1. पशुसंवर्धन

कुक्कुटपालनात यशस्वी व्हायचंय का ? तर मग अंमलबजावणी करा १०० सूत्री कार्यक्रमाची

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कोरोना विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व जनता आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहारात अंडी,मासे,चिकन मटण यांचा दैनंदिन वापर करणे महत्वाचे झाले आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा किंवा मुख्य व्यवसाय म्हणून स्विकारल्यास अमुलाग्र क्रांती घडून येते.शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीठ तर कधी शेतमालाला भाव कमी असल्याने कायमस्वरूपी उत्पन्नाची हमी नसते. अल्पभुधारक शेतकऱ्यांना केवळ शेतीच्या भरवश्यावर आपला प्रपंच चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. वाढती लोकसंख्या जमिनीचे विभागीकरण यामुळे बळीराजाला उत्पन्न कमी मिळत आहे. शेतीशी निगडित पशुपालन हा व्यवसाय फायदेशीर ठरतो तसेच या व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी उदा. खाद्य,पक्षी, लस औषधे सहज उपलब्ध होतात. यासर्व गोष्टींचा बारीक विचार करता कुक्कुटपालन व्यवसाय सोपा आणि कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. तसेच विक्रीसाठी जास्त कष्ट करावे लागत नाही.

व्यापारी माल शेडवरून बोली लावून खरेदी करतात त्यामुळे रोख पैसे शेडवर मिळतात. वाढते मटणाचे दर लक्षात घेता सर्व सामान्य जनतेच्या खिश्याला परवडणारे नसल्याने पोल्ट्रीचे चिकन स्वस्त, असते परवडते देखील मानवी आहारात शरिराची गरज भागवण्यासाठी वार्षिक १८० अंडी व ११ किलो चिकन तसेच प्रथिनांची व चरबीयुक्त पदार्थांची खूप गरज असते.कुक्कुटपालन व्यवसायात कोंबडी खत देखील मिळते. त्याची चांगल्या दराने विक्री देखील करता येते. सेंद्रिय खतामुळे रासायनिक खताचा खर्च कमी येतो, जमीन सुपीक बनते, पीक चांगले येते. कुक्कुटपालनात अगदी थोड्या कालावधीत आर्थिक भांडवल निर्माण होते, त्यामुळे लवकरात लवकर प्रगती साधता येते. तसेच शेजारच्या एक-दोन मजुरांना रोजगार निर्मिती होते. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय केल्यास बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होते.   

  • शेड संबंधित-

१) पक्ष्यांचे शेड उंच व पूर्व-पश्चिम दिशेमध्ये असावे.

२) शेडसाठी जागा निवडताना उंचावर तसेच माळरानावर जिथे लोकवस्ती नसेल व दुसरे पोल्ट्री शेड नसतील अशा ठिकाणी निवडावी.          

३) शेड मांस किंवा अंडी देणाऱ्या पक्षासाठी बनवायचे आहे ते पाहिले निश्चित असावे, तसेच शेडच्या छताला पांढरा रंग किंवा चुन्याचा मुलामा द्यावा. 

४) शेडमध्ये भरपूर हवा खेळती राहील अशी रचना असावी.

५) शेडचा पाया जमिनीपासून २-३ फूट उंच व भक्कम असावा. तसेच शेडसाठी रुंदी २५-३० फूट व लांबी गरजेनुसार असावी. 

६) एका पक्षासाठी साधारण जागा १ चौ.फूट पुरेशी असते.

७) शेडच्या एकूण मर्यादेपेक्षा १० टक्के पक्षी कमी ठेवा.

८) शेडच्या सभोवताली वर्षभर हिरवीगार व सावली देणारी झाडे लावावीत. जेणेकरून तापमानाची त्रीव्रता कमी होईल.

९) शेडमधील तापमान कमी करण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाचा गरजेनुसार वापर करावा उदा फॉगर,स्प्रिंकलर, कुलर,एसी इत्यादी.   

१०) गरजेनुसार शेडमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे बसवावे. 

