शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी शेती नंतरचा प्रमुख आर्थिक कणा आहे. कारण शेतीसोबत पशुपालन व्यवसाय केल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू चांगल्यापैकी भक्कम राहते. परंतु पशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी देखील खूप काही गोष्टींची आवश्यकता असते. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्यवस्थापन तर महत्त्वाचे असतेच परंतु त्याच्या सोबत काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते.
जर पशुपालकांनी या छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या असणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित केले तर पशुपालन व्यवसाय नक्की शेतकऱ्यांसाठी फायद्याचा व किफायतशीर होईल यात शंकाच नाही.
या लेखामध्ये आपण अशाच काही छोट्या पण महत्वाच्या ट्रिक्स पाहणार आहोत, शेतकऱ्यांना पशुपालनाचा धंदा किफायतशीर बनवण्यासाठी साहाय्यभूत ठरतील.
नक्की वाचा:सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
पशु पालनाचा व्यवसाय किफायतशीर बनवण्याकरिता महत्त्वाच्या असलेल्या बाबी
1-पशुपालनाचा धंदा जर आर्थिक दृष्ट्या तुम्हाला फायद्याचा बनवायचा असेल तर जनावरांचा आहार व्यवस्थापन,त्यांचे आरोग्य व्यवस्थापन तसेच नियमित देखभाल व प्रजनना संबंधित असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.
2- प्रजोत्पादनासाठी जनावरांनी माज दाखवणे पासून सुरू होते. जनावरांची नियमित माज दाखवण्याशी आहाराचा व शरीरक्रिया यांचा जवळचा संबंध असल्यामुळे आहार व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
3- गाई व म्हशीतील माजाचा काळा सरासरी 12 ते 14 तास असतो.
4- यामध्ये माजावर आलेली जनावरे भरवण्याची योग्य वेळ देखील महत्त्वाचे आहे. समजा जनावर जर सायंकाळी माजावर आले तर दुसऱ्या दिवशी सकाळी भरवणे फायद्याचे असते तसेच सकाळी माजावर आले तर जनावर सायंकाळी भरवणे फायद्याचे ठरते.
5- तुमच्याकडे असणाऱ्या गाई किंवा म्हशी त्यापासून जास्त दूध देणाऱ्या कालवडी किंवा पारड्या तुम्हाला हवे असतील तर कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा.
6- जनावर भरल्यानंतर दोन महिन्यानंतर ते गाभण आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.
7- नवजात वासरांचे गर्भावस्थेत पोषणाशी संबंधित लक्ष पुरवणे खूप गरजेचे आहे. गाभण जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण नवजात वासराची भविष्यातील प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेत पोषण कसे झाले आहे त्याच्याशी संबंधित असते.
8- गर्भात वासरू चांगले वाढावे व प्रसूती सुलभ व्हावी व भरपूर दूध मिळावे यासाठी गाभण जनावरांची गाभण काळात खूप निगा ठेवणे गरजेचे आहे.
9- जनावर व्यायल्यानंतर ताबडतोब वासरू उचलून घेतले तर वासरा शिवाय पान्हा सोडण्याची गाईंना व म्हशींना सवय लावता येते.
10- पहिला माज दाखवण्यासाठी जनावरांचे वय 14 ते 18 महिने व वजन 250 ते 300 किलो असणे गरजेचे आहे.
11- तुम्हाला जर गोठ्यातील गाय किंवा म्हशीचे दोन वेतातील अंतर कमी करायचे असेल तर व्यायल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी पुन्हा गाभण राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
12-जास्त करून गोठ्यात वांझोटी जनावरे ठेवू नयेत.जनावरांमध्ये वांझपणाची समस्या ही जास्त करून माज न ओळखल्याने असते. तेव्हा मुक्का माज असणारी जनावरे पशुवैद्यकाकडून तपासून घेणे गरजेचे असून त्यांच्या सल्ल्यानुसारच भरवावीत.
13- तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांमध्ये गाभण काळात असो किंवा कुठल्याही परिस्थितीत थोडी जरी आरोग्यविषयक समस्या दिसून आली तर पटकन पशुवैद्यकाचा सल्ला घेणे गरजेचे असते.
Published on: 16 October 2022, 05:06 IST