Health

पूर्वीपासून व्यायाम म्हटलं की जोर आणि बैठका यांचाच विचार केला जातो.अनेक ठिकाणी हा व्यायाम वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात.

Updated on 28 January, 2022 6:08 PM IST

पूर्वीपासून व्यायाम म्हटलं की जोर आणि बैठका यांचाच विचार केला जातो.अनेक ठिकाणी हा व्यायाम वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात.खरं तर आरोग्याच्या दृष्टीने काही पद्धती जरा घातकच आहेत.पण असा विचारही कोणाच्या मनात येत नाही.त्यापैकी काही प्रकार मी आता देत आहे.आपण जर अशा प्रकारे बैठका करत असाल तर आता थोडा बदल करायला पाहिजे.बैठक मारताना बरेच जण पूर्ण खाली बसतात.खाली बसताना टाचा वर करतात.अनेकजण बैठका करताना टाचेखाली लाकडाच्या पट्या ठेवतात तर काही ठिकाणी व्यायामाच्या प्लेट्सही ठेवल्या जातात.या सर्व पद्धती गुडघ्यांसाठी घातक ठरल्या आहेत.शरीरशास्रनुसार खाली बसताना जर टाच वर उचलली तर मांडयांचे मसल्स गुडघ्याला नीट आधार देत नाहीत.यामुळे हळूहळू गुडघ्याच्या कुरकुरी सुरु होतात.व बघता बघता गुडघे निकामी होऊन बसतात.दुसरे म्हणजे आपण खाली बसत असताना आपले गुडघे पाऊलाच्या पुढे जराही जाता कामा नयेत.गुडघ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हा नियम सर्वांनी पाळलाच पाहीजे. 

आता आपण जर पूर्ण खाली बसलो तर गुडघे पावलांच्या पुढे जाणारच.आपण टाचा वर उचलत खाली बसलो तरी गुडघे पुढे जातातच.टाचेखाली लाकडी पट्टी घेतली काय किंवा प्लेट्स घेतल्या काय , आपण गुडघ्याना पाऊलापुढे जाण्यास रोखूच शकत नाही.म्हणून असे प्रकार करणे आपण थांबवायला पाहिजे.मग विचार येतो कशा करायच्या या बैठका ?हे जाणण्यासाठी पुढील कृती करून पहा. इथे सांगावेसे वाटते की पूर्वीच्या बैठका म्हणजे आताचे स्कॉट होय.प्रथम दोन पायामध्ये खांद्याइतके अंतर ठेऊन उभे राहावे.दोन्ही हात समोर खांद्याना समांतर ठेवावेत.श्वास घेत कंबरेला मागे घेत अर्धवट खाली बसावे.खाली बसताना,आपण खुर्चीत बसताना कसे कंबरेला मागे नेतो तसे करावे.पाठीचा कणा अगदी सरळ, ताठ, एका रेषेत असल्यासारखा ठेवावा.व श्वास सोडत पुन्हा वर पूर्ववत यावे.वर येताना जास्तीत जास्त वजन टाचेवर ठेवावे.वर आल्यावर पाय गुडघ्यात थाठ न होऊ देता किंचित बेंडच ठेवावेत.असे केल्याने मांड्या सतत तणावाखाली राहतात.असे वीस ते पंचवीस वेळा करावे.आपण बरोबर करतो की नाही हे पाहण्यासाठी आपण साईडने आरशात पहावे. 

अर्धवट खाली बसले असता आपली पावले (खास करून टाचा ) गुडघे व खांदे उभ्या एका रेषेत दिसायला पाहिजेत.तरच आपण बरोबर करतो असे समजावे.बॅकला कंबरेत आर्च व्हायला देऊ नये.अशा पद्धतीने जर स्कॉट सर्वानीच केले तर गूडघ्याचे आरोग्यही सुधारते व मांड्या सुद्धा बळकट होतात.आपण जर हेच स्कॉट बरबेल अथवा डंबेल किंवा स्मिथ मशीनवर करत असाल तर हाच नियम पाळा. पूर्ण खाली बसने शक्यतो टाळा.पूर्ण खाली बसल्याने जास्त प्रमाणात स्नायू वापरले जात असले तरी कंबरेसाठी मात्र फार मोठा अपघात होऊ शकतो.आज अधिकांश मसलबिल्डर किंवा वेट लिफ्टर कंबरेच्या व्याधीने हैराण आहेत.अनेकांना व्यायाम अर्धवट सोडून द्यावा लागला आहे.पूर्ण खाली बसने खरच कंबर मोडून घेण्यासारखे आहे.म्हणून मित्रानो साइन्टिफिक पद्धतीनेच स्कॉट करा व आपल्या मांड्या कुठल्याही अपघाताशिवाय मजबूत करा.स्कॉट करताना खाली जाताना श्वास घेणे व वर येताना श्वास सोडणे ही क्रिया करायला विसरू नका.हा व्यायाम प्रकार कितीही चांगला असला तरी रोज स्कॉट केल्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते.

रिकवरी न झाल्याने मांड्या तसेच गुडघ्याला इजा पोहोचु शकते. आठवद्यातुन एकदा किंवा दोन वेळाच करावा. करण्यापुर्वी ट्रेनर्सची मदत घ्या.त्यांच्याकडून समजून घ्या.कारण आज फिटनेस विषयात खूप रिसर्च झालेला आहे.आपण नवीन संशोधनाचे स्वागत केले पाहिजे.'मी आधीपासून अशाच बैठका करतो मग आता बदलायची काय गरज आहे'? असे अडमुटे धोरण सोडायला पाहिजे.आपल्याला कोणतीही व्याधी होऊ नये म्हणून हा सर्व प्रपंच आहे.आपल्या मनाने काहीही न करता ट्रेनर्सची मदत जरूर घ्या.फिटनेस विषयातील त्यांचा अभ्यास आपल्या पेक्षा जास्त चांगला असतो.अनेक वेळा आपला अभिमान ट्रेनर्सचे ऐकायला तयार नसतो तरीही मान अभिमान,लहान मोठा वगैरे बाजूला ठेऊन ट्रेनर्स सांगतात तेच करावे.अशाने अपघात हमखास टळतात. नाहीतर गुडघे आणि कंबरदुखी जर मागे लागली की आयुष्यभर पाठ सोडणार नाही हे नक्की.

 

लेखक - दत्ता गायकवाड.

वेलनेस कन्सल्टंट

English Summary: Techniques of baithaka thyes good warm up
Published on: 28 January 2022, 06:00 IST