पिल्लांसंबंधित–

११) एका दिवसाची पिल्ले शक्यतो शासकीय अंडी उबवणी केंद्रातूनच घ्यावीत.तसेच पक्ष्यांच्या शरीराचे तापमान साधारणतः४०-४१ अंश सेल्सिअस (१०७ डिग्री फॅरेनहाइट) एवढे असावे.

१२)पिल्लांची उबवणी केंद्रातून वाहतूक करताना ती व्यवस्थितरित्या करावी.

१३)वाहतुकीमध्ये पिल्लांची जास्त आदळ आपट होऊ नये म्हणून चांगल्या प्लास्टिकच्या खोक्यांचा वापर करावा.

१४) बॉक्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त पक्षी भरू नये, अन्यथा गुदमरून पक्षी मरतात. 

१५)पक्ष्यांची जास्त वाहतूक जास्त लांबीची असेल तर त्यांना कलिंगडाच्या फोडी खाण्यास टाकाव्यात.

१६) पहिले ४८-७२ तासापर्यंत पिल्लांना काहीही खाण्यास दिले नाहीत तरी चालते परंतु उन्हाळ्यात अधून मधून पाणी देणे चांगले.  

१७)पिल्ले आपल्या शेडवर आल्यानंतर त्यांना गुळ पाणी द्यावे.

१८)पिल्ले स्वच्छ व चपळ असावीत व योग्य वजनाची सदृढ पिल्ले खरेदी करावीत.

१९)पिल्ले हळूच एक-एक करून ब्रुडर खाली सोडावीत असे करत असताना पक्षांना ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

२०)पहिल्या आठवड्यानंतर ब्रुडर गार्ड काढून घ्यावीत.

२१)हिवाळ्यात थंडीची लाट जास्त असल्यास बल्ब, इलेक्ट्रिक हिटर तसेच कोळश्याच्या शेगड्या ठेवाव्यात, घरे उबदार कशी राहतील याची काळजी घावी.

 

  • गादी संबंधित-

२२) गादीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सहज उपलब्ध होणारे स्वस्त, ताजे स्वच्छ,कोरडे व ते कुजणारे असावे जेणेकरून त्याचा फायदा होईल.

२३) गादीमध्ये विष्टेतील ओलावा शोषून घेण्याची क्षमता असावी, उदा.लाकडाचा भुसा  तसेच तांदळाची तूस वापरावी. 

२४) ऋतूनुसार गादीची उंची कमी जास्त असावी. उन्हाळ्यात गादीची उंची कमी चालते. परंतु हिवाळ्यामध्ये १.५-२  इंच असावी. जेणेकरून थंडी जास्त वाढल्यास गादीमुळे पक्षांना उब मिळते.

२५) लिटर/गादी दिवसातून २ वेळा हलवावी जेणेकरून विष्ठेचा वास येत नाही व त्याची लवकर पावडर तयार होते.

२६) गादी कोरडी राहण्यासाठी १०० चौ.फूटसाठी १ किलो चुन्याचा वापर करावा.

२७) शेडमधील लिटर कायम कोरडा राहील याची दक्षता घ्यावी, भिजलेले लिटर त्वरित काढून टाकावे अन्यथा ते कुजून वास येतो.

२८) सर्व पक्षी विकल्यानंतर गादी काढून कंपोस्ट खड्यात टाकावे. व नवीन बॅचसाठी नवीन गाडी वापरावी. 

खाद्य संबंधित-

२९) सुरवातीचे १-२ दिवस लहान पिल्लांना मकेचा लहान भरडा मॅश स्वरूपात द्यावा.

३०) पक्ष्यांच्या वयाच्या वाढीनुसार खाद्यमध्ये बदल करावेत. उदा.प्री स्टार्टर, स्टार्टर, आणि फिनिशर इ.

३१) खाद्य लहान पिल्लांसाठी बारीक व मोठ्या पक्ष्यांसाठी भरडा स्वरूपातील असावे.

३२) पक्षांचे खाद्य बनवताना पक्षांची जात,वय,सिझननुसार फॉर्मुलेशन बनवून घ्यावेत

३३) पक्षांच्या खाद्यामध्ये क्षार व जीवनसत्वे यांचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वाढवावे.

