Government Schemes

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

Updated on 03 October, 2023 4:08 PM IST

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीकविम्याचा आढावा घेण्यात आला आहे. सोयाबीन पिकावर रोग पडल्याने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्य सरकारची आज (दि.३) मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीसाठी राज्यातील सर्व मंत्री उपस्थित होते.

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असेही आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे-
१) दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
२) विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ
३) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
४) नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी
५) इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा
६) गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान

English Summary: State Cabinet meeting Major decisions on soybean crop insurance
Published on: 03 October 2023, 04:08 IST