Health

देशभरात कोरोनाचे रौद्र रूप आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. अनेक आरोग्यविषयक संस्था नागरिकांना सावधगिरी बाळराण्याचा सल्ला देत आहेत. या सर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लोकांना कोरोना काळात आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं, असा सल्ला दिला आहे.

Updated on 11 October, 2021 10:52 AM IST

देशभरात कोरोनाचे रौद्र रूप आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. अनेक आरोग्यविषयक संस्था नागरिकांना सावधगिरी बाळराण्याचा सल्ला देत आहेत. या सर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लोकांना कोरोना काळात आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं, असा सल्ला दिला आहे.

जे लोक संतुलित आहार घेतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, कोरोना महामारीच्या या कठीण काळात, चांगल्या अन्नाचे आणि निरोगी जीवनाचे महत्त्व सर्वांना माहित आहे, त्यामुळे भविष्यात अन्न प्रक्रियेला मोठ्या व्यवसायाची संधी आहे. पालेभाज्यांचे महत्व व त्यांचे पोषण मूल्य सर्वज्ञानीत आहे.

अंबाडी ही भारतात आढळणारी एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. जी पालेभाज्यांच्या प्रकारामध्ये मोडते. अंबाडी हे एक महत्त्वाचे मौल्यवान औद्योगिक पीक बनले आहे, ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. याचे तंतुमय खोड कापड, कागदी लगदा उत्पादनासाठी वापरले जाते. ह्याच्या खोडाव्यतिरिक्त अंबाडीचे पान औद्योगिक उत्पादनांचे स्रोत म्हणून मानले जाते, जसे बायोफार्मास्युटिकल आणि चहा उत्पादन ज्यात भरपूर अँटीऑक्सिडेंट कंपाऊंड असतात. ह्याची पाने ही चवीने आंबट असतात. अंबाडीच्या पानांचा उपयोग हा भाजी बनवण्यासाठी करतात.

पाने कोवळ्या अवस्थतेत असताना त्याची भाजी बनवतात.आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते. त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात. मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणधर्म अंबाडीच्या पानांमध्ये असते. अंबाडीच्या भाजीत आयर्न(लोह), व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6, फोलेट ,  कॅल्शियम,  झिंक आणि अँटीऑक्सिडंटसारखे अनेक पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात.  भरपूर ‘क’ जीवनसत्व असणाऱ्या अंबाडीच्या भाजीत १८ ते २० टक्के तेलाचे प्रमाण असते. 

 

अंबाडीच्या फुलांपासून सरबत, जाम, जेली, मुरब्बा, बियांपासून बेसन, चटणी, मुखवास, पानापासून लोणचे, चाट मसाला, तरवाळलेल्या झाडापासून ताग व त्याद्वारे कागद बनविला जात असून  महाराष्ट्रात  अशा  काही  कंपन्या आहेत ज्या केवळ अंबाडीच्या विविध उत्पादनांपासून वर्षांकाठी लाखो  रुपयांचा व्यवसाय करीत आहे. अंबाडीचे शास्त्रीय नाव – Hibiscus cannabinus आहे, इंग्लिश मधले नाव - Gongura Leaves आहे व हिंदी मधले नाव – गोंगुरा के पत्ते असे आहे.

अंबाडी भाजी खाण्यामुळे आरोग्यासाठी होणारे भरपूर फायदे आहे.

अंबाडी भाजी खाण्याचे फायदे :-

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:- एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच  व्हिटॅमिन सी हा घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यात आणि शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढविण्यात मोठी भूमिका बजावते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते:- अंबाडीची भाजी उच्च रक्तदाब कमी करून नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. अंबाडी भाजीत अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मधुमेहासाठी चांगले: अंबाडी भाजी ही फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे  जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतो, पारंपारिकपणे ही भाजी मकाई, बाजरी आणि नाचणीच्या भाकरीसोबत खाल्ले जाते जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणारे संमिश्रित जेवण आहे.

वजन कमी करते:- अंबाडी हा लो कॅलरीज डायट असून अनेक पोषकतत्वे, व्हिटॅमिन, फायबर्स यामध्ये असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश करू शकता.

