देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी अनेक सरकारी योजना जाहीर करत असते. याच अनुषंगाने शेतकरी आणि मच्छिमारांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार मत्स्यशेतीवर शेतकरी आणि मच्छिमारांना 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी किंवा 2 लाख रुपयांपर्यंत सूट देते. याशिवाय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत शेतकरी आणि मच्छीमारांना सरकारकडून कर्जही दिले जाते.
काय आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना -
आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही एक केंद्रीय योजना आहे ज्याचे फायदे किसान क्रेडिट कार्ड आणि नाबार्डच्या मदतीने दिले जातात. या योजनेंतर्गत क्रेडीट कार्ड धारक शेतकरी आणि मच्छिमारांना कोणत्याही हमीशिवाय केवळ 7 टक्के व्याजदराने 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
ह्या योजनेची सुरूवात कधी झाली -
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली. मत्स्यपालन क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी योजना मानली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज आणि मत्स्यपालनाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.
पात्रता -
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत, देशातील सर्व शेतकरी, मत्स्य उत्पादक व्यापारी, मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी इच्छूक असलेल्यांना लाभ होणार आहे. तसेच अनुसूचित जातीच्या महिलांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते, तर सर्वसाधारण श्रेणीतील महिलांना 40 टक्के अनुदान मिळते.
या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा -
मत्स्य संपदा योजनेंतर्गत मत्स्यपालनासाठी कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळील मत्स्यव्यवसाय विभागाशी संपर्क साधावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहीतीसाठी https://pmmsy.dof.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Published on: 15 October 2023, 07:01 IST