आपल्या देशाची वाढती लोकसंख्या व त्याकरिता मुबलक अन्नधान्याची सोय करणे हा देशाला नेहमी भेडसवणारा प्रश्न आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी शेतीच्या विविध क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक आहे. औद्योगीकरणामुळे सद्यस्थीतीस मजूर शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेती मध्ये काम करण्यास मजुराची टंचाई भासत आहे. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतीशय महत्वाचे आहे. अन्यथा त्याचा उत्पादनावर परीणाम होऊ शकतो. म्हणुन शेतीचे यांत्रिकीकरण एक पर्याय नसुन ती एक गरज झाली आहे. यांत्रिकीकरण विविध क्षेत्रात सुध्दा होतांना दिसुन येत आहे व शेती मध्ये वेगवेगळया आधुनिक यंत्राचा वापर शेतकरी करत आहेत. किंबहुना यांत्रिकीरणावरच शेतीचे उत्पादन अवलंबुन नसुन वातावरणाचा लहरीपणा सुध्दा त्याला कारणीभुत आहे. बदलते वातावरण व यांत्रिकीकरण याचा सांगड घालणे आवश्यक आहे जणेकरून शेतीचे उत्पादन वाढेल व आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुध्दा हातभार लागेल. शेतीच्या मशागतीपासून तर पीक कापणीपर्यत शेतकऱ्यांना खुप खर्च होतो. वेळेवर शेतीची कामे होणे आवश्यक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा गोंधळ होतो. पिकाच्या पेरणीच्या वेळेस मजुरांची आवश्यकता भासते व त्यावेळी अधीक मजुरीची मागणी केल्या जाते.
बदलत्या पर्जन्याचा विचार करून कृषि शक्ती व औजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने, रूंद, वरंबा सरी टोकण यंत्र विकसीत केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली असता ३० ते ४० टक्के उत्पादनात वाढ होते कारण या यंत्राच्या सहाय्याने वरंब्यावर पेरणी केली जाते. तसेच पेरणीच्या ओळीच्या बाजुने सरी केल्या मुळे पाणी मुरण्यास मदत होवुन पिकाच्या वाढीच्या वेळेस त्या ओलाव्याने पाण्याच्या पुरवठयाची मदत होउन पिकाची झपाटयाने वाढ होते. हे यंत्र ट्रॅक्टरचलीत असून हया यंत्राच्या साहयाने कपासी, कांदा, सोयाबीन, मका, हरभरा, तुर, भुईमुग, उडीद, मुग, ज्वारी इत्यादी पिकाची टोकन पध्दतीने वरंब्यावर पेरणी करण्याकरीता उपयुक्त आहे. तसेच पेरणी यंत्राला काढून आतंरमशागती करण्याकरीता सुध्दा हे यंत्र वापरले जाऊ शकते. हया यंत्रामध्ये, बिज व खत पेटी, मुख्य सांगाडा, बियाण्याच्या तबकडया, नळया, दाते, गती देणारी यंत्रना, चाके, यंत्र रिजर इत्यादी भाग समाविष्ठ केलेले असुन ते बिज टोकन करण्याकरीता वेगवेगळे कार्य करतात. हया सर्व भागाची कार्यप्रणाली खालील प्रमाणे आहे.
१. मुख्य सांगाडा
या यंत्राचा मुख्य सांगाडा चौकोणी आकाराचा आहे. हया सांगाडयाला खत व बीज पेटी, फण व इतर भाग जोडलेली आहेत. हा मुख्य सांगाडा खत व बिज पेटी वाहुन नेण्याकरीता या यंत्रामध्ये समाविष्ठ केलेली आहे.
२. खत व बिज पेटी
हि पेटी लोखंडी पत्रापासून बनवलेली असुन तीचा आकार हा चौकोणी आहे. हया पेटीचे खत व बियाणासाठी असे दोन मुख्य भाग केलेले आहेत. अशा प्रकारच्या पेटीमध्ये स्वतंत्र बिज व खत पेटी स्वतंत्र फना साठी असल्यामुळे आंतरपीक घेतल्या जाऊ शकते. बियाणाची तबकडी (प्लेट) पेटीच्या खालच्या बाजूला स्प्रींग व नटाच्या साहयाने घट्ट बसवलेली आहे. तसेच खत नियंत्रणा करीता खत पेटीच्या तळाशी एक लोखंडी पट्टी दिलेली आहे. ही लोखंडी पट्टी खाली किंवा वरती करण्याची व्यवस्था दिली असल्यामुळे खताची मात्रा नियंत्रीत केली जाते.
