नुकताच संक्रात हा सण होऊन गेला या सणाला तिळाबरोबरच गुळाला देखील विशेष महत्त्व असते. गूळ (Jaggery) हा एक गोड पदार्थ असून तो उष्ण असल्या कारणास्तव हिवाळ्यात गुळाचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. अनेक पदार्थांमध्ये साखरेला पर्याय म्हणून गूळ वापरला जातो. गुळाचे भरपूर प्रकार आहेत, परंतु त्यामध्ये मुख्यतः ऊसाचा गूळ मोठ्याप्रमाणात आहारात घेतला जातो.
सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळ यामध्ये फरक आहे. सेंद्रिय गुळाची निर्मिती करत असताना उसाची लागवड ही सेंद्रीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर गूळ निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायन वापरले जात नाही.
अशा पद्धतीने बनवलेल्या गुळाला सेंद्रिय गूळ म्हटले जाते. असा गूळ दिसायला चॉकलेटी, काळसर आणि मऊ असतो. केमिकल फ्री गुळात उसाची लागवड रसायनिक खते वापरून केली असली तरी चालते, पण गुळाची निर्मिती करताना मात्र त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. साहजिकच सेंद्रिय गुळाच्या तुलनेते केमिकल फ्री गुळाची गुणवत्ता कमी असते.
गुळाचे प्रकार
गुळात मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस यांसारखे शरीरास आवश्यक घटक मुबलक प्रमाणात असतात. औषधी गुणधर्म असलेल्या गुळाचे प्रकार आणि फायदे खालील प्रमाणे आहेत.
१) ऊसाचा गूळ-
ऊसाचा गूळ हा ऊसाच्या रसापासून बनवला जातो. या गुळात कॅल्शियम, लोह, जस्त आणि फॉस्फरस इ. घटक असतात. हा गूळ ऍनिमिया (Anemia), यकृताचे आजार यासाठी फायदेशीर असून या गुळाने रोगप्रतिकारकशक्ती (Resistance power) वाढते.
२) नारळ गूळ –
नारळ गूळ हा नारळाच्या आंबलेल्या रसापासून बनवला जातो. हा गूळ थोडा कडक असून दक्षिण भारतात हा गूळ प्रसिद्ध आहे. नारळाच्या गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मुबलक प्रमाणात आढळतं जे आपल्या शरीरातील अॅनिमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. याशिवाय या गुळात अँटी-बॅक्टेरिअल (Anti- Bacterial) गुणधर्म आहेत जे खोकला आणि सर्दी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या गूळ रक्तदाब नियंत्रणात (In control) ठेवण्यासही मदत करतो.
३) खजूर गूळ –
खजुराच्या अर्कापासून खजूर गूळ बनवला जातो. या गुळाला पाताली गुळ’ असंही म्हणतात. पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडसारख्या भारतातील पूर्वेकडील राज्यांमध्ये खजूराचा गूळ खूप लोकप्रिय आहे. खजूराच्या अर्कामध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, लोह आणि कॅल्शियम यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक (Nutrients) असतात. हे घटक आपल्या शरीरातील अनेक पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यास सक्षम असतात. खजूरापासून बनवलेल्या गुळाच्या सेवनानं मायग्रेनचा त्रास बरा होतो.
याशिवाय पामिला आणि ताडीच्या रसापासून देखील गूळ बनवला जातो ,परंतु हे गुळाचे अत्यंत दुर्मिळ प्रकार आहेत. सध्या हिवाळ्यामध्ये गुळाचे सेवन केल्यास आपले आरोग्य उत्तम राहू शकते.
Published on: 09 March 2022, 01:36 IST