Farm Mechanization

आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरणी, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात.

Updated on 11 August, 2020 6:56 PM IST


आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे.  ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरणी, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे,  जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ.  कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. 

किंबहुना शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रक्टरचे स्थान फार महत्वाचे आहे. शेती व्यवसायाला ट्रक्टर हे वरदान आहे. हे कृषीयंत्र बैलजोडी सांभाळण्यापेक्षा शेती व्यवसायात सर्व दृष्टीने परवडण्यासारखे आहे. अर्थात, ट्रक्टर विकत घेताना निरनिराळ्या कंपन्यांच्या जाहिरातीला बळी न पडता अभ्यासांती अनुभव जमेला धरावा आणि गुणवत्ता, दर्जेदारपणा आदी आवश्यक असणाऱ्या ट्रक्टरची निवड करावी.  सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, पडताळणी करून तो विकत घ्यावा. 

विशेषतः आवश्यक असतील तेवढी सुरुवातीला ट्रक्टरचालीत अवजारे घ्यावीत म्हणजे अडचणी येत नाहीत. ट्रक्टर अवजारासाहित स्वयंपूर्ण असणे कधीही चांगले.  घेतलेला (खूप भांडवल घालून) ट्रक्टर सुलभतेने चालवा.  त्याची कार्यक्षमता कमीत-कमी १०-१५ वर्षे टिकून राहायला हवी.  यासाठी ट्रक्टरची योग्यप्रकारे काळजी घ्यावी लागते.

अशी घ्या दक्षता 

ट्रक्टरचे काम झाल्यानंतर उन – पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवाऱ्याला उभा करावा. काम झाल्यानंतर धूळ, चिखल अगर काडीकचरा काढून स्वच्छ करावा.  ट्रक्टर नेहमी एकहाती असावा.  ड्रायव्हरसारखे बदलू नयेत आणि ट्रक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात. अगदी पहिली गोष्ट म्हणजे इंजिन टाकीतले तेल पुरेसे आहे कि नाही ते पाहावे. 

पंपामधील वंगण / तेल डीप स्टीकच्या सहाय्याने तपासावे.  रेडीएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे.  एअर क्लीनर स्वच्छ करावा.  ट्रान्स्मिशन ऑईल डीपस्टीकच्या सहाय्याने तपासावे.  टायरमधला हवेचा दाब योग्य आहे ना याची खात्री करावी.  (पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १,५ ते २.५ केजी सें. मी.  असावा.) फॅनबेल्ट तपासावा.  ज्याठिकाणी ग्रीस लागते असे भाग तपासावेत.  महत्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत.  बॅटरीमधल्या पाण्याची पातळी योग्य आहे कि नाही ते तपासावे.  इ.  गोष्टी

ट्रक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावी.  क्लच पेडल दाबावे.  गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावी.  मेन स्वीच ऑफच्या बाजूला फिरवावे.  गरज असेल तर पार्किंग ब्रेक लावावेत. ट्रक्टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला कि ट्रक्टर थांबवून त्याचे कारण शोधावे.  जर इंजनातून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भार कमी करावा.  ट्रक्टर गतीमध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये.  ट्रक्टरमागे घेताना अवजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी.  ड्राबर पट्टी अगर औजारांवर उभे राहू नये.  नेहेमी क्लच हळुवार सोडवा.  रोडवर चालवताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे.  उतारावरून जाताना नेहेमी ट्रक्टर गिअरमध्ये असावा.  वळणावर ब्रेक दाबताना गती कमी करावी.  पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये. मॅन्युअलप्रमाणे ट्रक्टरच्या सर्व्हिसिंग करून घ्याव्यात.  काही तास कामाचे झाले की सुचनेनुसार फिटरकडून ट्रक्टरची देखभाल करून घ्यावी. 


ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन
हे कामाच्या तासावरून केले जाते. ट्रॅक्‍टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्व चाकांचे नट बोल्ट्‌स तपासावीत. गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. योग्य व्यवस्थापनातून ट्रॅक्‍टरची कार्यक्षमता वाढविता येते, तसेच इंधनामध्ये बचत करणे शक्‍य आहे. 

1) दर 8 ते 10 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी -

अ) इंजिनमधील (सम्पमधील) व एअर क्‍लिनरमधील तेलाची पातळी तपासावी. 
ब) रेडिएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासावी. 
क) जर ट्रॅक्‍टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्‍लिनरमधील तेल बदलावे. 
ड) डिझेल लिकेज आहे का ते पाहावे.

2) दर 50 ते 60 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - 
अ) फॅन बेल्टचा ताण योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी. 
ब) गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. 
क) ट्रॅक्‍टर चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. 
ड) बॅटरी व मोटर यांची सर्व कनेक्‍शन घट्ट बसवावीत. 
इ) इंधन फिल्टर (डिझेल फिल्टर)मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.

 


ट्रॅक्‍टरची दुरुस्ती

1) ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते; परंतु ट्रॅक्‍टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलिंडर लायनर, कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. क्रॅंक शाफ्ट ग्राइंडिंग करून घ्यावा लागतो. तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह सीटसुद्धा बदलावे लागते. 

2) ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही ठोस असा नियम नाही. सर्वसामान्य ट्रॅक्‍टरच्या कार्याचा विचार करता एकूण 4000 तास काम केल्यानंतर इंजिनच्या कॉम्प्रेसरमध्ये घसारा येतो व पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजिन अपयशी ठरते.  तसेच सिलिंडर लायनर व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. 

3) व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह सीट रिफेस करून घ्यावे लागते. याशिवाय ऑइल सील, रेडिएटर होस पाइप तसेच बुशिंगसुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसेच कनेक्‍टिंग रॉडच्या बेरिंगमधील क्‍लिअरन्स (फट) तपासून ठीक करावी लागते. 

4) साधारणतः जेव्हा ट्रॅक्‍टरच्या कामाचे 8000 तास पूर्ण होतात तेव्हा क्रॅंकशाफ्ट व कॅमशाफ्टची तपासणी करावी. त्यावेळी कमी मापाचे बेअरिंग वापरावे लागते. शक्‍यतो दुसऱ्या ओव्हरहॉलिंगच्या वेळेस पिस्टन व सिलिंडर लायनर बदलावे. 

5) इंजिन ओव्हरहॉल करताना पिस्टनच्या डोक्‍यावरील रिंग वरील खाचामधील तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह दांडीवरचा कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावी व सर्व भाग केरोसीनमध्ये स्वच्छ धुऊन काढावेत. 

6) इंजिन हेड जोडताना नवीन गॅसकेटचा वापर करावा. सिलिंडर गॅसकेटमध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो किंवा सिलिंडरमध्ये पाणी घुसण्याची किंवा दोहोंची शक्‍यता वाढते. 

7) बहुतांश वेळेस असे लक्षात आले आहे, की ट्रॅक्‍टरची दुरुस्ती ही होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. सुगीच्या वेळी होणारी मोडतोड थांबवण्यासाठी ज्या वेळी सुगी संपते व रिकामा वेळ उपलब्ध असतो अशावेळी ट्रॅक्‍टरची दुरुस्ती करावी. 


English Summary: Take care of the tractor in such a way, will give tremendous service for 10 years
Published on: 11 August 2020, 06:56 IST