३. बियाण्याच्या तबकडया
आवश्यक्तेनुसार विविध पिकाच्या टोकण करण्याकरीता स्वतंत्र अश्या बिजाच्या तबकडया या यंत्रामध्ये प्रत्येक बिजपेटीत लावाव्यात. हया बिजकडया (HDPE) प्लॅस्टीकच्या असुन त्या वर्तुळाकार आहेत. व त्यांच्या बाहेरच्या बाजुने वेगवेगळया खाचा असुन या प्रत्येक खाचेमध्ये बिज येईल अशा प्रकारची संरचना आहे. या खाचेची संख्या बिजानुसार वेगवेगळी आहे.
४. गती देणारी यंत्रणा
जमीनीवरील चालणाऱ्या चाकापासुन चैन व स्प्रॉकेटच्या सहाय्याने बिजपेटीतील तबकडया बिज चकत्या फिरवण्यासाठी दिलेल्या आहेत. तसेच खत पेटी मधील बुश सुध्दा याच यंत्रनेने फिरले जाते. या चाकाचे व बियाणे नियंत्रीत करणाऱ्या तबकडयाच्या गतीचे प्रमाण १:१ एवढे आहेत म्हणजे चाकाची व बिज चकत्याची फिरण्याची गती एक समान ठेवली आहे.
५. खोली नियंत्रीत करणाची चाके
या यंत्राच्या दोन्ही बाजुला, प्रत्येकी एक चाक यंत्राची दिलेले आहेत. या चाकाच्या अॅक्सल वर ५ सें. मी. ऐवढया अंतरावर छिद्रे दिल्यामुळे यंत्राची उंची आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करता येते व त्यामुळे यंत्र चालण्याची खोली नियंत्रीत करून बिज मशागत केलेल्या मातीमध्ये किती खोली पर्यत टोकण करायचे त्याचा अंदाज बांधता येतो.
६. सरी यंत्र
सरी पाडण्याकरिता या यंत्राच्या सांगाडयावर दोन्ही बाजुने प्रत्येकी एक सरी पाडण्याकरिता सरी यंत्र बसविलेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने सरी पाडल्या जातात व त्या दोन सरी मधील वरंब्यावर बियाणाची ओळीमध्ये टोकण केले जाते.
७. आंतर मशागत यंत्र
या यंत्राच्या सहाय्याने आंतरमशागत सुध्दा करता येते, त्यासाठी बीज टोकण यंत्राला मुख्य सांगाडयापासुन वेगवेगळे करून तेथील दात्याला जमीन उखरण्यासाठी स्वीप हे जोडता येते व अश्या पध्दतीने आंतरमशागत करता येते.
यंत्राचे वैशिष्ट्ये:
- हे यंत्र रूंद व सरी पध्दतीने टोकण करण्याकरीता बहुतांश पिका करिता उपयुक्त आहे.
- दोन ओळी मधील व बिजामधील अंतर हे आवश्यक्तेनुसार बदलता येते.
- प्रत्येक पिकांकरीता वेगवेगळया बिजाच्या तबकडया/चकत्या आहेत व त्या तबकडया सहजपणे बदलता येतात.
- प्रति हेक्टर बिज व खताची मात्रा ठरवता येते.
- या यंत्राच्या सहयाने सरी पाडल्यामुळे पावसाचे पाण्याच्या प्रवाह हा काही अंशी नियंत्रणात येतो व त्यामुळे पाऊस पडला असता जमीनीत पाणी मुरण्यास मदत होते किंवा जास्त पाऊस पडला असता पाणी हे सरीमधुन पाहुन जाते.
- जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहतो व पाऊसाचा खंड पडला असता पीकाच्या संवेदनशिल वाढीच्या वेळेस काही दिवस पिक हे तग धरून राहते.
- पारंपारीक पध्दतीपेक्षा या यंत्राच्या सहाय्याने पेरण्याच्या खर्चामध्ये ३० ते ४० टक्कयाची बचत होते.
- या यंत्राची कार्यक्षमता ०.३३ ते ०.३६ हेक्टर प्रती तास ऐवढी आहे.
- या यंत्राच्या सहाय्याने आंतरमशागत सुध्दा करता येते.
- हे यंत्र वापरण्यास सोपे असुन त्याच्या रखरखावर खर्च हा खुपच कमी आहे.
- यंत्रामध्ये वेगवेगळया दात्यासाठी स्वतंत्र अशी बिज पेटी असल्यामुळे आंतर पिक सुध्दा घेता येते.
- बियाणे व वेळेची बचत २४ टक्के होते.
लागवड पध्दत - ४०-४०-६० सेमी. ट्रॅक्टरच्या चाकातील अंतर न वाढवता करता येते.
- ४५-४५-४५-६० सेमी. ट्रॅक्टरच्या चाकातील अंतर वाढवता करता येते.
