मुंबई- कृषी क्षेत्राच्या विकासाला थेट प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतले जातात. शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना राज्य सरकारच्या (State government) वतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तुम्ही प्रयोगशील शेतीची कास धरलेली असल्यास पुरस्काराचे लाभार्थी होऊ शकाल. तुम्हाला उपयुक्त ठरणारी माहिती- पुरस्काराचे स्वरुप, अटी-शर्ती व उद्देश सर्व काही वाचा एका ठिकाण
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराची सुरुवात - सन 2000-2001 मध्ये करण्यात आली. कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती/संस्था/गटास हा पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येकी रक्कम रुपये 75,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे स्वरुप आहे.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार
या पुरस्काराची सुरुवात सन 1984 मध्ये करण्यात आली. दरवर्षी 10 व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, फलोत्पादन व ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-या शेतकरी / संस्था/ गटांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिजामाता कृषिभुषण पुरस्कार
या पुरस्काराची सुरुवात सन 1995 मध्ये करण्यात आली. एकुण 5 पुरस्कार्थींना सन्मानित केले जाते.
शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार–
या पुरस्काराची सुरुवात सन २००९ मध्ये करण्यात आली. एकूण ०९ पुरस्कार्थींना ( राज्यातून एक संस्था व प्रत्येक विभागातून १ शेतकरी याप्रमाणे ) गौरविण्यात येते. सेंद्रिय शेतीमध्ये अव्दितीय कार्य करणा-या शेतकरी / संस्था/गटांना सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी रक्कम रुपये ५०,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
Published on: 05 September 2021, 11:47 IST