डॉ.आदिनाथ ताकटे
शाश्वत पीक उत्पादन वाढीसाठी जमिनीची मशागत योग्य वेळी करणे महत्वाचे आहे. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून पिकांच्या वाढीसाठी, जमिनीमध्ये पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी मशागतीमध्ये नांगरटीस अनन्य साधारण महत्व आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीनंतर मशागतीची कामे त्वरित करणे पीक लागवडीच्या दृष्टीने फार आवश्यक आणि महत्वाचे समजले जाते म्हणूनच म्हटले आहे की, “मशागत काय खताला ऐकते?” म्हणून जमिनीची मशागत योग्य वेळी व योग्य पद्धतीने केल्यास आपल्याला त्यांची सत्यता पटेल.
कोरडवाहू क्षेत्रावर ज्वारी, करडई, सुर्यफुल आणि हरभरा यांची लागवड होते. पैकी सुर्यफुल आणि हरभरा या पिकांची काढणी बहुतांश भागात जानेवारी महिन्यातच उरकरलेली आहेत. तर ज्वारी आणि करडईची काढणी सर्वसाधारणपणे या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असते. जमिनीची नांगरट ही पिके निघताच जमिनीत ओल असेपर्यंत पूर्ण करावी म्हणजे हे काम कमी कष्टाचे व जलद होते. नांगरटीची कामे नेहमी उताराला आडवी करावीत. जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल आणि वाहून जाणाऱ्या पाण्याबरोबर होणारी जमिनीची धूपही थांबेल.
पिकाची काढणी करतो, त्यावेळी जमिन थोडीफार ओलसर असते अशावेळी शेत नांगरणीच्या कामास प्राधान्य दिले पाहिजे. पिकाची काढणी झाल्यानंतर जमिन उघडी होते. त्यामुळे जमिनीत काही प्रमाणात असणारी ओल कमी कमी होत जाते. तस तशी जमिन कडक बनत जाऊन जमिन नांगरणीस अवघड व अयोग्य बनतात. जमिनीची नांगरट पीक काढणीनंतर लगेच थोडी फार ओल असताना केल्यास नांगर शेतात एकसारखा चांगला लागतो. कमी खर्चात, कमी ताकदीत चांगली नांगरट होते. शेतात मोठया प्रमाणावर ढेकळे निघत नाहीत. त्यामुळे पुढील मशागतीची कामे चांगल्या प्रकारे करता येतात. जमिन पिकाच्या वाढीसाठी चांगल्या स्थितीत आणता येते.
कोरडवाहू शेतीमध्ये प्रामुख्याने अवर्षणप्रवण विभागातील जमिनीसाठी मशागत अधिक महत्वाची असते कारण या भागातील जमिनीत चिकण मातीचे प्रमाण अधिक असल्याने पावसाचे पाणी झिरपण्याचा वेग कमी असतो. तसेच पावसाची तीव्रताही जास्त असते. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी जमिनीत मुरायला वाव मिळाला नाही तर ते पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढते. त्याबरोबर मातीची धूपही मोठया प्रमाणात होते म्हणून या जमिनी मशागतीद्वारे चांगल्या भुसभुशीत करण्याची गरज असते.
पूर्वमशागतीच्या कामांचा विचार वाढत्या मजूरीशी सांगड घालूनच केला पाहिजे या दृष्टीने जास्त खर्चाची व श्रमशक्ती लागणारी नांगरटीसाठी मशागतीची कामे दरवर्षी आपण केलीच पाहिजेत असे नाही. आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकांच्या गरजेनुसार ही मशागत करणे आवश्यक आहे.
जेव्हा पाऊसकाळ सर्वसाधारण असतो तेव्हा रब्बी हंगामातील पेरणीपूर्वी जमिनीच्या ओलीची स्थिती आपण पहिली तर असे दिसते की, कमी अधिक मशागत केलेल्या खोलीच्या सर्व जमिनीत पुरेशी ओल झालेली असते. अशा जमिनीच्या खोलीची मर्यादा ठरलेली असल्याने साधारणतः ९० से.मी. पर्यंत ओल, रब्बीतील महत्वाच्या पिके उदा. ज्वारी, करडई, हरभरा या पिकांच्या वाढीसाठी पुरेशी पडते. या जमिनीसाठी दरवर्षी नांगरटची गरज असते. हरळी, कुंदा, लव्हाळ्या यासारख्या खोलमुळे असलेल्या तणांचा उपद्रव नसेल त्या ठिकाणी दर तीन वर्षांनी एकदा खोल नांगरट करावी. नांगरटीची गरज ही त्या जमिनीत घेतलेले आधीचे पिक कोणते होते त्यावरही ठरते. तूर, सुर्यफुल, यासारख्या पिकांच्या मुळ्या, धसकटे जमिनीत खोलवर गेल्याने कुळूवाच्या पाळीने निघणे सहसा होत नाही, अशा ठिकाणी नांगरट ही अत्यावश्यक ठरते.
नांगरट कशी करावी
नांगरट नेहमी उतारास काटकोन साधून करावी. त्यामुळे नांगराचे तास उतारास आडवे असल्याने पाणी सावकाश थबकत उताराच्या दिशेने पुढे जाते. त्यामुळे जमिनीत अधिक पाणी मुरायला वेळ मिळतो. येथे काही प्रमाणात पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही उक्ती साध्य होते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने मातीचे बारीक पण सहजासहजी पाण्याबरोबर वाहून जात नाहीत. अवकाळी आणि वळवाच्या पावसाने होणारी जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
नांगरट किती खोल करावी ?
जमिनीची नांगरट ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, तणांचा प्रकार व प्रादुर्भाव, स्थानिक हवामान पुढील हंगामात म्हणजे खरीप-रब्बीत घ्यावयाची पिके या सर्व गोष्टीचा विचार करूनच नांगरट किती खोल करावी हे ठरवावे. खोल जाणाऱ्या पिकांच्या मुळ्याकरिता खोल नांगरट व उथळ मुळाच्या पिकासाठी उथळ नांगरणी करणे जरुरीचे आहे. शिवाय प्रत्येक वर्षी शेतजमिनीत एकाच खोलीवर नांगर करू नये कारण त्यामुळे ठराविक खोलीवर एक टणक असा घट्ट थर तयार होतो. त्याला तवा धरणे असे म्हणतात. तो तवा फोडला नाही तर पिकाच्या मुळ्या त्या थरात शिरकाव करत नाहीत, अशा थरातून पाणी मुरण्यास आणि निचरा होण्यास वेळ लागतो.
नांगरटीनंतर वेळोवेळी ढेकळे फोडणे, जमिन सपाट करणे, जमिनीची कुळवणी करणे, जमिनीत भर खते मिसळणे, जमिनित लोड मारणे तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरावण्यासाठी विविध मृद व जलसंधारणाची कामे येत्या उन्हाळ्यात करून घ्यावीत
नांगरटीचे फायदे
नांगरटीमुळे जमिन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलीताचे पाणी जमिनीत सहज मुरते.
जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो.
थरांची उलथापालथ होते ,जमिन भुसभुशीत होते.
हवा,पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात व जमिनीतील जीवाणूंची वाढ होते.
पिकांची धसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते.
तणांचे बी नांगरटीमध्ये खोल गाड्ल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते.
खोल नांगरटीमुमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता जमिनीस पोषक ठरते.
तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारे नांगरटीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो.९४०४०३२३८९
Published on: 20 March 2024, 10:35 IST