Health

आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वीच्या काळी मानव संख्याही आटोक्यात होती तसेच वनस्पती देखील जास्त प्रमाणात होत्या सर्व हवामान ऋतू यांचा समतोल असल्यामुळे जास्त रोगराई नव्हती तसेच शहर व खेडी भाग यामध्ये जास्त फरक नव्हता शुद्ध हवा, पाणी, सुरक्षित पालेभाज्या खाण्यासाठी भेटत असत.

Updated on 03 March, 2020 8:28 AM IST


आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वीच्या काळी मानव संख्याही आटोक्यात होती तसेच वनस्पती देखील जास्त प्रमाणात होत्या सर्व हवामान ऋतू यांचा समतोल असल्यामुळे जास्त रोगराई नव्हती तसेच शहर व खेडी भाग यामध्ये जास्त फरक नव्हता शुद्ध हवा, पाणी, सुरक्षित पालेभाज्या खाण्यासाठी भेटत असत. परंतु आज पाहिले तर निसर्गाचा समतोल बिघडला आहे रोगराई पसरली आहे.

आपल्या सर्वांना असे माहित आहे की, शेतकरी महिला आजारी पडत नाहीत परंतु आज मात्र परिस्थिती खूप वेगळी दिसून येते शेतकरी महिलांमध्येही आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते याचे कारण बदलते हवामान, शेतामध्ये वापरली जाणारी कीटकनाशके तसेच शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी महिला त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. शेतकरी महिलांना रोज पहाटे उठून अंगण झाडणे शेणाने घर व अंगण सारवणे तसेच गुरांचे दूध काढणे ही सर्व कामे आजारी असले तरी करावे लागतात. तसेच आजही शेतकरी महिला आपल्या घरी चुलीवरची स्वयंपाक करतात. चुलीच्या धुरामुळे होणारे फुफ्फुसांचे आजार हे वाढत चालले आहेत.

महिला दिवसभर शेतात बसून खुरपणी इत्यादी कामे करत असतात उन्हात काम करत असताना त्यांना सनस्ट्रोक (उष्माघात) सारखे आजारांना सामोरे जावे लागते यासाठी महिलांनी डोक्यावरती कॉटनचे कापडी रुमाल बांधून काम करावे. काम करताना महिलांनी भरपूर पाणी प्यावे सोबत गुळाचा खडा खावा. आजही खूप शेतकऱ्यांच्या घरी शौचालय सुविधा नाही. महिलांनी आपल्या घरी सांगून शौचालय बांधून घ्यावे कारण दिवसा महिला शौचास जात नाहीत महिलांनी दिवसभर शौचास व लघवीस जाण्यास टाळाटाळ केली तर त्यांना पोटाचे विकार होऊ शकतात. तसेच मुळव्याध किडनी स्टोन (मुतखडा) यांसारखे आजार होऊ शकतात. महिलांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. शेतकरी महिला श्रमापासून विरंगुळा म्हणून तंबाखू मिश्रीचे सेवन करतात. तंबाखू मधील निकोटीन मुळे नायट्रस अमाईन तयार होते.

नायट्रस अमाईन निकोटीन पासून वेगळे होऊन शरीरात पसरतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात यामध्ये जिभेचा, गालाचा, तोंडाचा, अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. शेतकरी महिलांमध्ये मिश्री सेवनाचे प्रमाण जास्त दिसून येते. शेतकरी महिला त्यांच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. स्तनामध्ये गाठी असून त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर देखील असू शकतो. महिलांनी स्तनामध्ये गाठी आढळल्यास महिला डॉक्टरांकडे तपासून घ्यावे. महिलांनी मासिक पाळीच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी मासिक पाळी मध्ये दोन प्रकारचे आजार असतात.

  • डिस्मेनोरिया: म्हणजे मासिक पाळीच्या वेदना होणे मासिक पाळी चालू असताना स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया.
  • मेनोरेजिया: पाळी दरम्यान होणारा दीर्घ रक्तस्राव.

एंडोमेट्रियल कॅन्सर: हा गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात योनीतून रक्तस्त्राव होतो वेळीच लक्षात आल्यास त्यावर उपचार करून बरा होऊ शकतो कर्करोग इस्ट्रोजन चे प्रमाण जास्त असल्यास किंवा ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो.

मासिक पाळीच्या समस्यांवर उपचार:

नियमित व्यायाम, संतुलित आहार, आहारात जास्तीचे लोह कॅल्शियम आणि ब जीवनसत्वाचा समावेश करावा. ओटीपोटावर लव्हेंडर तेल लावणे, रास्पबेरीच्या पाल्याचा चहा पिणे सकस आहार घ्यावा. तसेच स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्त्राव जातो अशा समस्या खूप पाहायला मिळतात यासाठी आयुर्वेदामध्ये घरगुती उपाय खूप सोपे सांगितला आहेत.

