Farm Mechanization

ऊस हे कृषि औद्योगिकदृष्टया महत्वाचे नगदी पिक आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होणारी ऊस उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही काळाची गरज बनली आहे. ऊस लागवडीचा जर विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 टक्के खर्च निव्वळ मजुरीवरच होतो. एकीकडे वाढत चाललेले मजुरीचे दर आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठी मजुरांची कमी उपलब्धता यामुळे शेतीमध्ये सुधारित अवजारांचा व यंत्राचा वापर करणे म्हणजेच यांत्रिकीकरण करणे अनिवार्य झाले आहे.

Updated on 14 October, 2018 7:55 AM IST

ऊस हे कृषि औद्योगिकदृष्टया महत्वाचे नगदी पिक आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होणारी ऊस उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही काळाची गरज बनली आहे. ऊस लागवडीचा जर विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 टक्के खर्च निव्वळ मजुरीवरच होतो. एकीकडे वाढत चाललेले मजुरीचे दर आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठी मजुरांची कमी उपलब्धता यामुळे शेतीमध्ये सुधारित अवजारांचा व यंत्राचा वापर करणे म्हणजेच यांत्रिकीकरण करणे अनिवार्य झाले आहे.

ऊसाच्या शाश्वत आणि अधिक उत्पादनासाठी पुर्व मशागत, लागण, आंतरमशागत तसेच कापणी इ. कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पध्दतीने होणे अत्यावश्यक आहे. ऊस पिकातील ही कामे करण्यासाठी मोठया प्रमाणात मजुर लागतात. परिणामी यासाठी होणारा खर्चही भरमसाठ होतो. हा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित अवजारांचा व यंत्राचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. सुधारित अवजारे बैलजोडीच्या सहाय्याने तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालविता येतात.

आधुनिक ऊस शेतीसाठी उपयुक्त काही अवजारांची माहिती खालीलप्रमाणे:

 

ट्रॅक्टरचलित ऊस लागवड यंत्र:

या यंत्राने सपाट जमिनीमध्ये दोन रिजरच्या सहाय्याने स-या पाडणे, अखंड ऊस टाकल्यानंतर औषध मारलेल्या ऊसाचे 30 से. मी. लांबीचे तुकडे करुन बेणे सरीत पाडणे, बेण्यावर माती पसरणे, दाणेदार खते पेरुन देणे, रोलरच्या मदतीने माती दाबणे इ. कामे एकाचवेळी केली जातात. त्यामुळे वेळेची, श्रमाची आणि पैश्यांची बचत होते. या यंत्राने 75 ते 90 से. मी. अंतरावर गरजेनुसार स-या पाडता येतात. या यंत्रासाठी 45 ते 50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक आहे.या यंत्राच्या वापरामुळे पारंपारीक पध्दतीपेक्षा साधारणपणे 35 ते 40 टक्के पर्यंत लागवड खर्चात बचत होते. या यंत्रामुळे एका दिवसात 4.5 ते 5.0 एकर क्षेत्र ऊस लागवड करता येते.

 

कृषिराज:

या औजाराला तीन लोखंडी फण असतात म्हणुनच या अवजाराचा उपयोग ऊसाला भर देणे व सरी वरंबा फोडण्यासाठी केला जातो; तसेच रिजर जोडून ऊसाची बांधणीही करता येते. कृषिराज अवजारामधील मधला फण काढल्यास हे अवजार ऊस लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी ऊसामधील आंतरमशागतीसाठी वापरता येते. मधला लोखंडी फण काढल्यामुळे कडेच्या दोन्ही फणांच्या मध्ये ऊस येतो व फणांच्या सहाय्याने ऊसाला दोन्ही बाजुनी थोडया प्रमाणात भर लागते. याचवेळी शिफारशीत नत्र खताचा दुसरा हप्ता (40 टक्के नत्र) द्यावा, म्हणजे दिलेली खतमात्रा मातीआड केली जाते. फुटवे फुटण्याचे प्रमाण वाढते व ऊसाच्या बगलेतील तणांचा बंदोबस्त करता येतो. या अवजाराच्या सहाय्याने एका दिवसात एक बैलजोडी दिड एकर क्षेत्रात आंतरमशागतीचे काम पुर्ण करते. याच अवजाराला तीनही फण जोडून ऊस लागणींनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी सरी वरंबा फोडण्यासाठी उपयोग करतात. सरी वरंबा फोडल्यामुळे जमीन सपाट व भुसभुशीत होते व ऊसाला भर दिली जाते याला ऊसाची बाळ बांधणी असे म्हणतात.

