आदिकाळापासून मानव फळे खात आलेला आहे. फळांमध्ये शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ व एंझाइम्स मुबलक प्रमाणात असतात. तसेच फळातील फ्रुक्टोज साखर सहज पचणारी व ऊर्जादायी असते. विविध फळांचे आरोग्यदायी व औषधी गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.
अननस
अननसामध्ये ब्रोमेलिन एंझाइम असते. ते अन्न पचनास मदत करते. प्रथिनयुक्त आहाराचे सहज पचन होण्यासाठी अननसाचा उपयोग होतो. अननसामध्ये ‘क’ जीवनसत्व ४७ मि. ग्रॅ. असते. त्याचबरोबर ६७ टक्के सायट्रिक आम्ल व ३३ टक्के मॅलिक आम्ल असते. ही आम्ले शरीरात उष्णता व ऊर्जा निर्माण करतात. अननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.
आंबा
कैरी व आंबा या दोन्ही अवस्थेत या फळात भरपूर पौष्टिक घटक आढळतात. कैरीत ‘क’ व ‘ब’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. ते स्कर्व्ही या आजारावर उपयोगी ठरते. तसेच पिकलेल्या आंब्यात मॅलिक व टारटारिक आम्ल असतात. आंब्यातील ‘अ’ जीवनसत्व रातांधलेपणावर गुणकारी ठरते.
आवळा
आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्वाचे प्रमाण ६०० मि. ग्रॅ. असते. आवळ्यातील ‘क’ जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास खूप मदत करते. आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील ‘क’ जीवनसत्व जास्त प्रमाणात नष्ट होत नाही. आवळ्यामध्ये क्रोमियम मोठया प्रमाणात असते. यामुळे शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे मधुमेहावर आवळा गुणकारी ठरतो. आवळ्यात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे हाडांच्या आजारावर अराम मिळतो
कलिंगड
कलिंगडामत आद्रतेचे व खनिजांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे तहान भागते तसेच खनिज द्रव्यांची घामाद्वारे होणारी हानी भरून निघते. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक तसेच हृदयविकारावर उपयोगी ठरतो. तसेच कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे जास्त असल्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.
केळे
केळ्यामध्ये जीवनसत्वे, प्रथिने व खनिजे यांचे जास्त प्रमाण असते. केळ्यामध्ये सहज पचणारी साखर असून थकवा जाऊन लगेच उत्साह येतो. केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते त्यामुळे रक्ताक्षय असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे आरोग्यदायी ठरते. तसेच केळ्यामध्ये कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडांचा ठिसूळपणावर केळे गुणकारी ठरते.
खरबूज
खरबूजामध्ये ‘क’ जीवनसत्वाचे प्रमाण २९ मि. ग्रॅ. असते. तसेच आद्रता व खनिजांचे प्रमाणही भरपूर असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.
डाळिंब
डाळिंबाच्या रसामध्ये अँथोसायनिन या रंगद्रव्याचे जास्त प्रमाण असते. ते शरीरात अँटीऑक्सिडंटचे काम करते व शरीरातील फ्री रॅडीकल कमी करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवते तसेच डाळिंबाचा रसातील लोह रक्तातील होमोग्लोबीनचे प्रमाण वाढवते.
पपई
पपई स्वादिष्ट, आरोग्यासाठीही व सहज पचणारे फळ आहे. पपई शक्ती वाढविते. पपईत ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने व तंतुमय पदार्थ भरपूर असतात. ‘अ’ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
द्राक्ष
द्राक्ष मुख्यतः काळी व हिरवी असतात. काळ्या द्राक्षांमध्ये अँथोसायनिन असल्यामुळे औषधी गुणधर्म जास्त असतात. द्राक्षांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. द्राक्षांमध्ये पिष्टमय पदार्थ व फलशर्करा जास्त प्रमाणात असतात. ही फलशर्करा खाल्ल्याबरोबर रक्तात शोषली जाऊन ऊर्जा व उत्साह निर्माण होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी द्राक्षे खावित.
पेरू
पेरुत ‘क’ जीवनसत्त्व २१२ मि.ग्रॅ. असते तसेच ग्लुकोज, टॅनिन अॅसिड या घटकांमुळे जेवण सहज पचण्यास मदत होऊन पचनक्रीया सुधारते. ‘क’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पेरु हा उत्सावर्धक देखील आहे. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते कारण यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात.
संत्रे
संत्र्यात ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. त्यातल्या क जीवनसत्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅल्शीयमचे प्रमाण फक्त संत्र्यात जास्त असते.
सफरचंद
सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात. यात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. तसेच तंतुमय पदार्थ, खनिजे, प्रथिने व आद्रता हे घटकही असतात. यात मॅलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असून ते शरीरातील पचन क्रिया वाढवते. सफरचंदातील ‘क’ जीवनसत्त्व व पेक्टिनमुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होऊन रक्त पुरवठा सुरळीत होतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो.
लेखक:
डॉ. एन. जी. सुरडकर (एम.टेक., नेट, पीएचडी, एफ.एस.ए.एन)
सहाय्यक प्राध्यापक,एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औरंगाबाद
९७६७९१८६०९
डॉ. ए. बी. रोडगे (एम.एस. कॅनडा, एम.टेक., पीएचडी)
प्राचार्य, एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औरंगाबाद
Published on: 12 May 2020, 10:26 IST