भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं त्याला बारा बलुतेदार म्हणून ओळखले जात होते. काळानुरूप मोठे बदल झाले गावातली ही कारागीर मंडळी मागे पडली, मोठ्या प्रमाणात व्यवसायात तांत्रिकता आली. आता मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त देशवासीयांना मोठी भेट दिली. त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. नेमकी ही योजना काय आहे यावर टाकलेला हा प्रकाश…!!
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारख्या पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. अशा १८पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तीन लाखांचे कर्ज मिळेल
जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त ५ टक्के व्याजदराने मिळेल.
कौशल्य प्रशिक्षण
या योजनेत १८ पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या १८ ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तुम्हाला दररोज ५००/- रुपये स्टायपेंड देखील मिळेल. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, १५,०००/- रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल.
अशी लागेल पात्रता
भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यापारांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक.
वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा.
अशी लागतील कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे आधार, पॅन, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
येथे Apply Online लिंकवर क्लिक करा.
पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येईल.
यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करावे.
या विश्वकर्मा योजनेतून अधिकाधिक लोकांना आपल्या व्यवसायात गतिशीलता आणण्यासाठी मदत होणार आहे. व्यवसायाला लागणाऱ्या अत्याधुनिक मशीन त्याअनुषंगाने लागणाऱ्या गोष्टी यातून करता येणार आहेत. ही नवी उभारी घेण्यासाठी एक उत्तम पर्याय सरकारने निर्माण करून दिला आहे. त्यासाठी तात्काळ नोंदणी करा, यासाठी योजनेसाठी जिल्हा स्तरावर श्री. चिंतामणी गुट्टे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची नियुक्तीही केली आहे.त्यांचा संपर्क क्रमांक : मो. 9421859777, कार्यालय : 02382-220144 तसेच सुविधा केंद्राचे राहुल राऊत संपर्क क्रमांक : 9545226622 आपणास अधिक विचारपूस करायची असेल तर वरील क्रमांकावर करता येईल. अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी केलं आहे.
लेखक - युवराज पाटील , जिल्हा माहिती अधिकारी,लातूर
(सदर माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन येथे प्रकाशित करण्यात आली आहे.)
Published on: 27 October 2023, 03:13 IST