३४) उन्हाळ्यात पक्षांना सकाळी लवकर तसेच रात्री उशिरा खाद्य द्यावे. थंड हवेत  पक्षी जास्त खाद्य खातात.    

३५) देशी कोंबड्यांच्या मांस व अंडी उत्पादनात वाढ व्हावी, म्हणून पुरेशा प्रमाणात संतुलित खाद्य द्यावे.

३६) अंड्यावरील पक्षांना चांगल्या लेयर फीड खाद्य द्यावे. व मांसल पक्षांसाठी प्रथिनांची गरज साधारणत २०,१८ व१६ टक्के वयानुसार ती कमी जास्त होते.  

३७) भिजलेले, बुरशीयुक्त काळे पडलेले खराब झालेले खाद्य पक्षांना देऊ नये.तसेच खराब झालेले लीटर,विष्टा त्वरित काढून शेडपासून दूर ठिकाणी टाकावे.

३८) खाद्याची भांडी पक्ष्यांच्या वयानुसार लहान-मोठी दोन्ही स्वरूपाची असावीत.व भांडी वेळोवेळी स्वच्छ करावीत.तसेच पक्षांच्या संख्येच्या प्रमाणात खाद्याची भांडी ठेवावीत. 

३९) कुक्कुट व्यवसायिकांनी पक्षांचे खाद्य स्वतः तयार केल्यास खर्चात खूप बचत होते. आणि विशेषतः पक्षांना पौष्टिक व चविष्ट आहार मिळतो.

४०) खाद्यासाठी शेडवर एक खोली असावी उघड्यावर खाद्य झाकून ठेवू नये.

  • निरीक्षणा संबंधित-

४१) पक्षांची परिस्थिती तपासण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी सर्व शेडचे बारकाइने निरीक्षण करावे.

४२) सर्व पक्षी खाद्य खातात का पाणी पितात का या बाबींची पाहणी करावी.

४३) भांडी खाली पडली असतील तर व्यवस्थित करावीत, खाद्य नसेल तर टाकावे. पाण्याच्या भांड्यात पाणी आहे का ते पाहावे. 

४४) पक्षांमधील असामान्य वर्तवणूक ही रोगाची लक्षणे असतात त्यावेळी त्वरित रोगाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

४५) मेलेल्या पक्ष्यांचे शवविच्छेदन करून त्वरित जाळून किंव्हा खड्ड्यात पुरून टाकावेत.

४६) विजेचे बल्ब चालू आहेत का याची तपासणी करावी.

४७) चीक गार्ड पडले असेल तर व्यवस्थित करावे.

४८) आजारी, अशक्त, कमी वजनाचे पक्षी ओळखून वेगळे करावेत.

४९) तांदळाची तूस किंव्हा भुसा एका बाजूला गेला असेल तर समप्रमाणात करावा.

५०) सर्व पक्षांची हालचाल योग्य होते का ते पाहावे. 

 

 

  • लसीकरणा संबंधित-

५१) प्रतिबंधात्मक लस निरोगी पक्षांनाच द्यावी.

५२) लसीकरणामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रोग येत नाहीत, तसेच मृत्यूदर कमी होतो. 

५३) लस टोचण्या अगोदर व टोचल्यानंतर दोन दिवस जीवनसत्वे पाण्यातून द्यावीत.

५४) पक्ष्यांच्या वयानुसार वेळेवर योग्य पद्धतीने लसीकरण करावे.

५५) लसीकरण केल्यावर काचेच्या बाटल्या,सिरिंज,ड्रॉपर खोल खड्ड्यात पुरावेत.

५६) लस तयार केल्यावर ३-४ तासात संपवावी जेणेकरून प्रभाव लवकर जाणवेल 

५७) पक्ष्यांना डोळ्यात लस दिल्यानंतर पक्षी अलगत खाली सोडावा.

५८) लसीचा ड्रॉपर हातात धरल्याने त्याचे तापमान वाढते ठराविक वेळाने लस बर्फामध्ये ठेवावी व पुन्हा वापरावी जेणेकरून थंड लस डोळ्यात पडेल.  

