मुंबई: उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही योजना उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात येणार आहे.
संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी 10 नोव्हेंबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणाचे विभागीय कार्यालय यांना 7 जानेवारी 2019 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) जमा करणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत अर्ज संबंधित कोणत्याही विभागीय कार्यालयात मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे.
Published on: 02 November 2018, 06:59 IST