ज्वारी (इंग्रजी Sorghum bicolor) एक धान्यप्रकार आहे. ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात परभणी मोती, परभणी सुपरमोती, मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्रकार लागवडीत आढळतात. यात 'हायब्रीड ज्वारी' हाही एक प्रकार आहे.
एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते. ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य आहे. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान (अथवा पाणी पुरवठ्याची साधने), खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे गावोगावी त्यात फरक आढळतो. कोरडवाहू खरीप ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० किग्रॅ. असते व दाण्याच्या तीन ते साडेतीन पट कडब्याचे उत्पन्न मिळते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्रॅ. असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १२०० ते १८०० किग्रॅ. असते. भारी जमिनीत ते हेक्टरी ४००० किग्रॅ. पर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते.
ज्वारीमधील आवश्यक घटकांचे प्रमाण :
ज्वारीचे पोषण मूल्ये लक्षात घेता ज्वारीमध्ये (आर्द्रता) ८ ते १० टक्के, प्रथिने ९.४ ते १०.४ टक्के, तंतुमय घटक १.२ ते १.६ टक्के, खनिजद्रव्ये १.० ते १.६ टक्के, उष्मांक ३४९ किलो कॅलरीज, कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) ४७, थायमिन ३७ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅममध्ये आढळतात. ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्यक अमिनो ऍसिड्स मर्यादित प्रमाणात आढळतात.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ज्वारीच्या प्रजाती :
परभणी मोती :
-
मोत्यासारखा टपोरे व चमकदार दाणे.
-
भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
-
पक्व होण्याचा कालावधी १२५ ते १३० दिवस.
-
दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.
-
खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
-
कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी १७ क्विं. व कडबा ५०-६० क्विं.
- बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ३२ क्विं. व कडबा ६०-७० क्विं.
परभणी सुपर मोती :
परभणी सुपर मोती हे वाण ज्वारी व कडब्याकरीता चांगला वाण आहे. तसेच खरीप हंगामातील परभणी शक्ती या वाणात लोह व जस्ताचे प्रमाण इतर वाणापेक्षा अधिक आहे.
ज्वारीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे:
-
कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते त्यामुळे कमी जेवण करून ही पोट भरल्याची जाणीव होते.
-
ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात.
-
ज्वारीमध्ये फायबर्स प्रमाण जास्त असल्याने ते सहज पचन गुणकारी ठरते.
-
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी रोजच्या आहारात समावेश केल्यास गुणकारी ठरते. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास कमी होण्यास मदत होते .
-
किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी लाभदायक ठरते.
-
ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
-
ज्वारी भाकरीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे आरोग्यास खूप गुणकारी ठरतो.
-
ऍनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी ज्वारीचा भाकरीचा खूप फायदा होतो.
-
लाल पेशींची वाढ होण्यासाठी ज्वारीची भाकरी गुणकारी ठरते.
-
साध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारावर मात करण्यासाठी ज्वारीची भाकरी लाभदायक ठरते. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
-
ज्वारीत अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ आढळून येतात,त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
-
ऍसिडिटी त्रास कमी करण्यासाठी रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी.
-
पांढऱ्या ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी व आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
-
रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही.
लेखक -
दिपाली गजमल, डॉ. विजया पवार, एकनाथ शिंदे
अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, ४३१-४०२
मो. ७४४७५०५३२५
Published on: 22 March 2021, 11:49 IST