महिलांच्या आरोग्यासाठी चांगले:- अंबाडी फॉलिक एसिड आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. लोहाच्या गोळ्यामुळे होणारे बद्धकोष्ठतेचे दुष्परिणामांशिवाय अंबाडी ही वनस्पती कमी करते, व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत असल्याने अंबाडी मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करते आणि जास्त रक्तस्त्राव रोखते. मासिक पाळी दरम्यान नियमित कालावधी साठी अंबाडी चहाच्या स्वरूपात वापरा.

होमोसिस्टीनची पातळी नियंत्रित करते:- होमोसिस्टीन हा रक्तातला एक सामान्य अमिनो आम्ल आहे. होमोसिस्टीनची  वाढलेली उच्च पातळी ही कमी वयात हृदयरोग आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार निर्माण करते. अंबाडी फोलेट आणि व्हिटॅमिन बी 6 चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे जो होमोसिस्टीनची पातळी कमी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते:-बाडीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि फायबर बद्धकोष्ठतेपासून त्वरीत आराम देतात, व्हिटॅमिनचे रेचक गुणधर्म आतड्यांसंबंधी स्नायूंना आराम करण्यास मदत करते.

 

पोट शांत करण्यासाठी:-

अंबाडी पचायला हलकी आणि शिजवायला खूप सोपी आहे. हळूहळू पचण्यायोग्य स्टार्च यामध्ये जास्त आहे, ज्यामुळे आतड्याच्या परिसंस्थेला टिकवून ठेवण्यासाठी आणि पोषण करण्यासाठी अंबाडीची मदत होते. शाकाहारी स्त्रोतांमध्ये कमी विविधतेमुळे आतड्यातील मायक्रोबायोम इकोसिस्टममध्ये अपुरी विविधता येते. हे वृद्धत्वाला गती देऊ शकते, नैराश्याला कारणीभूत ठरू शकते आणि यामध्ये प्रक्षोभक क्षमता आहे. आपल्या आहारात थोडी विविधता आणण्यासाठी या देशी अंबाडीचा समावेश करावा. आदिवासी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, आतड्यांचे आरोग्य मजबूत करण्यासाठी आणि अतिसार टाळण्यासाठी अंबाडीचा वापर करतात. त्याची आंबट चव भूक वाढवते.

केसांच्या आरोग्यासाठी.:-

अंबाड्याच्या भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असते त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी अंबाडी भाजी उपयुक्त असून गळणे, तुटणे या समस्या कमी होतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी:- अंबाड्याच्या भाजीत व्हिटॅमिन A, आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते.

हाडांच्या मजबुतीसाठी:- अंबाडी या खनिज समृद्ध वनस्पतीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आहे. मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या खनिज समृध्द आहारामुळे हाडांचे नुकसान टाळण्यास मदत होते. आणि ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजाराला दूर ठेवते.

हिमोग्लोबिन वाढवते:- या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ह्या भाजीचे सेवन करावे.

अंबाडीची भाजी करताना कोणती काळजी घ्यावी..?

अंबाडीची भाजी ही तांब्याची भांडी, बीडाची भांडी ( ओतीव लोखंड - कास्टआयर्न) किंवा अल्युमिनियमची भांडी यामध्ये करू नये कारण अंबाड्याच्या भाजीत  Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन अपायकारक घटक तयार होत असतो. यासाठी भाजी नॉनस्टिक भांडी किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात करावी.

अंबाडीची भाजी खाणे कुणी टाळावे:- अंबाडीच्या भाजीमध्ये Oxalic acid चे प्रमाण जास्त असते व तो जास्त प्रमाणात शरीरामध्ये गेल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते, त्यामुळे मुतखडाच्या त्रास असणाऱ्यांनी अंबाडीची भाजी खाऊ नये तसेच अंबाडीची भाजी खाल्ल्याने पोटातील आम्लाचे प्रमाण वाढल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पित्ताचा त्रास, अल्सर, त्वचासंबंधित त्रास असणाऱ्यांनीही ही भाजी खाणे टाळावे व गरोदरपणातही ही भाजी खाऊ नये.

 

अंबाडी  वनस्पतीचा वापर:-

1.फुले:- अंबाडी झाडाला सुंदर लाल फुले येतात जी पाण्यात उकळली जाऊ शकतात आणि पोटाच्या आजारांशी लढण्यासाठी वापरली जाऊ शकतात. हा हर्बल चहा एक परिपूर्ण डेटॉक्स पेय असू शकतो. अंबाडीच्या फुलांपासून सरबत, जाम, जेली, मुरब्बा, बियांपासून बेसन, चटणी, मुखवास, पानापासून लोणचे, चाट मसाला, तर वाळलेल्या झाडापासून ताग व त्याद्वारे कागद बनविला जातो.

