सोमिनाथ घोळवे
Indian Agriculture : गेल्या चार दिवसांपासून वडील आजारी असल्याने, आज सकाळी वडिलांना फोन करून म्हणालो "कशी आहे तबेत?". वडील म्हणाले “ठीक आहे, टायफॉइड झाला असल्याने, डॉक्टरांनी तीन दिवसांचा कोर्स करायला सांगितला आहे. दोन दिवसांचा झालेत, उद्याचा दिवस पुन्हा दवाखान्यात जाईन”
मी म्हणालो, “हो, जाऊन या. किती पैसे लागले?”. त्यावर वडील म्हणाले, “पहिल्या दिवशी ५७५ रुपये लागले.. दुसऱ्या दिवशी रक्त तपासायला आणि डॉक्टर आणि मेडिकल मिळून १२४० रुपये लागले. आज पुन्हा डॉक्टर आणि मेडिकल मिळून ६८० रुपये गेले. उद्या पुन्हा डॉक्टर आणि मेडिकल मिळून ६८० रुपये जातील. तसेच जास्तीचे मेडिकल दिले तर जास्त जातील”.
दवाखान्यात गेलेल्या पैशांचा मनात हिशोब करत वडिलांना म्हणालो, “एकूण किती पैसे आतापर्यंत दवाखान्यात गेले?”. त्यावर वडील म्हणाले, “ तूच बघना, कर हिशोब आणि सांग किती झाले?”. त्यावर मी मनात आकडे पकडत “३१७५/- रुपये गेले" असे म्हणालो.. मी म्हणालो, “जवळ पैसे आहेत की दिऊ पैसे?”.
त्यावर वडील म्हणाले, “ गेल्या महिन्यात मोदीचे पैसे आले होते, ते सर्व पैसे गेले दवाखान्यात, उलट माझ्याकडील जवळचे पण गेले". वडील "मोदीचे पैसे" म्हणाले, त्यावर मी विचार करत राहिलो. मोदीचे पैसे म्हणजे “पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी” या योजनेतून चार महिन्याला मिळालेले २ हजार रुपये होय.
नोव्हेंबर २०२२ ला दोन हजार मिळाले होते, त्यावर जुलै २०२३ या महिन्यात मिळाले आहेत. ७ महिन्यांनी. अर्थात चार महिन्यातून एकदा मिळायला हवे होते, ते तीन महिने उशिरा मिळाले आहेत. सन्मान निधी योजनेतील पैसे मिळतील या आशेने शेतकरी वाट पहात असतात, पण मिळतात किती? अत्यल्प... एकदा दुखणे (आजारी पडले) आलं, तर दवाखान्याच्या एक वेळेसच्या खर्चाला देखील पुरत नाहीत. दुसरे, सद्यस्थितीत दुष्काळात दवाखान्यात 3 हजारापेक्षा जास्त पैसे खर्च होणे कोरडवाहू कुटुंबातील मोठी बाब आहे... कारण आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबलेला आहे. त्यामुळे हे पैसे आणायचे कोठून हा प्रश्न आहे.
आरोग्य सुविधा चांगली असते, तर खासगी दवाखान्यात पैसे गेले नसते. दुसरे, सन्मान निधीचे मिळालेले पैशांचा उपयोग हा शेतकऱ्यांना आरोग्यावर खर्च करावा लागतोय हे दुर्दैव आहेच. अर्थात ग्रामीण भागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने आशा सन्मान निधी सारखा दिलेला पैसा त्यांच्यासाठी काहीच उपयोगाचा नाही हे दिसून येते.
मी वडिलांच्या बोलण्यावर शांत झालो... नंतर पुन्हा विचारले. “तुम्ही एकटेच आजारो पडलात की इतरही लोक आजारी पडले आहेत”.
त्यावर वडील म्हणाले, “काय सांगू, इतके लोक आजारी पडले आहेत की डॉक्टरचे तोंड पण दिसत नव्हतं. आजारी लोकांचा ऊत आलाय. गावातील सगळ्यांच्या घरी एक-दोन माणसं दुखण्याने पडली आहेत. सगळ्यांना अशीच दुखणी आहेत”
हे ऐकल्यावर मी विचार करायला लागलो. नेमका का होत असेल टायफॉइड? याचा शोध घेतला. तर अनेक कारणे आहेत. पण माझ्या गावात असणारे कारणांचा मागोवा घेतला असता, “दुषित पाणी पिण्याने होत असल्याचे दिसून येते”. माझ्या गावाला थेट तलावातून हिरवे झालेले पाणी सार्वजनिक नळाला येते, तेच पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी आहे. पाणी शुद्ध नाही. मात्र जलजीवन मिशनच्या अंतर्गत कागदोपत्री शुद्ध पाणी सर्वाना मिळत असल्याचे रेकॉर्ड तयार केले आहे. जलजीवन मिशन ही योजना गावामध्ये केवळ नावाला आणि कागदोपत्री नोंद करून लाभार्थी दाखवण्यासाठी आहे.
यावर पुन्हा असे वाटू लागले.... देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष झाली आहेत. तरीही स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही. की आरोग्याची हमी मिळत नाही. ७६ वर्षात मुलभूत गरजा शासन पूर्ण करू शकले नाही. ग्रामीण भागाची अवस्था ही खूपच घसरण झालेली दिसून येते.
सार्वजनिक सुविधा देणाऱ्या संस्थांची वाट लावून टाकली आहे. ग्रामीण भागात काय आरोग्याच्या सुविधांचा दर्जा आहे. ज्या सर्व सार्वजनिक लाभाच्या योजना होत्या, त्या मोठ्या प्रमाणावर घसरण करून टाकली आहे. तर वरून “ पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी” च्या नावाने २ हजार रुपये दिले जातात. त्या २ हजाराचे मूल्य हे एक वेळेस आजारी पडले तर दवाखान्याचा खर्च देखील भागात नाही. त्यातून लाभार्थी मात्र मोजला जातो. ही शासनाची धोरणनीती समाज व्यवस्थेला कोठे घेवून जाईल हे आतातरी काहीच सांगता येत नाही. मात्र समाज व्यवस्थेच्या घसरणीची वाटचाल आहे हे मात्र निश्चित.
(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
Published on: 07 September 2023, 12:25 IST