरी पिवळसर रंग छटा दिसते.
 • मोसंबी फळमाशीची अळी (मॅगोट/Maggot) दुधी रंगाचे असून दोन्ही भागाकडे (टोके) निमुळती असतात.
 • अळी अंड्यातून बाहेर पडते. साधारणत: हिरवा रंगातून पिवळसर रंग येण्याचा वेळेस (पक्वतेवेळी) मादी अंडनलीकेच्या सहायाने फळाच्या साली खाली अंडी घालतात.
 • अळीची अवस्था साधारणत: 8-15 दिवसांची राहते.
 • अळी नंतर कोषावस्था असते पूर्ण वाढलेल्या अळ्या कोषावस्थेत जातात कोषावस्था 10-12 दिवसांची असते.
 • कोषावस्थेतून फळ माशीचे प्रौढ कीटक बाहेर पडतात. साधारणत: दिड महिन्यात फळ माशीचा जीवनक्रम संपतो.

नुकसानीचा प्रकार:

फळमाशीची मादी फळाच्या सालीखाली अंडी घालते आणि अंडी उबवण होते. अंडी उबवण झाल्यानंतर अळ्या फळाच्या रसावर आणि गरावर उदरनिर्वाह करतात. फळ पक्वतेच्या वेळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमणात आढळतो आणि नुकसान पातळी देखील जास्त असते. मादी माशीच्या अंडी घालण्याच्या वेळेस अंडाशय फळांच्या सालीमध्ये खुपसल्यामुळे फळ त्या ठिकाणी पिवळसर बनते, आणि फळ दाबल्यानंतर दुर्गंधीयुक्त रस बाहेर येतो. शेवटी इजा झालेल्या ठिकाणी काळपट डाग पडतो आणि बुरशीकारकांचा प्रादुर्भाव वाढतो आणि फळ गळून पडते आणि कालांतराने सडते.


फळमाशीचे नियंत्रण:

फळमाशी फळाच्या अंतर्गत भागात राहत असल्यामुळे कोणत्याही किटनाशाकाचा फळमाशीवर परिणाम दिसत नाहीत. फळमाशीचा प्रादुर्भाव साधारणता: फळ पक्त्वेच्या वेळी वाढत असल्यामुळे तोडणीच्या वेळी फळावर कीटकनाशकाची फवारणी केल्यास कीटकनाशकांंचा उर्वरित अंश फळामध्ये राहिल्यास फळे खाण्यासाठी तसेच निर्यात करण्यासाठी योग्य नसतात. अशी फळे आंतरराष्ट्रीय निर्यातवेळी फळ क्वारंटाईन कायद्यानुसार नाकारली जातात.  

फळमाशीच्या निंयत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण:

 • फळमाशीचा जीवनक्रम विस्कळीत करण्यासाठी कोषावस्था नष्ट करावी, त्यासाठी जमिनीची सारखी वखरणी करावी. आणि कोषावस्था सूर्यकिरणे व मित्रकिडी तसेच पक्षांद्वारे नियंत्रित करावेत.
 • फळ पक्वतेच्यावेळी प्रादुर्भाव वाढल्यामुळे फळगळ वाढते अशा फळांमध्ये फळमाशीची जीवनक्रिया चालूच राहते म्हणून गळलेली फळे बागेत न ठेवता ताबडतोब, वेळोवेळी नष्ट करावीत.
 • मादी अंडी निर्मिती करते असते, म्हणून नरांची संख्या नियंत्रण करण्यासाठी रक्षक सापळ्यांचा उपयोग करावा बागेच्या चार कोपऱ्यात चार आणि बागेच्या मध्यभागी असे रक्षक सापळे लावून ठेवावेत.
 • फळमाशीचा प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी वाढत असतो परंतु या किडीचा जीवनक्रम विस्कळीत करण्यासाठी फळ येण्याच्यापूर्वीच रक्षक सापळे लावावेत.
 • तुळसीच्या पानांमध्ये मिथाईल युजेनॉल हा घटक असतो म्हणून बागेच्या चारही बाजूने तुळसीची लागवड करावी जेणेकरून फळमाशी या सुगंधाकडे आकर्षित होईल.
 • फळमाशीच्या नियंत्रणासाठी फळ पक्वतेच्या आणि काढणीच्या अगोदर दोन महिन्यापासून साखरेच्या पाकांमध्ये (पाक) 1% मिथाइल युजेनॉल (20 एम. एल./मी.) आणि 4-5 थेंब डी.डी.व्ही.पी (DDVP) मिसळून प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवावे.
 • फळमाशीसाठी आमिष तयार करण्यासाठी प्लॅस्टिकच्या डब्ब्या घेऊन दोन बाजूला 1-2 सें.मी. आकारचे छिद्र पडावेत. डब्बीच्या तळाशी आमिष ठेवावीत आमिष तयार करण्यासाठी मिथाईल युजेनॉल 20 मिली. प्रति. लीटर पाणी घेऊन यामध्ये डी.डी.व्ही.पी (DDVP) किटकनाशकांचे 4-5 थेंब टाकावेत. आणि या आमिष द्रावणामध्ये कापसाचे बोळे बुडवून डब्ब्याच्या तळाशी ठेवावीत आणि 4-5 डब्ब्या बागेच्या चारही कोपऱ्यात ठेऊन मध्यभागी एक ठेवावी 10-15 दिवसातून एक वेळा आमिष द्रावण बदलावे आणि मेलेल्या फळमाशी बाहेर काढून टाकाव्यात.

डॉ. साबळे. पी. ए 
(सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)
8408035772

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters