शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या सहाय्याने शेतीमध्ये विविध फळ पिकांची लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाला आधारित असलेल्या सोयी सुविधा आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन इत्यादी दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या काळामध्ये शेतीचे स्वरूप आता पालटले असून परंपरागतिक पद्धती आता काळाच्या ओघात नाहीसे झाले असून बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
याच पिकांना प्रोत्साहन देण्याकरिता देखील काही योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. त्याच पद्धतीने जर आपण ड्रॅगन फ्रुट या निवडुंग वर्गातील फळपिकाचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड वाढली असल्याकारणाने ड्रॅगन फ्रुट लागवडी करता देखील आता अनुदान देण्यात येत आहे. नेमके ड्रॅगन फ्रुटला अनुदान कशाप्रकारे दिले जाते? त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? इत्यादी बद्दल आपण माहिती घेऊ?
ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता मिळते अनुदान
ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग परिवारातील एक फळपिक असून याच्यातील असलेले अँटिऑक्सिडंट आणि पोषक तत्त्वांमुळे या फळाला सुपर फ्रुट म्हणून देखील ओळखले जाते. महत्वाचे म्हणजे पाणीटंचाईच्या कालावधीमध्ये देखील ड्रॅगन फ्रुट उत्तम तग धरून राहते. दुसरे महत्त्वाचे बाब म्हणजे या पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होतो म्हणून पीक संरक्षणाकरिता होणारा खर्च देखील वाचतो. त्यामुळे महत्त्वाच्या अशा या फळ पिकाकरिता शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत या पिकाच्या लागवडीकरिता प्रोत्साहन देण्यात येते.
कुणाला मिळते हे अनुदान?
ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी 0.20 हेक्टर जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळतो.
कशा पद्धतीने आहे अनुदानाचे स्वरूप?
या योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवडीचा एकूण खर्चाच्या 40% किंवा जास्तीत जास्त एक लाख साठ हजार रुपये इतके अनुदान एक हेक्टर करिता मिळते. हे अनुदान मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी केल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये दिले जाते. हे तीन टप्पे म्हणजे पहिल्या वर्षी 60 टक्के, दुसऱ्या वर्षी 20 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा पद्धतीने अनुदान देण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनुदान मिळवण्याकरिता दुसऱ्या वर्षी कमीत कमी 75% आणि तिसऱ्या वर्षी कमीत कमी 90% झाडे जिवंत ठेवणे आवश्यक आहे.
कोणत्या कामांकरिता दिले जाते अनुदान?
यामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता आवश्यक असलेले खड्ड्यांची खोदाई, ड्रॅगन फ्रुट च्या झाडाच्या आधारा करीत आवश्यक असलेले सिमेंट काँक्रीटचे खांब उभारणी, खांबांवर प्लेट लावणे तसेच रोपांची लागवड करणे, ठिबक सिंचन, खतांचे व्यवस्थापन व पिक संरक्षणाकरिता आवश्यक बाबी याकरिता अनुदान देण्यात येते.
एका लाभार्थ्याला किती क्षेत्रापर्यंत करता येतो अर्ज?
या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला किमान 0.20 हेक्टर आणि जास्तीत जास्त चार हेक्टर मर्यादेपर्यंत ड्रॅगन फ्रुटची लागवड या योजनेअंतर्गत करता येते व अनुदानाचा लाभ मिळवता येतो.
साधारणपणे अनुदानाची प्रक्रिया कशी असते?
अर्ज केल्यानंतर कृषी सहायकांच्या माध्यमातून लागवड स्थळाची पाहणी केली जाते. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिल्यास एक महिन्याच्या आत लागवड सुरू करणे गरजेचे असते.तसेच लागवड सलग क्षेत्रावर करणे बंधनकारक असून लागवडीकरिता 0.60 × 0.60 × 0.60 मीटर आकाराचे खड्डे खोदणे आवश्यक आहे व लागवडीकरिता सूक्ष्म सिंचन करणे बंधनकारक आहे. लागवड ही साडेचार बाय तीन मीटर किंवा साडेतीन बाय तीन मीटर किंवा तीन बाय तीन मीटर अंतरावर करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही साडेचार बाय तीन मीटर अंतरावर लागवड केली तर एका हेक्टर मध्ये 2960 रोपे, साडेतीन बाय तीन मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी तीन हजार 808 रोपे आणि तीन बाय तीन मीटर अंतरावर केल्यास 4444 रोपांची लागवड करता येते.
ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता आवश्यक रोपांची खरेदी ही कृषी विभागाचे रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाची रोपवाटिका, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिका आणि मनरेगा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींच्या रोपवाटिकांच्या माध्यमातून रोपांची खरेदी करणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेअंतर्गत अनुदानाकरिता अर्ज करण्यासाठी सातबारा उतारा, जर संयुक्त सातबारा असेल तर प्रत्येक खातेदाराचे संमती पत्र, आधारशी लिंक असलेल्या राष्ट्रीयकृत बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधार कार्ड तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला आणि विहित नमुनातील हमीपत्र आवश्यक असते.
Published on: 16 August 2023, 10:55 IST