वटः शीतो गुरूग्राही कफपित्तव्रपहः l वर्ण्यो विसर्पदाहघ्नः कषायो योनिदोषहृत् ll वटवृक्षाला असलेले धार्मिक पुराणप्रिय महत्वही खूप आहे. हिंदू संस्कृती प्रमाणे वडाच्या पानावर श्रीकृष्ण आरामासाठी पहुडतो असे समजतात. वडाची साल, वडाच्या सालीचा काढा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्त्राव जात असल्यास कमी होतो. पाळीच्या दिवसात आती रक्तस्राव होत असल्यास तो कमी करण्याचा उपयोग होतो. तसेच वाळा, चंदन नागरमोथा याचे पाणी उकळून पिणे. जिरे उकळून पाणी साखर घालून पिणे.

सकस आहाराचा अभाव व अस्वच्छतेमुळे आजार उद्भवतात. वारंवार शिळे अन्न खाणे व अवेळी जेवण. यामुळे शेतकरी महिलांमध्ये कुपोषण होऊन अशक्तपणा, रक्ताशय, गलगंड, पित्ताच्या तक्रारी अल्सर, कंबरदुखी, पाठदुखी, हाडे ठिसूळ (ऑस्टियोपोरोसिस) यांसारख्या आजार होतात. अपौष्टिक आहारामुळे गर्भावस्थेत मातांमध्ये अशक्तपणा, गर्भपात तसेच प्रसूतीत बालमृत्यू व कुपोषित बालकांचा जन्म यासारखे भीषण समस्या उद्भवतात.

आवश्यक आहार: मोड आलेले कडधान्य ताजी फळे, दूध, दही, ताक, तूप यांचा आहारात उपयोग करावा मिश्र कडधान्य यांचा वापर करून सकस व शाकाहार घ्यावा.

जीवनाचे प्रमुख चार गुणधर्म असतात ते म्हणजे अस्तित्व, विकास, अभिव्यक्ती आणि नाश हे चार गुणधर्म पृथ्वी, पाणी, वायु, आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांवर अवलंबून असतात. आयुर्वेद म्हणजे जीवनाचा अभ्यास आयुर म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान ज्यावेळेस आजार उत्पन्न होतो तेव्हा तो प्रथम सर्वात तरल असलेल्या ध्वनी, विचार यांच्या पातळीवर निर्माण होतो. शेतकरी महिला चुलीवरती स्वयंपाक करत असल्यामुळे चुलीच्या धुरामुळे फुफ्फुसांना त्रास होतो. श्वासोच्छवास व्यायाम ध्यानधारणा सर्व आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करून आपण होणारे आजार रोखू शकतो.

शरीरातल्या वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांची श्वासोच्छवास यांचा संबंध असतो हे तिन्ही दोष शरीरातल्या वेगवेगळ्या भागांवर अंमल गाजवत असतात. शेतकरी महिलांना विशेष करून आहाराकडे लक्ष दिले पाहिजे शेतकरी महिलांमध्ये तिखट खाण्याचे प्रमाण जास्त असते या महिला तिखट जेवण करून लगेच उन्हामध्ये कामाला सुरुवात करत असतात. यामुळे पित्ताचा त्रास होतो. प्रभावी शरिराच्या वरच्या भागावर म्हणजेच डोक्यावर होतो. आपल्या शरीरात वात, पित्त, कफ या तीन दोषांचा आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या भागांवर जास्त असतो.

संबंधित जीवनसत्व आणि स्त्रोत:

  • लोह स्त्रोत: हिरव्या पालेभाज्या, डाळी, उसळी, सुकामेवा, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा, चिकन अंडी, मासे दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात.
  • कॅल्शिअम स्त्रोत: दूध चीज हिरव्या पालेभाज्या सुकामेवा चिकन यांचा आहारात वापर करावा.
  • 'ब' जीवनसत्व स्त्रोत: अंडी, दूध, चीज, हिरव्या पालेभाज्या, (फळे: संत्री, केळी, टरबूज, स्ट्रॉबेरी इ.) व द्विदल धान्य.

सर्वेपि सुखिनः सन्तु l सर्वे संतु निरामया:ll ही सदिद्धा घेऊन स्वतःच्या निरोगी आयुष्याला सुरुवात करा पर्यायाने संपूर्ण समाज निरोगी होईल.

लेखक:
डॉ. पूनम सुनील राऊत
(स्वयंसेवक, आर्ट ऑफ लिव्हिंग, नातेपुते)

English Summary: Health care of agriculture woman
Published on: 01 March 2020, 04:22 IST