आजकालच्या काळात शेतकऱ्यांचा कल हा आधुनिक शेती करण्याकडे वाढला आहे. शेतामध्ये विविध प्रकारची पिके घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर केला जात आहे. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कोणतेही पीक तन मुक्त ठेवणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे पिकांमधील गवत काढण्यासाठी( निंदणी साठी) फार मोठ्या मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे मजुरीवर होणारा खर्च वाढतो व पर्यायाने उत्पादन खर्चात वाढ होते. त्यामुळे आता पिकांमधील गवत काढण्यासाठी पावर विडर व ग्रास कटर सारखी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. हे यंत्र आकाराने लहान व परवडण्याजोग्या किमतीत मिळू शकतात. त्यांची माहिती खालील प्रमाणे.
- पावर विडर
शेतामध्ये बांधांवर वाढणारे तण ही शेतकर्यांच्या पुढील सगळ्यात मोठी समस्या आहे. हे तण काढणे फार महत्त्वाचे असते, जर हे आपण बांधाच्या कडेला वाढणारे किंवा शेतांमधील गवत उपटून घेतले तर जमिनीच्या वरच्या भागाची माती मोकळी होऊन जमिनीची धूप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. तसेच न काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लावावे लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. तसेच आताच्या काळात शेतकरी तणनियंत्रणासाठी विविध प्रकारच्या तणनाशकांचा वापर करतात. त्याचा परिणाम हा बऱ्याच पिकांच्या वाढीवर होतो, तसेच जमिनीच्या सुपीकतेवर ही त्याचा परिणाम होऊ शकतो.
या सगळ्या समस्यांवर पर्यायी चांगला उपाय म्हणजे पावर विडर हे यंत्र होय. पावर विडर हे यंत्र वापरायला फार सोपे आहे. तसेच ते वजनाने हलके असून आकाराने लहान असते. कपाशी, केळी, ऊस, संत्रा, डाळिंब इत्यादी दोन सरीमधील जास्त अंतर असलेल्या पिकांमध्ये वापरता येऊ शकते. पावर विडर यंत्राची कार्यक्षमता उत्कृष्ट असून ते बहु उपयोगी आहे. जे तण काढण्याचे काम ७ ते ८ मजूर दोन दिवसात करतात ते काम पावर विडरच्या साह्याने एका दिवसात होऊ शकते. त्यामुळे पर्यायाने पैशांची व वेळेची बचत होते. साधारणतः बाजारपेठेत तीन ते सहा अश्वशक्तीचे पावर विडर उपलब्ध आहेत.
- ग्रास कटर
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यासाठी लागणारा चारा हा शेतातून उपलब्ध होतो. आजही शेतकरी चारा कापण्यासाठी परंपरागत विळ्याचा वापर करतात. परंतु आताच्या परिस्थितीत उपलब्ध वेळेचा आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार केला तर ही पारंपरिक पद्धत फायद्याची नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी मनुष्यबळात आणि पैशांमध्ये गवत कापणी गरजेचे आहे. त्यामुळे गवत कापण्यासाठी अत्याधुनिक अशा ग्रास कटर यंत्राचा वापर करणे फायदेशीर होऊ शकते.
या यंत्राच्या साह्याने साधारणतः गवत कापणीसाठी जास्तीत जास्त सात तास लागू शकतात. ग्रास कटर हे वापरायला सोपे, वजनाने हलके असून आकाराने लहान आहे तसेच ते बहुउपयोगी यंत्र आहे. सध्या बाजारात 1ते 2.5 अश्वशक्ति इंजिन असलेले ग्रास कटर उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी करून घेणे गरजेचे आहे, यामुळे वेळ आणि पैशांची बचत करता येईल.
Published on: 12 August 2020, 04:07 IST