चवळी हे कडधान्य वर्गातील पीक असून घरामध्ये डाळीच्या रूपात आणि उसळच्या रूपात मोठ्या प्रमाणावर चवळीचा वापर केला जातो. ती खायला स्वादिष्ट आणि रुचकर लागते. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून चवळीला ओळखले जाते. चवळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेल्या फायबरमुळे वजन कमी करण्यास देखील ती उपयुक्त आहे. अशा अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे चवळीचे आहेत. या लेखात आपण अशाच काही महत्त्वपूर्ण आरोग्यदायी फायद्यांविषयी माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Tips: कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
चवळीचा आहारात उपयोग केल्यामुळे मिळणारे आरोग्याला फायदे
1- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- चवळी मध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये चवळीचा वापर करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये असलेल्या डायटरी फायबरमुळे पचन संस्था सुधारते व शरीरातील पोषक तत्वाचे देखील शोषण व्यवस्थित होते. चवळीच्या आहार घेतल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
2- हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम- चवळीमध्ये विटामिन बी 1 म्हणजेच थायमिनचे प्रमाण भरपूर असल्यामुळे निरोगी हृदयासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हे जीवनसत्व हृदयाच्या समस्येपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. चवळीमध्ये असलेल्या फ्लेवोनॉड्स मुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच चवळीमध्ये असलेल्या फायबर मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील संतुलित राहते. चवळीचा आहारात समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
3- रक्ताभिसरणासाठी उपयुक्त- ज्या लोकांना ॲनिमिया आहे अशा लोकांच्या उपचारांमध्ये चवळीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. तसेच लोहाची कमतरता असल्यामुळे होणारा अशक्तपणा तसेच पोटदुखी, थकवा आणि खराब पचनक्षमता यासारख्या समस्या चवळीमुळे कमी होतात. यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ॲनिमियाची समस्या देखील दूर होते आणि शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
4- चांगली झोप येण्यासाठी महत्त्वपूर्ण- चवळीमध्ये ट्रिपटोफॅनचे प्रमाण जास्त असते. जे चांगली झोप येण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला देखील झोप न येण्याची समस्या असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी चवळीचे सॅलड खाणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तम प्रकारची झोप येईल आणि आराम देखील मिळेल.
नक्की वाचा:गुडघेदुखीने उठणं व बसणंही होईल कायमचं बंद, चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
Published on: 01 November 2022, 07:48 IST