डॉ.आदिनाथ ताकटे, आकाश मोरे, वर्षा अडसुरे
शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठया प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येत आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांपैकी एक उपयुक्त खत म्हणून “गांडूळखत” ओळखले जाते. रासायनिक खतांना गांडूळखत हा उत्तम पर्याय आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनामध्ये गांडूळ अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीचा पृष्ठभाग सुपिक बनतो. गांडूळ काही झाडांची पाने विशेष आवडीने खातात. पानांचा आकार आणि त्यातील रासायनिक घटक ह्याप्रमाणे त्यांची पसंती असते. आंबा, भात, पेरु, काजू, निलगिरी इ. वनस्पतींची पाने गांडुळ आवडीने खातात. गांडूळ कुजलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळण्याची महत्त्वाची भूमिका करतात.
गांडूळ खत म्हणजे काय:
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो.
गांडुळाच्या महत्त्वाच्या प्रजाती:
गांडूळाच्या ३०० पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी आयसेनिक फेटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी एक्झोव्हेट्स, फेरीटीमा इलोंगेटा या महत्त्वाच्या जाती आहेत. यापैकी आयसेनिक फेटीडा या जातीचे गांडूळ हे खत निर्मितीसाठी वापरले जातात. गांडूळखत निर्मितीची प्रक्रिया साधारणपणे ४० ते ४५ दिवसांमध्ये पूर्ण होते.
गांडूळखताचे फायदे:
अ) मातीच्या दृष्टीने:
१. जमिनीचा पोत सुधारतो.
२. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
३. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
४. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
५. जमिनीची धूप कमी होते.
६. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
७. जमिनीचा सामू (पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
८. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
९. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
१०. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत वाढ होते.
११. ओला कचरा व्यवस्थापन होते.
१२. मातीचा कस टिकून राहतो.
१३. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.
१४. ह्या खतामुळे जमिन सुपीक राहते.
ब)शेतकऱ्यांच्या दृष्टीने:
१. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
२. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
३. पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
४. झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
५. रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
६. मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
७. गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.
क) पर्यावरणाच्या दृष्टीने:
१. माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदूषण कमी होते.
२. जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
३. पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते.
४. रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते.
५. कचऱ्याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
खत तयार होण्यास लागणारा कालावधी:
गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.
गांडूळखत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी:
•गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.
•शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15-20 दिवस कुजवावे.
•खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.
•गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याआधी 1 दिवस पाणी मारावे.
•गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
•व्हर्मीवॅाश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवॅाश जमा करण्याचे नियोजन करावे
शेडची बांधणी:
गांडूळखत तयार करण्याची पद्धती:
• गांडूळ खत हे ढीग आणि खड्डा पद्धतीने तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज असते. यामध्ये शेड तयार करून सूर्यप्रकाश, पावसापासून संरक्षण करावे.
• शेडची लांबी २ ढिगांसाठी साधारण ४.२५ मीटर तर ४ ढिगांसाठी ७.५ मीटर इतकी असावी.
• शेडवरील निवारा हा दोन्ही बाजूने उताराचा असावा. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५ मीटर तर मधल्या खांबांची उंची २.२५ ते अडीच मीटर इतकी ठेवावी.
• छपरासाठी गवत, नारळाच्या झावळ्या, ज्वारीची ताटे, जाड प्लास्टिक कागद, लोखंडी पत्रे वापरावे.
ढीग पद्धत:
• या पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणतः २.५ ते ३ मीटर लांब व ०.९ मीटर रुंदीचे ढीग तयार करावेत.
• प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या झावळ्या, काथ्या, गवत, भाताचे तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा ३ ते ५ सेंमी जाडीचा थर रचावा. या थरावर पुरसे पाणी शिंपडून ओला करावा. त्यावर ३ ते ५ सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेण, कंपोस्ट किंवा चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढ झालेली गांडूळे हळुवारपणे सोडावीत.
• दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, गवत, गिरिपुष्प, शेवरी यांसारख्या हिरवळीच्या झाडांची पाने, खत, कोंबड्यांची विष्ठा इ. चा वापर करावा.
• या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची ६० सेंमी पेक्षा जास्त असू नये.
• कुजणाऱ्या पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर पोत्याचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी मारावे. त्यामुळे ओलावा वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते.
• ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
खड्डा पद्धत:
• या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ०.६ मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस टाकावे. त्यावर ३ ते ५ सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेले शेण, कंपोस्ट खत किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.
• दोन्ही थर पाणी शिंपडून ओले करावेत. त्यावर १०० किलो सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करण्यासाठी ७ हजार प्रौढ गांडुळे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त ६० सेंमी जाडीचा थर रचावा. त्यावर पोत्याचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे.
• गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. असे करताना गांडुळे जखमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशाप्रकारे गांडूळ खताचा झालेला शंकू आकाराचा ढीग करावा.
• खत तयार झाल्यावर पाण्याचा वापर बंद करावा. त्यामुळे गांडूळे तळाशी जाऊन बसतील. ढिगातील वरच्या भागाचे खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोश यांना पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.
गांडूळखत वेगळं करणे:
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे.गांडुळखत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल.ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने खड्डा किंवा ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.
गांडुळ खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण:
१.जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गांडुळ खतामुळे वाढवून जमिनीचे रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
२.जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होऊन त्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते.
३.गांडुळ खतापासून सर्वसाधारणपणे नत्र-१.२-२.५ %, स्फुरद-०.७-१.७ % व पालाश-०.८-२.५ % या प्रमाणात प्रमूख अन्नद्रव्या उपलब्ध असतात.
गांडुळ खड्डा पद्धत ढीग पद्धत
उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्त्वाच्या बाबी:
•शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत हरभऱ्याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
•स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष वाळलेला पालापाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळांची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
•हरभऱ्याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
•गोबरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृदशास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, म.फु.कृ.वि. राहुरी. मो. ९४०४०३२३८९
आकाश मोरे, वरिष्ठ संशोधन सहयोगी, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, म.फु.कृ.वि. राहुरी.
वर्षा अडसुरे, वरिष्ठ संशोधन सहयोगी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, म.फु.कृ.वि. राहुरी.
Published on: 05 June 2024, 01:19 IST