  1. पाने:- वर्षभर मेघालय ते तामिळनाडू पर्यंत अंबाडीची कोवळी पाने ही स्वादिष्ट म्हणून खाल्ल्या जातात. पावसाळ्यात खाल्ली जाणारी ही एक हिरवी पालेभाजी आहे. अंबाडी आपल्या रोजच्या करी, डाळ आणि लोणच्यामध्ये सहजपणे समाविष्ट केली जाऊ शकते. याची विशिष्ट आंबट चव आहे. खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे चांगले स्त्रोत म्हणून ओळखल्या जाणारी ही भाजी केवळ एक स्वादिष्ट अन्नपदार्थच नाही तर निरोगी देखील आहे. 

3.देठ:- देठ नेहमीच्या करी आणि डाळी बरोबर शिजवले जातात आणि खाल्ले  जातात.

4.बियाणे:- अंबाडीच्या बिया कुचल्या जातात आणि त्यातून तेल काढले जाते ज्याचा वापर विजेच्या दिव्यांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि स्वयंपाकासाठी देखील केला जाऊ शकतो. अंबाडीची बियाणे बारीक करून त्यापासून पीठ बनवता येते, अँटिऑक्सिडेंट क्रियाकलापांसह अंबाडी बियाण्याचे फिनोलिक संयुगे अन्न ऑक्सिडेशन टाळण्यासाठी, अन्नाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करतात.

 

अंबाडी सिरप

साहित्य :

अंबाडीचे बोंडे, साखर, सायट्रीक अॅसीड, पाणी आवश्यकतेनुसार..

कृती :- सर्वप्रथम अंबाडीच्या बोंड्या घेवून धुवून स्वच्छ कराव्या व बीया वेगळ्या कराव्या. ह्या बोंड्या एका पातेल्यात घेवून नरम होईपर्यंत शिजवाव्या व नंतर मिक्सर च्या साहाय्याने त्याचा गर तयार करावा. त्यानंतर पाक तयार करण्यास ठेवावा व त्यात सायट्रीक अॅसीड व दोन वेळा विभागुन साखर टाकून त्याचा ब्रीक्स 70° Brix मिळवावा. पाक थंड करुन त्यात अंबाडीचा ज्युस मीक्स करावा. त्यानंतर बॉटल निर्जंतूक करुन सीरप भरुन सीलबंद करावे व थंड व कोरड्याजागी साठवणूक करावी.

अंबाडी जॅम

साहित्य:-

अंबाडीचा चोथा, साखर, सायट्रिक ऍसिड आवश्यतेनुसार.

कृती :- सर्वप्रथम अंबाडीचा चोथा एका पातेल्यात घेऊन मंद आचेवर ठेवावा. यामध्ये दिलेल्या प्रमाणातील अर्धी साखर टाकावी नंतर हे मिश्रण ढवळावे. ही साखर विरघळ्यानंतर यामध्ये बाकी उरलेली साखर टाकावी. हे मिश्रण ढवळावे व त्यात आवश्यकतेनुसार सायट्रीक अॅसीड टाकावे, नंतर याचा T.S.S. 68° Brix घ्यावा व जॅम तयार झाला असे समजावे. नंतर हा जॅम निर्जंतूक केलेल्या बॉटलमध्ये भरुन थंड व कोरड्या जागी साठवावा.

अंबाडीपासून चहा:-

साहित्य:- आले, गूळ, पाणी आवश्यकतेनुसार

अंबाडीची पाने उन्हात वाळव्हावीत आणि कोरडी करावीत. त्यात आले आणि गूळ टाकून ,पाण्यात उकळून, ते मिश्रण गाळून घ्यावे आणि चहा म्हणून सेवन करावे.

लेखक -

कु.कांचन एन. लेनगुरे

साहाय्यक प्राध्यापक,अन्न सूक्ष्मजीवशास्त्र आणि सुरक्षा विभाग

के.के.वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,नाशिक

Mob No.8600849193

कु.योगिता सु. सवालाखे

साहाय्यक प्राध्यापक,

अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,

सौ वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,पाला, अमरावती.

Mob.no.9404103238

English Summary: Hibiscus cannabinus (Ambadi ) is important to boost the immune system, know the benefits
Published on: 06 October 2021, 07:24 IST