सर्व जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजा, आपल्या देशात बळीराजाचे महत्त्व अधिक आहे. हा बळीराजा रखरखत्या उन्हात, पावसात, शेतात झटत असतो आणि घामाच्या धारा गाळून काळ्या मातीत सोनं पिकवत असतो. शेतकऱ्यांचे आयुष्य शेत- शिवार, गुरे, रानांत हवेत डोलणारी सोन्यासारखी पिके यातच रमत असते. अभाळा एवढ्या मेहनतीमध्ये त्याला त्याच्या सर्ज्या-राज्या म्हणजे बैलांची साथ मिळत असते, बैलांसोबत त्याला मायेची उब देणाऱ्या गायी, म्हैशीची साथ लाभते. जगाला अन्न पुरविण्यासाठी मदत करणाऱ्या जनावरांनाही आपण त्याच पद्धतीचा आहार दिला पाहिजे. सदृढ प्राण्यांच्या आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक असतो. आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.
आता उन्हाळा ऋतू चालू झाला आहे, या काळात आपण प्राण्याच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या दिवसात कोणता आहार पशुंसाठी आवश्यक असतो याची माहिती असणे गरजेचे असते. प्रत्येक जनावराला त्याच्या शारीरिक स्थितीनुसार आहार हवा असतो. प्रत्येक जनावरांना त्यांच्या शरिराच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते. म्हैशींना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते. जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे. आहार देताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावी, जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकात एकदम बदल करू नये.
आहार कसा द्यावा हे आपण खालीलप्रमाणे पाहू.....
- आहारात नियमितपणा असावा.
- हिरवा चारा फुलोऱ्यात असताना द्यावा.
- आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. १०० किलोस २.५ ते ३.० किलो या प्रमाणात शुष्क पदार्थ द्यावेत.
- पशुआहारात २/३ भाग वैरण असावी, तर १/३ भाग आंबवण असावे.
- एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओट बाजरा, नेपियर इ.) यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
- द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभुळ, चवळी, शेवरी) यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
- वाळलेली वैरण (कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाडे काड, उसाचे वाढे) यामध्ये एकूण पचनीय पदार्थ यांचे प्रमाण अतिशय कमी असते.
- आंबवण :यामध्ये १४ ते १६ % पचनीय प्रथिनांचे प्रमाण असावे.
- जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी खनिज मिश्रण व खनिज चाटण देणे गरजेचे आहे.
- हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्यास आंबवणावर ३० टक्के खर्च कमी करता येतो.
- प्राण्यांना आहारासह स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. दिवसातून तीनवेळा पाणी पिण्यास द्यावे.
- आहाराबरोबरच जनावरांना खासकरून उत्पादनासाठी मुबलक पाणी प्यावयास देणे जरुरीचे आहे.
- जनावरांना पिण्यासाठी द्यावयाचे पाणी वासरहित, रंगहीन असावे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारचे अपायकारक क्षार नसावेत. गाई/म्हशींना द्यावयाचे पिण्याचे पाणी शक्यतो ताजे व स्वच्छ असावे.
- आपल्या देशातील उष्ण हवामानामुळे जनावरांना पाणी अधिक प्रमाणात लागते. पिण्याच्या पाण्याचे हे प्रमाण जनावरांना द्यावयाच्या (१) पशुखाद्य (२) सुकी वैरण आणि (३) ओली वैरण यावर अवलंबून असते.
जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. एका प्रौढ जनावरामागे पाण्याची दैनदिन गरज पुढीलप्रमाणे आहे :-
जनावरांचा प्रकार | पिण्यासाठी पाणी (लि.) | धुण्यासाठी पाणी (लि.) | एकूण (लि.) |
प्रौढ संकरित गाय | ५० ते ७० | १०० ते १२० | १५० ते १९० |
प्रौढ म्हैस | ५० ते ७० | १०० ते १२० | १५० ते १९० |
प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवी चारा (एकदल अथवा द्विदल) पशुखाद्य व क्षारमिश्रण द्यावे. वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करून द्यावा.
सर्वसाधारणपणे दहा लिटर दूध देणार्या आणि ४०० किलो वजन असणार्या संकरीत गाईसाठी आहार
हिरवा चारा एकदल (२१ किलो) : मका, ज्वारी, बाजरी, ओट, नेपियर इ.
द्विदल (९ किलो) : लुसर्न, बरसीम, चवळी, वाटाणा, वाल, गिनी गवत, पॅरा गवत, सुदान गवत, दशरथ गवत, अंजन गवत, स्टायलो गवत इ.
वाळलेला चारा (३-५ किलो) : ज्वारीचा कडबा, मका, बाजरी सरमाड, गव्हाचा तूस, भाताचा पेंढा, वाळलेले गवत, सोयाबीन व तुरीचे काड, उडदाचा पाला, मुगाचा पाला इत्यादी.
पशुखाद्य : शरीर पोषणासाठी १ -१.५ किलो आणि प्रतिलिटर दूध उत्पादनास ४०० ग्रॅम.
खनिज मिश्रण : ६० ते ८० ग्रॅम प्रतिदिन - गरजेनुसार मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे.
संकरित गायी किंवा म्हैशीसाठी शुष्क पदार्थ देण्याची मात्रा |
वजन | शुष्क पदार्थांची मात्रा |
देशी गाय | १०० किलोग्रॅम | २ ते २.५ किलो ग्रॅम |
संकरित गाय | १०० किलोग्रॅम | २.५ ते ३ किग्रॅ |
म्हैस | १०० किलो | २.५ ते ३ किग्रॅ |
शुष्क पदार्थ |
वैरणाची मात्रा | आंबवणाची मात्रा |
२/३ | १/३ |
सुका वैरण मात्रा २/३ | - |
हिरवा चारा १/३ | - |
जर चारा द्विदल गटातील असेल तर सुका चारा ३/४ आणि हिरवा चारा १/४ ठेवा | - |
देखभालीसाठी आणि दुधासाठी पशुंना आहार कसा असावा हे पाहू.
पशु | देखभालीसाठी खुराकाची मात्रा | दुधासाठी खुराकाची मात्रा |
गाय | १ ते १.२५ किलो | १ किलो प्रति ३ लिटर दूध |
म्हैस | २ किलो | १ किलो प्रति २ लिटर दुधासाठी |
लेखक:
डॉ. सागर अशोक जाधव, (M.V.Sc., पशूपोषण शास्त्र विभाग)
मोबाईल - ९००४३६१७८४.
लेखक- डॉ. विनायक गुलाबराव पाटील
Published on: 04 April 2020, 09:15 IST