Education

जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, पुढील ३५ वर्षांमध्ये आपणास कृषी उत्पादनात ६० टक्क्याहून अधिक वाढ करावी लागणार आहे. यासाठी कृषीचे अभ्यासक लिसाने मेनलेंडीजकस व अलेक्‍झन्ड्रातोस (सन २०१२) यांच्या निष्कर्षानुसार सन २०५० पर्यंत जागतिक अन्न सुरक्षेची गरज भागविण्यासाठी कुशल शिक्षित व व्यावसायिक कृषी मनुष्यबळाची गरज भासणार आहे. सध्या कृषी क्षेत्राला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी कृषी या व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे.

Updated on 18 June, 2018 3:37 PM IST

जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, पुढील ३५ वर्षांमध्ये आपणास कृषी उत्पादनात ६० टक्क्याहून अधिक वाढ करावी लागणार आहे. यासाठी कृषीचे अभ्यासक लिसाने मेनलेंडीजकस व अलेक्‍झन्ड्रातोस (सन २०१२) यांच्या निष्कर्षानुसार सन २०५० पर्यंत जागतिक अन्न सुरक्षेची गरज भागविण्यासाठी कुशल शिक्षित व व्यावसायिक कृषी मनुष्यबळाची गरज भासणार आहे. सध्या कृषी क्षेत्राला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी कृषी या व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे.

कृषी शिक्षण म्हटले, की आपणास आधुनिक तंत्रज्ञान शेती नव-नवीन पिकांचे अधिक व दर्जेदार उत्पन्न देणारे वाण, आधुनिक सिंचन पद्धती, संरक्षित शेती म्हणजे पॉलिहाऊस, ग्रीन हाउस व शेडनेटमधील शेती, यांत्रिक शेती, फळे व भाजीपाला उत्पादन व यावर प्रक्रिया तंत्र, निर्यातक्षम शेती इत्यादी गोष्टी डोळ्यासमोर येतात. परंतु, यासाठी कुशल मनुष्यबळ, शास्त्रज्ञ/ प्राध्यापक व क्षेत्रीय कृषी अधिकारी/ कर्मचारी यांची गरज लागणारच व त्यांचा सहभाग, योगदान मोलाचे असणार आहे. शेतकरी तसेच बदलत्या परिस्थितीत शास्त्राची कास धरणारा प्रगतिशील शेतकरी ही कृषी व्यवसायाचा कणा आहे. या सर्वांच्या सहभागातूनच आपला देश कृषी व्यवसायामध्ये सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध होणार आहे. महाराष्ट्राचे स्थान कृषी क्षेत्रात अव्वल आहे. सन १९६० नंतर आपल्या देशाने हरितक्रांती, धवल क्रांती, पीत क्रांती घडविली आणि आपण अन्नधान्य, दूध, तेलबिया, कडधान्ये, फळे यांमध्ये स्वयंपूर्ण झालो आहोत.

कृषी क्षेत्रास आजही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असे म्हटले जाते. जागतिक जीडीपीमध्ये कृषीचा आठ टक्के सहभाग, जगाच्या लोकसंख्येपैकी १८ टक्के लोकसंख्या भारतात, जगातील उपयुक्त जमिनीपैकी ९ टक्के जमीन भारतात, भौगोलिक क्षेत्र जगाच्या २.३ टक्के भारतात, देशात उपलब्ध मनुष्यबळाच्या ५२ टक्के रोजगार एकट्या कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे.

