PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' (पीएम सूर्य घर योजना) सुरू केली आहे. याबाबत पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक कोटी घरांना रूफटॉप सोलर सिस्टिमद्वारे वीज पुरवली जाणार आहे. यामुळे या घरांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
रोजगाराच्या नवीन संधी
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, तळागाळात छतावरील सौर यंत्रणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी शहरी संस्था आणि पंचायतींना प्रोत्साहन दिले जाईल. यासोबतच या योजनेच्या माध्यमातून लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. वीज बिल कमी होणार असून रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.
पीएम मोदींचं तरुणांना आवाहन
पीएम मोदींनी शाश्वत विकासासोबतच सौरऊर्जेला चालना देण्याचे आवाहन केले आहे. पीएम सूर्य घर – मोफत वीज योजनेंतर्गत सर्व ग्राहकांनी, विशेषत: तरुणांनी त्यांच्या घरी सौर पॅनेल बसवावेत. यासाठी ते pmsuryaghar.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
कोट्यवधी रुपयांचे वार्षिक बजेट
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यादरम्यान रूफटॉप सोलर आणि मोफत वीज योजनाही जाहीर करण्यात आली. या योजनेद्वारे एक कोटी घरांना एका महिन्यात ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. यासोबतच या योजनेमुळे एक कोटी कुटुंबांची वार्षिक १५ ते १८ हजार कोटी रुपयांची बचत होणार असून ते अतिरिक्त वीज वीज वितरण कंपन्यांना विकू शकतील. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांमध्ये सुधारणा होईल. मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांसाठी संधी निर्माण होतील आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.
पंतप्रधान मोदींनी अयोध्येत केली होती घोषणा
२२ जानेवारी रोजी अयोध्येत रामललाच्या अभिषेकानंतर पंतप्रधान मोदींनी त्या संध्याकाळी याबाबत घोषणा केली होती. सरकार १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याच्या लक्ष्यासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करत आहेत. यावेळी ते म्हणाले की, अयोध्येतील त्यांच्या अभिषेक प्रसंगी भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर रूफटॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला. तसंच १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन सरकार प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असंही मोदी म्हणाले होते.
Published on: 13 February 2024, 05:08 IST