तब्येत बरी नसली किंवा आपल्याला काही आजार झाल्यास आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला तपासतात. आजारानुसार आवश्यक असल्यास आपल्याला इंजेक्शन दिलं जातं. सहसा प्रत्येकाच्या मनात इंजेक्शन बद्दल थोडी भीती असतेच.मनात एक प्रश्नही उद्भवतो की, डॉक्टर आपल्याला दंडावर इंजेक्शन देतील की कमरेत? कधी इंजेक्शन हे हातावर, तर कधी कमरेवर दिलं जातं. असं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. इंजेक्शन कुठे द्यायचं हे डॉक्टर कसं ठरवतात? याबद्दलचं कुतूहल अनेकांच्या मनात असतं. त्यामागचं विज्ञान समजून घेऊ या.
इंजेक्शनचे अनेक प्रकार आहेत. त्यात इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर, सबक्युटानियस आणि इंट्राडर्मल या प्रकारांचा समावेश आहे. इंजेक्शन मध्ये असलेल्या वेगवेगळ्या औषधांच्या प्रकारा नुसार इंजेक्शन कुठे द्यायचं, हे ठरवलं जातं.इंट्राडर्मल इंजेक्शन मनगटा जवळच्या भागात दिलं जातं. त्वचेच्या अगदी खालच्या बाजूला हे इंजेक्शन टोचतात. या इंजेक्शनचा उपयोग क्षयरोग आणि अॅलर्जी तपासण्यासाठी केला जातो.
इंट्रामस्क्युलर इंजेक्शन कमरेवर दिलं जातं. काही औषधं ही स्नायूंद्वारे शरीरात पोहोचवणं आवश्यक असतं. यात अँटिबायोटिक आणि स्टिरॉइड्सच्या इंजेक्शनचा समावेश असतो. त्यामुळे अशी इंजेक्शन्स स्नायू मध्ये अर्थात इंट्रामस्क्युलर दिली जातात. या इंजेक्शनच्या प्रकाराच्या नावावरूनच ते शरीराच्या कोणत्या भागात दिलं जाणार आहे, ते स्पष्ट होतं.इंट्राव्हेनस इंजेक्शन्स हातावर दिलं जातं. या इंजेक्शनद्वारे औषध थेट रक्तवाहिनीत पोहोचवलं जातं. हातातल्या शिरे मध्ये इंजेक्शन दिल्याने ते थेट रक्ता मध्ये जाते. औषध थेट रक्ता मध्ये गेल्याने शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतं आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. सहसा इंजेक्शन हातावर दिल्या नंतर त्रास कमी होतो.
सबक्युटॅनिअस इंजेक्शन एक तर हातावर आणि मांडीच्या वरच्या भागावर किंवा ओटीपोटात दिलं जाते. इन्सुलिन आणि रक्त पातळ करणारी औषधं या इंजेक्शन द्वारे दिली जातात. आधीच्या दोन्ही इंजेक्शनच्या तुलनेत या इंजेक्शन मध्ये कमी वेदना होतात. हे इंजेक्शन त्वचेच्या खालच्या भागात आणि स्नायूंच्या ऊतींच्या वरच्या भागात दिलं जातं.'टीव्ही 9 हिंदी' च्या रिपोर्ट नुसार एकूणच इंजेक्शन शरीराच्या कोणत्या भागावर द्यायचं हे रुग्णाला कोणत्या आजाराने ग्रासलं आहे यावर आणि तो आजार बरा करण्यासाठी कोणती औषधं देणं गरजेचं आहे, त्यावरून म्हणजेच रुग्णाला देण्यात येणाऱ्या औषधा वरून ठरवलं जातं.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
Published on: 08 May 2022, 11:56 IST