 

सायन कुळव:

या अवजारास दोन लोखंडी फणांना आडवी पास जोडलेली असते. सायन कुळव पाच ते साडेपाच महिन्यांनी ऊस लागवडीनंतर कृषिराज यंत्र चालविल्यानंतर लगेचच पाठीमागे चालवितात. या अवजारामुळे जमीन भुसभुशीत व सपाट होते. तणांचाही बंदोबस्त होतो त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो व माती भुसभुशीत झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात व पिकाची वाढ चांगली होते.

 

तीन पहारीचे औजार: 

या औजारास तीन लोखंडी पहारी 45 अंशाच्या कोनात जोडलेल्या असतात. या अवजाराचा उपयोग ऊस पिकातील सरी वरंबा फोडण्यासाठी केला जातो. ऊसाच्या बाळ बांधणीच्या वेळी या अवजाराचा वापर सरी वरंबा फोडण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी व तण नियंत्रण करण्यासाठी केला जातो.ऊस साडेचार पाच महिन्यांचा झाल्यावर ऊसाची मोठी बांधणी केली जाते. यावेळी तीन पहारीच्या यंत्राच्या सहाय्याने वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर रिजरच्या सहाय्याने मोठी बांधणी केली जाते.

 

लहान ट्रॅक्टरचलीत ऊस आंतरमशागत यंत्र:

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. आ. शिं. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथे हे यंत्र विकसित केलेले आहे. हे यंत्र 18.5 अश्वशक्ती ते 22.0 अश्वशक्ती लहान ट्रॅक्टरद्वारे चालविता येते. या यंत्राच्या सहाय्याने ऊसाची संपुर्ण आंतरमशागत करता येते. चार ते पाच फुटाच्या सरीत ऊसाला भर घालणे तसेच खते पेरुन देणे इ. कामे या यंत्राने अगदी सहज करता येतात. एका दिवसात हे यंत्र 6.5 ते 7.0 एकर क्षेत्राची आंतरमशागत करते.

 

ट्रॅक्टरचलित ऊस पाचट बारीक करण्याचे यंत्र:

ऊस कापणीनंतर शेतात सरासरी 8 ते 10 टन प्रती हेक्टरी पाचट जमिनीवर पसरलेले असते. या पाचटाचा वापर सेंद्रिय खत तयार करणेसाठी होऊ शकतो. या रोटाव्हेटर सदृष्य यंत्राने 3 फुट पिकांच्या खोडव्यात वापरुन सरीतील पाचटाचे 10 ते 15 से. मी. चे बारीक तुकडे करता येतात. या यंत्रात पुढच्या बाजुला असलेल्या रोलरमुळे पाचट सरीत दाबले जाते. रोटरवर मधल्या भागात बसविलेली 'जे' आकाराची पाती तुकडे करीत जातात तर दोन्ही बाजुस बसविलेली 'एल' आकाराची पाती वरंब्याच्या बगलेची माती काढुन पाचटासोबत थोड्या प्रमाणात मिसळली जाते. या यंत्राने दिवसभरात अडीच ते तीन एकरावरील पाचटाचे तुकडे करता येतात. हे यंत्र 45 ते 50 अश्वशक्ती ट्रॅक्टरद्वारे चालविता येते. या यंत्राने एका दिवसात 2.5 ते 3.0 एकर क्षेत्रावरील पाचट बारीक करता येते. ज्या शेतकऱ्याकडे रोटाव्हेटर उपलब्ध आहे त्यावर पात्याची जोडणी केल्यास कमी खर्चात हे यंत्र उपलब्ध होते.

प्रा. महेश पाचारणे (विषय विशेषज्ञ), डॉ. महेश बाबर (विषय विशेषज्ञ), प्रा. मोहन शिर्के (कार्यक्रम समन्वयक)
कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव, जि. सातारा 

English Summary: Mechanization in Sugarcane Different Machinery used in Sugarcane
Published on: 06 August 2018, 05:27 IST