यंत्राची तांत्रिक माहीती:
अ.क्र |
यंत्राचे भाग |
विवरण |
१ |
मुख्य सांगाडा, मी.मी. |
२००० x ४८० (लांबी x रुंदी) |
२ |
बिज पेटी, मी.मी. |
१०५० x २४० x १८० (लांबी x रुंदी) |
३ |
बिज वाहक नळी, मी.मी. |
३० व्यास व ६०० लांबी |
४ |
दाते |
३ व ४ दात्यांची संख्या (पिकानुसार अंतर कमी जास्त करता येते) |
५ |
बियाणाची मात्रा नियंत्रीत करणारी यंत्रणा |
प्लॅस्टीकच्या तबकडया तक्ता क्रमांक २ मध्ये पहा |
६ |
खत प्रमाणीत करणारी यंत्रणा |
छिद्र असलेली लोखंडी पट्टी |
७ |
गती देण्याची यांत्रिक पध्दत |
चेन व स्प्रॉकेट |
८ |
बिज पेटीची क्षमता, किलो ग्रॅम |
१२ ते १६ |
९ |
सरी यंत्र मि.मी. |
६०० x ४५० x ५ (लांबी x रुंदी x जाडी) |
१० |
बिज टोकनाची खोली नियंत्रीत करण्याचे चाक, मी.मी. |
एकूण २, ३०० x ५० x १५ (लांबी x रुंदी x जाडी) |
११ |
आंतर मशागतीसाठी ब्लेड |
|
१२ |
यंत्राची (लांबी x रूंदी x उंची) |
९८० x २४३० x ९९५ |
पेरणी करतांना घ्यावयाची काळजी:
- पेरणी यंत्र वापरतांना कुशल चालकाची निवड करावी.
- यंत्र ट्रॅक्टरला जोडतांना यंत्र जमीनीवर समतल जागी ठेवावे. सर्व दात्यातील अंतर हे समान अंतरावर मुख्य सांगाडयांवर जोडावीत व त्यामधील अंतर आवश्यक्तेनुसारच आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. सरी पाडण्यासाठी दिलेले सरी यंत्र सांगाडयाच्या मध्यापासुन समान अंतरावर आहेत याची सुध्दा खात्रीकरून घ्यावी.
- बियाणे व खताची पेटी एक तृतीअंश भरावी.
- बियाणे व खताची पेटी रिकामी झालेली नाही याची अधून मधून तपासणी करावी.
- पेरणी यंत्राचा वेग हा ३ ते ५ प्रति तास च्या दरम्यान असावा, त्यामुळे समप्रमानात बीज व खत पेरणे साध्य होते.
- टोकण यंत्रामध्ये निश्चित केलेल्या पिकाच्या बियानाची तबकडीची निवड करून बीजपेटीत योग्य ठीकाणी बसवुन त्यावरील स्प्रींग नट घट्ट करावा.
- खत नियंत्रण पट्टी आवश्यक्तेनुसार उघडावी जेणे करून खत योग्य प्रमाणात टाकता येईल.
- पेरणी करतांना खेली नियंत्रीत करण्याचे चाकाच्या मदतीने पेरणी करण्याची खोली निश्चित करावी.
- बियाणे व खते योग्य खोलीवर पेरली जातात की नाही याची खात्री करावी.
- यंत्राना गती देणारे भाग जसे की चेन स्प्रॉकेट, गेअर हे व्यवस्थीत फिरतात याची खात्री करावी.
विविध पिकाच्या टोकण करण्याकरीता विविध बियाण्याच्या तबकड्या:
अ.क्र |
पिक |
बियाण्याच्या तबकड्या |
खाचाची संख्या |
१ |
सोयाबीन |
SP1 |
२३ |
२ |
तूर |
SP2 |
१२ |
३ |
हरभरा |
SP3 |
१२ |
४ |
हरभरा |
SP4 |
१६ |
५ |
उडीद, मुग व ज्वारी |
SP5 |
१२ |
६ |
मका |
SP6 |
४ / ८ |
७ |
भुईमुग |
SP7 |
१२ |
८ |
भुईमुग |
SP8 |
१६ |
९ |
कांदा |
SP9 |
२५ |
१० |
गहू |
SP10 |
२३ |
यंत्राची काळजी:
- यंत्रास गती देणारी यंत्रणाचे भाग, जसे चेन स्प्रॉकेट, गेअर हे सरळ रेषेत आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
- सर्व ग्रीसींग पाँईटला ग्रीस दयावे व नटबोल्ट घट्ट करावेत.
- पेरणी झाल्यानंतर खत व बिज पेटी मधून काढून घ्यावे व तसेच बिजपेटी, बीज वाहून नेणारी बीज नळी, बीजाच्या तबकडया स्वच्छ कराव्यात.
- यंत्र व्यवस्थितपणे पेरणी केल्यानंतर झाकून शेडमध्ये ठेवावे.
डॉ. शैलेश ठाकरे, उध्दव कंकाळ, विवके खांबलकर, धिरज कराळ
(कृषि शक्ती व औजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)
Published on: 30 June 2018, 01:36 IST