शेतीला पुरकव्यवसाय म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. शेतीमधून हंगामी वातावरणात शेतकऱ्यांना उत्पन्न तर भेटतेच मात्र दूध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागतात. ज्या प्रकारे दुधाचे उत्पादन वाढते त्याचबरोबर जनावरांचे संगोपन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो या तिन्ही मोसमात जनावरांना जो आजार होतो तो म्हणजे पोटफुगी. खाद्य पदार्थांमध्ये झालेला बदल असो किंवा आसाड ओसाड खाद्य खाल्याने सुद्धा जनावरांच्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया वाढल्याने पोटामध्ये वायू निर्माण होतो जो की नैसर्गिकपणे बाहेर टाकू शकत नाही आणि याच वायूचा ताण जनावरांच्या पिशवीवर होतो त्यालाच पोटफुगी म्हणतात.
पोटफुगीची कारणे :-
जर जनावरांनी ज्वारी, बाजरी, वाटाणा किंवा मक्याची हिरवी धाटे जास्त प्रमाणात खाल्ली तसेच उसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात जनावरांच्या खाद्यात आल्यास जनावरांचे पोट फुगते. काही जनावरांच्या अन्ननलिकेवर तसेच जठरावर सूज तसेच जंतांचा प्रादुर्भाव होणे तर काही जनावरांच्या अनुवंशकतेप्रमाणे तोंडातील लाळ कमी असणे त्यामुळे रवंथ करताना त्या अन्नात लाळ योग्य प्रकारे जमा होत नाही. तसेच जनावरांच्या बाजूला पडलेले खिळे, तारा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लास्टिक हे अखाद्य त्यांच्या खाण्यात आले की त्यांना पोटफुगी होते.
ही आहेत पोटफुगीची लक्षणे :-
अखाद्य पदार्थ खाल्यावर जनावरांची पोटफुगी होती व हे ओळखायचे कसे तर त्यावेळी जनावरे जास्त खात नाहीत तसेच जास्त सुस्तवतात. जनावरांच्या डाव्या भकाळीचा आकार जास्त वाढतो. मागच्या पायाने जनावर पोटावर लाथ मारते तसेच डोळे व मान उंचावर तानतात. जनावर सारखे सारखे त्यांच्या डाव्या भकाळीवर पाहतात. पोटात जो वायू तयार झालेला असतो त्याचा दाब त्यांच्या हृदयावर तसेच फुफुसावर होतो त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात. हा दाब एवढा वाढतो की जनावरांचा श्वास पूर्ण कमी जातो आणि ते जमिनीवर कोसळतात तर काही वेळा जनावरे मरण पावतात.
काय आहेत उपचार :-
उपचार दरम्यान जनावरांचे पुढचे पाय उंचावर तर मागचे पाय उतारावर ठेवावे त्यामुळे वायूमुळे फुगलेल्या पिशवीचा दाब फुफुसावर पडणार नाही. जनावरांच्या डाव्या भकाळीवर तेलाने मालिश करावी त्यामुळे जनावरांना आराम मिळतो. जनावरांच्या तोंडात कडुलिंबाची आडवी काडी ठेवावी त्यामुळे जनावरे ते चघळत बसतील त्यामुळे लाळ निर्माण होईल आणि पोटफुगी कमी होईल. पोटफुगी होऊ नये म्हणून कोवळी ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी घाटे जास्त प्रमाणात देऊ नये नाहीतर जास्तच त्रास जनावरांना होतो. असे पशुवैद्यकीय डॉ. गिरीश यादव सांगतात.
Published on: 12 January 2022, 02:26 IST