महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
या निर्णयामुळे विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षकांसोबत विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय पशु चिकित्सा परिषद, भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि राज्य शासन यांनी शिक्षक समकक्ष म्हणून घोषित केलेल्या पदांना लाभ होणार आहे. वेतनाचे स्तर, सुरुवातीचे वेतन आणि कुलगुरु यांचे वेतन निश्चित करण्यात येईल.
या पदांना सुधारित वेतन संरचना आणि महागाई भत्ता व इतर भत्ते १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ ३८८ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर कार्यरत व्यक्तींना होणार आहे. याकरिता १७.९४ कोटी रुपये एवढा निधी थकित रकमेसाठी तसेच १२ कोटी एवढा निधी वार्षिक खर्चासाठी देण्यात येईल. या निर्णयासह मंत्रिमंडळात बाल संगोपन योजनेविषयीही चर्चा झाली.
बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात ४२५ वरून ११०० रुपये इतकी तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदानात प्रति बालक ७५ वरून १२५ इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे प्रति बालकास देण्यात येणारे अनुदान १ हजार २२५ रुपये इतके होईल. तसेच मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टण्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.
टप्पा-१ करिता अंदाजित किंमत २५० कोटी रुपये (करांसहित) इतकी आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो. डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. टप्पा २ करिता १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ व टप्पा २ निहाय कामाची एकूण रु. ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.
मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४०० कोटी रक्कमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.
Published on: 02 March 2021, 10:32 IST