1. यांत्रिकीकरण

फळे, भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीतकक्ष’

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने राज्यात थैमान घातले आहे. यामुळे काढणीला आलेले पीक वाया गेले आहे. उत्पन्न घेत असताना आणि उत्पन्न घेतल्यानंतरही अनेक संकटे येत असतात. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. उत्पन्न निघाल्यानंतर बाजारभाव योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल भाजीपाला, फळे मिळेल त्या दरात विकावी लागतात. यामागे सर्वात मोठे कारण असते, ते म्हणजे शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी साधने नसतात. शीतगृहे, गोदामे नसल्याने शेतकरी मिळेल त्या दरात माल विकत असतो. भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तर मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. कारण त्याच्याकडे शीतगृहे नसतात.

पैशांची कमतरता असल्याने सर्वच शेतकरी शीतगृहांची उपलब्धता करु शकत नाहीत. पण अशा शेतकरी वर्गासाठी आम्ही शीतगृहाची एक आयडिया देत आहोत. ज्यातून शेतकरी कमी खर्चात आणि कमी विजेवर शीतगृह चालवू शकतील. यामुळे शेतकऱ्यांची पुरेसा पैसा वाचणार आहे.  फळे, भाज्यांच्या साठवणीसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या विटा, बांबू, वाळू आणि गोणपाट इत्यादी वस्तूंपासून शीतकक्ष बनवता येतो. फळे आणि भाजीपाला साठविताना कसल्याही प्रकारची यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही, त्यामुळे याला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष म्हणतात. या शीतकक्षाचा वापर फळे व भाजीपाला साठवण कालावधी वाढविण्यासाठी करण्यात येतो. फळांची साठवण कमी तापमानात आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे, त्यामुळे फळांची नासाडी टाळता येते.   

 


शीतकक्षाची बांधणी
:-

 • विटांचा एक ते दोन थर देऊन शीतकक्षाच्या तळाचा भाग १६५ सेंमी x ११५ सेंमी तयार करावा.
 • दोन विटांमधील अंतरात बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून त्यात दोन भिंतीतील अंतर ७.५ सेंमी ठेवावे.
 • दोन भिंतीमधील अंतर सुद्धा वाळूने भरून घ्यावे. अशा रीतीने वाळू आणि विटांच्या साहाय्याने हौद तयार करून घ्यावा.
 • तयार झालेल्या हौदावर (कक्षावर) झाकण्यासाठी बांबूचे व कोरड्या गवताचे (१६५ सेंमी x ११५ सेंमी) छप्पर तयार करावे. त्याने शीतकक्ष झाकून घ्यावा. त्यामुळे थेट सूर्यप्रकाश किंवा पवसापासून कक्षाचे संरक्षण होते.
 • शीतकक्ष शक्यतो झाडाखाली किंवा छपराखाली बांधावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळा शीतकक्षाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूने पाणी शिंपडावे आणि भिंत चांगली ओली करावी.
 • ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी शीतकक्षाच्या वरील बाजूस असलेल्या वाळूमधून पाईप ठेऊन त्याला ठिबक संचाच्या नळ्या जोडाव्यात म्हणजे पाण्याची बचत होते.
 • नियमितपणे शीतकक्षावर दिवसातून दोन वेळा पाणी मारल्यास कडक उन्हामध्ये शीतकक्षातील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा १५ ते १८ अंश सेल्सिअस कमी असते.

 


कक्ष बांधणीनंतर घ्यायची काळजी
:-

 • वाळू, विटा व वरचे छप्पर सतत ओले ठेवावे. सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळा पाणी मारावे किंवा शक्य असल्यास पाण्याच्या टाकीला जोडलेली ठिबक सिंचन नळी जोडून ठेवावी.
 • फळे आणि भाज्या प्लास्टिकच्या सछिद्र क्रेट्समध्ये ठेवावे आणी हे क्रेट्स पातळ पॉलिथीनच्या शीटने झाकावे. बांबू, कागद, लाकूड यापासून बनविलेल्या खाकी टापल्या इत्यादी शीतकक्षात वापरु नये.
 • साठवलेल्या उत्पानावर पाण्याचा थेट संपर्क होऊ देऊ नये. ठराविक काळानंतर शीतकक्ष बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांच्या साहाय्याने स्वच्छ करावे.

शीतकक्षाचे फायदे :-

 • फळे भाजीपल्याचा साठवण कालावधी वाढविण्यास मदत होते. 
 • फळे आणि भाज्या, ताज्या टवटवीत आणि आकर्षक राहतात. चांगल्या दर्जामुळे अधिक दर मिळू शकतो.  
 • फळांची पिकण्याची प्रक्रिया मंद गतीने होते आणि त्यांच्या वजनात घट येत नाही.
 • शीतकक्ष बांधणीसाठी कमी खर्च लागतो. शेतावरही उभारणी शक्य आहे.

 

लेखक :-

प्रा. शुभम विजय खंडेझोड

(सहायक प्राध्यापक) उद्यानविद्या विभाग,

 डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव.

 . मेल. shubhamkhandezod4@gmail.com          

डॉ. ज्ञानेश्वर सुरेश रावनकर

(एम.एस.सी, पी. एच.डी. भाजीपाला शास्त्र)

 उद्यानविद्या विभागडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters