दर वर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी बारावी पास होतात. इथूनच सुरु होतो खऱ्या कारकिर्दीला वळण देण्याचा मार्ग. अनेक विद्यार्थी ठरलेल्या पाऊल वाटा निवडून व्यावसायिक शिक्षण शाखांत प्रवेश घेऊन स्वतःला मुक्त झाल्याचा अनुभव करतात. पण केवळ प्रवेश मिळणे म्हणजे भविष्य सुरक्षित करणे नव्हे. स्पर्धेच्या आणि आधुनिकरणाच्या या चढाओढीत आपण रुळलेल्या पाऊल वाटा सोडून विचार करायला हवा. अनेक शाखा आहेत जिथे प्रचंड संधी आहेत आणि अत्यल्प स्पर्धा सुद्धा. पण आपल्याला सवयच झाली आहे जिथे लोंढा जाईल तिकडे पळत जायची. नित्य क्रमाने ठरलेल्या व्यावसायिक विद्या शाखांत सध्या संतृप्तता झाली असून पुढे रोजगार मिळण्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
शिवाय सर्वच व्यावसाईक शिक्षण शाखांची शिक्षण शुल्क हे सर्व सामान्य पालकांना डोईजड आहेच. त्यात हि व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण नसल्याने प्रवेश घेणारा विद्यार्थीच त्यात होरपळून निघतो. त्या विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान सुद्धा शास्त्र शुद्ध पद्धतीने मिळत नाही आणि त्यात प्रात्येक्षिक ज्ञान किंवा कौशल्याचा अभाव असतो.
आज शेतकऱ्याची अवस्था खूप बिकट आहे असे चित्र सर्वत्र आपल्याला दिसते. शेतकऱ्याचे उत्पन्न आणि दर्जा वाढवायचा असेल तर शेतकऱ्याला शैक्षणिक दृष्टिकोन दिला पाहिजे. यासाठी शेतकऱ्याने आपल्या किमान एका अपत्याला किंवा घरातील व्यक्तीला कृषी आणि संलग्न विद्या शाखांत प्रवेश घ्यावयास हवा. अशा परिस्थिती व्यावसायिक शिक्षण शाखांत कृषी आणि कृषी संलग्न विद्याशाखा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बी.एस.सी (अॅग्रीकल्चर), बी.एस.सी (हॉर्टिकल्चर), बी.एस.सी (अॅग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी), बी.टेक (फूड टेकनॉलॉजी), बी. टेक (अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी) आणि बी.एस.सी (अॅग्रीकल्चर बिझनेस मॅनॅजमेण्ट) अशा विविध पदवी या कृषी शिक्षण शाखांच्या असून प्रत्येक शाखा एक शाश्वत रोजगार निर्मितीचे आणि रोजगार हमीचे ग्वाही देते.
वाढती लोकसंख्या, शहरी भागाकडे लोकांचा वाढता कल, ग्रामीण भागातील समस्या, पाण्याची टंचाई, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, अनिश्चित हवामानातील बदल या आणि अनेक कारणामुळे शेतीमुळे प्रगती होण्याचा सूर्य अस्तास गेल्याचे दिसते. शेतीच प्रमुख व्यवसाय असणाऱ्या देशात शेतीचे बळकटी करण करणे अनिवार्य आहे. कृषी शिक्षणामुळे आजच्या आधुनिक तरुण वर्गाला शेती विषयी जागरूकता निर्माण होऊन निसर्ग संवर्धाची ओढ निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. शेती व्यवसायाला पत आणि प्रतिष्ठेचा दृष्टिकोन या कृषी शिक्षित पदवीधरांमूळे मिळणे शक्य होणार आहे. कृषी शिक्षणामुळेच विविध वनस्पतीच्या जाती प्रजातींचे संवर्धन, अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांची निर्मिती, कृषी पूरक उद्योग व्यवसायाला चालना, अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषी संलग्न विपणन आणि व्यापार अशा सर्वांगाने विकास साधने सहजच होईल. शास्त्र शुद्ध पद्धतीने शेती आणि तांत्रिक पद्धतीने शेतीमालाचे मूल्यवर्धन हे कृषी शिक्षणामुळे सोपे होईल. तेव्हा कृषी शिक्षणातून सर्वोतोपरी विकास घडून शाश्वत प्रगती होणार.
प्रा. (सौ.) एस. एन. चौधरी
के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक
880676678
Published on: 04 October 2018, 06:01 IST