Government Schemes

महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगा येथून महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती मिळाली. यानंतर मी फुलशेती व्यवसाय करण्याच्या विचाराने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील फुलशेतीमध्ये प्रशिक्षण घेतले. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 6 लाख रुपयांचे अर्थसाह्य घेऊन करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे फुलशेती (पॉलिहाऊस) सुरु केली.

Updated on 17 June, 2024 12:40 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासन यांच्या पुढाकाराने राज्यभरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अनेक योजना राबवित आहे. माविमचे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिलांना माविमच्या अनेक योजनांचा लाभ दिला जात असून यामुळे महिला उद्योग उभारणीत पुढे येत असल्याचे दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेऊन स्वतः सक्षम बनण्याबरोबरच अन्य महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील महिलांनी साधलेल्या सर्वांगीण प्रगतीच्या यशोगाथा त्यांच्याच तोंडून…

फुलशेतीतून साधली सर्वांगीण प्रगती

महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगा येथून महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती मिळाली. यानंतर मी फुलशेती व्यवसाय करण्याच्या विचाराने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील फुलशेतीमध्ये प्रशिक्षण घेतले. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 6 लाख रुपयांचे अर्थसाह्य घेऊन करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे फुलशेती (पॉलिहाऊस) सुरु केली. या शेतीमध्ये आम्ही लावलेल्या जरबेरा व निशिगंधाच्या फुलांना मुंबई, हैद्राबाद, नाशिक, दिल्ली अशा मोठ्या शहरांमधून चांगली मागणी आहे. महिन्याला साधारण 40 हजार रुपयांचा नफा मला या फुलशेतीतून होतो. या फुल शेतीमध्ये मी सहा महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शेती हा व्यवसाय देखील कमीपणाचा नसून शेती व शेतीपूरक व फुल शेतीतूनही आपली प्रगती साधता येते. जिल्ह्यातील महिलांनी शेती, शेतीपूरक व्यवसाय अथवा फुलशेतीतून आपले सर्वांगीण प्रगती साधावी. महिलांसाठी अनेक योजना राबवून शासन महिलांना सशक्त करत असल्याबद्दल राज्य शासनाचे धन्यवाद – विद्या बोरुडकर, कुडीत्रे, ता. करवीर

बेकरी उद्योगातून कुटुंबाला हातभार

हातकणंगले तालुक्यातील टोप येथे पिठाची गिरण सुरु केली होती. यानंतर या उद्योगाला बेकरी उत्पादन विक्रीचाही जोड दिला. महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्र, पेठ वडगाव या केंद्रांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून 2 लाख 12 हजार रुपयांचे कर्ज घेतले. यातून मला 35 टक्के सबसिडी मिळाली. बेकरी उद्योगाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यामुळे वर्षाला साधारण 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मला मिळतो. या उद्योगामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लागला आहे. माझ्या मदतीसाठी अन्य दोन महिलांना मी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनाही दरमहा 6000 रुपये मानधन मी देते. राज्य शासन महिलांच्या विकासासाठी अनेक योजना राबवीत असून महिलांनीही या योजनांचा लाभ घ्यायला हवा. या योजनेचा लाभ माझ्यासह राज्यातील अनेक महिलांना मिळत असून त्यामुळे त्या प्रगती साधत आहेत यासाठी मी शासनाला धन्यवाद देते – सरिता सिसाळ, टोप, ता. हातकणंगले

लघु उद्योगातून कुटुंबाला आधार

कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशाने मला एखादा लघुउद्योग सुरु करायची इच्छा होती, पण मार्ग दिसत नव्हता. याचवेळी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा होत असल्याची माहिती मला मिळाली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत स्थापित अस्मिता लोकसंकलित साधन केंद्र बालिंगा या संस्थेच्या अंतर्गत जोडलेल्या दुर्गामाता महिला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून मी 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले. यातून औरंगाबाद येथून पीठ शिजवण्याचे व मळण्याचे मशीन, कुरडई व पापड मशीन खरेदी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे येथील आमच्या घरी हे मशीन आल्यानंतर लगेचच मी उन्हाळी पदार्थांचे उत्पादन तयार करण्यास सुरुवात केली. गहू, रवा, नाचणीच्या कुरडई, पापड, सालपापडी, नाचणी, तांदूळ, टोमॅटो, पालकाचे पापड, तिखट सांडगे, उडदाचे पापड, शाबूचे पळी पापड, उकड सांडगे, बटाटा शाबूचे मिक्स पापड, आंबा, लिंबू, मिरचीचे लोणचे असे पदार्थ तयार करुन मी त्याची विक्री करते. या उद्योगात मदतीसाठी आणखी 2 महिला कार्यरत असून त्यांना दरमहा 4 हजार रुपयापर्यंत मानधन देते. गौरी लघु उद्योगाच्या माध्यमातून हे सर्व उन्हाळी उत्पादन कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्येही विक्रीसाठी पाठवले जातात. या उद्योगातून मला वर्षभरात 2 लाख रुपयांचा नफा मिळतो. लघुउद्योगातूनही कुटुंबाला आधार देण्याबरोबरच महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहू शकतात यासाठी महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व आपली स्वप्नपूर्ती करावी – सविता शामराव सुतार, कळंबे तर्फ कळे, ता. करवीर.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मुळे महिलांच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लागण्याबरोबरच स्वतः ची स्वप्नपूर्ती होत आहे. यासाठी राज्य शासनाचे आभारी असल्याचे मत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांनी व्यक्त केले.

वृषाली पाटील, माहिती अधिकारी, कोल्हापूर

English Summary: Empowerment of women through government schemes
Published on: 17 June 2024, 12:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)