मुंबई: इयत्ता 12 वी/पदवी/पदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60 % पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन मान्यताप्राप्त व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2018-19 मध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांची/विधवांचे पाल्य/ विधवा यांच्यासाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेबाबत नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक बोर्ड www.ksb.gov.in वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या वी.रत्नपारखी यांनी केले आहे.
नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्याकडून देशातून प्राप्त झालेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांना त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांनुक्रमे/कॅटेगरी नुसार एकूण 5 हजार 500 पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. यामध्ये मुले आणि मुलीं यांना प्रत्येकी समान 2 हजार 750 शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना 24 हजार रुपये आणि मुलींना 27 हजार रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते.
या शिष्यवृत्तीसाठी अधिकृत अभ्यासक्रमाची यादी तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्या www.ksb.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. पात्र असलेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांनी दि. 15 नोव्हेंबर 2018 पूर्वी दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Published on: 24 August 2018, 10:25 IST