कृषी शिक्षणाची सुरवात सन १९०० नंतर देशात पाच कृषी महाविद्यालयांची स्थापना पुणे, नागपूर (महाराष्ट्र), कोइमतूर (तमिळनाडू), लायलपूर, पुसा (बिहार) या ठिकाणी स्थापन करून झाली आहे. या सर्व कृषी शिक्षण संस्थांनी आज शंभरी ओलांडली असून, आज आपला देश कृषी तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढीमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. यामध्ये या संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

कृषी शिक्षणाचे महत्त्व
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणानंतर कृषी शिक्षणाविषयी विचार होत आहे. औद्योगिक विकासानंतर जगामध्ये तसेच आपल्या देशातही व राज्यात कृषी विकासाला खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उपलब्ध मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज यामध्ये सध्या अंतर वाढत असल्याचे दिसून येत असल्याने विद्यार्थी वर्ग कृषी क्षेत्राकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. कृषी शिक्षणानंतर मुख्यत्वे पदवी, पदव्युत्तर तसेच पीएचडी पदवीनंतर संपूर्ण जगामध्ये व आपल्या देशातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था, शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे, केंद्रीय व राज्यस्तरीय कृषी व संलग्न विभाग, कृषी विषयक बी-बियाणे, खते, औषधे संबंधीच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या, कृषी प्रक्रिया उद्योग, कंपन्या, निर्यात, विपणन, बॅंका, स्वयंसेवी व खासगी संस्था या व अशा विविध क्षेत्रामध्ये कृषी-शिक्षित कुशल मनुष्यबळ गरजेचे आहे. याचबरोबर कृषी शिक्षणाला मागील काही वर्षांपासून वेगळे महत्त्व दिले जात आहे. स्पर्धा परीक्षेतली कृषी पदवीधरांचे यश वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने युपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्‍शन, बॅंका, मंत्रालयीन अधिकारी यामध्ये विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे अधिकच कल वाढला आहे. यासंबंधी महत्त्वाच्या संस्था व त्यासाठी लागणारे कृषी शिक्षित मनुष्यबळ यांची थोडी आकडेवारी समजल्यास आपणास कृषी शिक्षणाचे महत्त्व संधी याविषयी अधिक माहिती होण्यास मदत होईल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) ही या देशातील जगातील सर्वांत मोठी राष्ट्रीय कृषी शिक्षण व संशोधन पद्धती असणारी संस्था आहे.

यावर्षी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न विषयांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सामाईक प्रवेश प्रक्रिया (सी.ई.टी.) लागू करण्यात आली आहे. यासंबंधी १२ वी शास्त्र शाखेतील इच्छुक विद्यार्थ्यांनी सी.ई.टी.च्या संकेतस्थळावरून सविस्तर माहिती घेऊन खालीलप्रमाणे कृषी विषयक व संलग्न १० पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधी तयारी करणे आवश्‍यक आहे.

कृषी क्षेत्र हे जगातील सर्वांत मोठे खासगी व्यावसायिक क्षेत्र असून, या क्षेत्रामध्ये पुरेसे, सुरक्षित, उत्तम दर्जाचे अन्न पुरविण्याची क्षमता असून, मानवाचे जीवन सुदृढ करण्याचे मोलाचे कार्य या क्षेत्रातून होत आहे आणि यापुढेही चालू राहील याची खात्री आहे. यामध्ये आपणही सहभागी होऊया. वरील सर्व विषयांत उच्च शिक्षणाच्या (पदव्युत्तर/ आचार्य) संधी राज्यात चारही कृषी विद्यापीठांत उपलब्ध आहेत. तसेच पारंपरिक शिक्षणासोबत असणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा व अभ्यासेतर उपक्रम/ स्पर्धा कृषी शिक्षणाच्या सर्व महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. राज्यात कृषी शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणाच्या संधी देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. कृषी शिक्षण हे व्यावसायिक असल्यामुळे शेतीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील या शिक्षणाचा उपयोग होतो. या अनुषंगाने कृषी शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व त्यांचे पालक यांना पुढील यशस्वी वाटचालीस व महान कार्यातील सहभागास शुभेच्छा!

 

डॉ. हरिहर कौसडीकर,
संचालक (शिक्षण) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.

English Summary: Agricultural education and opportunities
Published on: 18 June 2018, 03:37 IST