५९) लसीकरण नेहमी उन्हाची त्रीव्रता कमी असेल अशावेळी करावे जेणेकरून पक्षी ताण-तणावाखाली जाणार नाही.

६०) लसीकरण रात्री ८ च्या पुढे केल्यास पक्षी तणावाखाली जात नाहीत, त्यामुळे मृत्यूदर कमी येतो.   

६१) लस तयार करण्यासाठी पिण्याच्या पाण्यात क्लोरीन मिसळलेले नसावे नाहीतर लसीचा फायदा होणार नाही. तसेच  पाण्याद्वारे लसीकरण करताना पाण्यात स्कीम मिल्क पावडर ६-८ ग्रॅम प्रति ली पाण्यात मिसळून द्यावी.

६२) पाण्याद्वारे लसीकरण करावयाचे असल्यास किमान १.५-२ तास अगोदर पाण्याची भांडी काढून घ्यावीत जेणेकरून पक्षांना तहान लागल्यावर लसीकरण केलेले पाणी लवकर पितील व लवकरच लसीचा प्रभाव जाणवेल.

विलगीकरणा संबंधित-

६३) ज्या पक्षांची वाढ होत नाही असे पक्षी वेगळे करून उपचार करावेत.

६४) रोगट पक्षी शेडमधून त्वरित काढून टाकावेत जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही.

६५) अशक्त, अपुरी वाढ झालेले पक्षी काढून त्यांना स्वतंत्र ठेवून चांगल्या प्रकारचा औषधोपचार करावा.  

६६) कमी वयाच्या पक्षांना सुधारण्यासाठी संधी द्यावी तसेच प्रथिनेयुक्त खाद्य व पाणी टॉनिक द्यावे.

६७) एकदा वेगळे केलेले पक्षी पुन्हा एकमेकांत मिसळू नयेत.

६८) नवीन पक्षी आणून जुन्या पक्षांमध्ये मिसळू नयेत.  

पाण्यासंबंधित-

६९) स्वच्छ व भरपूर् पिण्याचे पाणी पक्षांना द्यावे.

७०) पाण्याचा पी एच साधारण ६- ६.५  दरम्यान असावा

७१) उन्हाळ्यात पक्षांवरील ताण कमी करण्यासाठी इल्केकट्रोलाइट पावडर व जीवनसत्व क चा वापर करावा.

७२) गुळ किंवा साखर ५-७ ग्रॅम प्रति ली पाण्यातून द्यावे. जेणेकरून पक्षांवरील ताण कमी होईल.  

७३) पाण्याच्या भांड्याची जागा सतत बदलावी म्हणजे गादी कुजत नाही. 

७४) क्षारयुक्त पाणी पक्षांना देऊ नये. अन्यथा निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा वापर करावा.

७५) गरजेनुसार लिव्हर टॉनिक पाण्यातून पक्षांना द्यावे. 

७६) फिल्टर केलेले पाणी पक्ष्यांना दिल्यास पचन चांगले होते. तसेच जंतुसंसर्ग टाळता येतो. वजन वाढीमध्ये फरक पडतो, परिणामी उत्पादन वाढते.   

भांड्या संबंधित-

७७) पहिले २-३ दिवस फिडरमधून खाद्य खायला पिल्लांना जमत नसल्याने शक्यतो पेपर किंव्हा कमी उंचीच्या डिश मध्ये ठेवावे.

७८) सुरवातीला खाद्य व पाण्यासाठी चीक फीडर्स किंव्हा चीक ड्रिंकर्स वापरावीत. काही दिवसानानंतर स्वयंचलित किंव्हा अर्धस्वयंचलित प्रणाली वापरावी.  

७९) पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी नेहमी स्वच्छ धुवावीत.

८०) फुटकी तसेच कुजकी भांडी वापरू नयेत परिणामी खाद्य व पाणी सांडते.  

८१) भांडी नेहमी जंतुनाशक पाण्याने धुवावीत.

८२) स्वछता व निर्जंतुकीकरणाला कुक्कुट व्यवस्थापनात जास्त महत्व द्यावे.  

 

  • नोंदी संबंधित-

८३) पक्षी शेडवरती आणल्यानतंर मोजून घावेत व त्यांचे सरासरी वजन करावे. 

८४) पक्षी शेडवरती आणलेली तारीख, वेळ लिहून ठेवावी.

८५) लसीकरणाची तारीख, वेळ लसीचे नाव, बॅच नं इ बाबी लिहून ठेवाव्यात.

८६) जमा खर्चाच्या नोंदी लगेचच लिहून ठेवाव्यात.    

८७) हिशोब नोंदवहीत व्यवस्थित न ठेवल्यास तोटा होतो.

कामगारा संबंधित-

८८) कामगार सुशिक्षीत तसेच कुशल असावा. त्यांना खाद्य, पाणी, लसीकरण,व रोगासंबंधित संपूर्ण माहिती असावी.

८९) कामगार कामचुकार तसेच व्यसनी नसावा.

९०) कामगारांनी वेळच्या वेळी खाद्य व पाणी पुरवणे आवश्यक असते दिरंगाई चालत नाही. 

९१) पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या कामगाराशिवाय नवीन व्यक्तींना प्रतिबंध घालावा जेणेकरून विषाणूजन्य रोगाचा प्रसार टाळता येतो.

९२) फार्मच्या प्रवेशदारावर शु कव्हर तसेच जंतुनाशक द्रावणाचे फवारे पाय बुडवण्याचे भांडे (फूट डिप्स)  ठेवावेत.

९३) कामगार सारखा-सारखा बदलू नये. शिकवण्यात खूप वेळ जातो.

  • विक्री संबंधित-

९४) पक्षांची विक्री आठवडी बाजारात किंव्हा भाजी मंडईत दररोज करू शकतो.

९५) गावातील तसेच शहरातील स्थानिक मटण व चिकन दुकानदारांना विक्री करू शकतो.

९६) मांसाहारी हॉटेलमध्ये त्यांच्या ऑर्डरनुसार वर्षभर चिकन व अंडे पुरवू शकतो.

९७) किरकोळ तसेच घाऊक व्यापाऱ्यांना अंडे व पक्षांची मोठ्या प्रमाणात विक्री करू शकतो.  

९८) कॉलेजच्या खानावळी, कॅन्टीनमध्ये आठवड्यातून दोन वेळेस अंडे,चिकन कायमस्वरूपी पुरवू शकतो. 

९९) न उकडलेल्या तसेच उकडलेल्या अंड्यांची विक्री व्यायाम शाळेसमोर दररोज सकाळी व संध्याकाळी करू शकतो.

१००) शिक्षक कॉलनी, डॉक्टर्स, वकील, पोलीस इत्यादी लोकांना फ्रेश स्वच्छ अंडे, चिकन, मटन, मासे दर आठवड्याला त्यांच्या मागणीनुसार घरपोच सेवा दिली तर ग्राहक वर्ग कायमस्वरूपी होऊन विक्री सहज शक्य होईल.

 टिप- पक्षांची वाढ पूर्ण झाल्यावर ५ ते १० पक्षी निवडून त्यांचे चिकन सॅम्पल पृथक्करण लॅबला पाठवून पोल्ट्री विभागाच्या तज्ज्ञांकडून ते चिकन संवेदी मूल्यांकनासह प्रमाणित आहे का नाही याची खात्री करूनच ग्राहकापर्यंत पोहचावे तसेच त्यांच्या मध्ये असणारी पौष्टिक पदार्थाचा रिपोर्ट ग्राहकांना किंवा व्यापाऱ्यांना द्यावा जेणे करून पारदर्शकता दिसून येईल आणि मानवी आरोग्यास कोणताही धोका निर्माण होणार नाही.

लेखक -

प्रा.नितीन रा. पिसाळ

प्रशिक्षक,(स्किल इंडिया प्रोजेक्ट)

विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.

ई-मेल-nitinpisal2312@gmail.com

         

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters