प्रतिनिधी - आनंद ढोणे
परभणी
राज्यात मागील काही दिवसांपासून लम्पी संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. पण पुन्हा लम्पी संसर्गाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली असून पशूसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात लम्पी संसर्गाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. लम्पीमुळे पांगरा येथे एका कंधारी गाईचा मृत्यू झाला आहे. पशुपालक भानुदास आबाजी ढोणे या शेतकऱ्याच्या गाईचा लम्पी संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
लम्पीचा संसर्ग मुख्यत: गाय, बैल आणि वासरे यांच्यात दिसून येत आहे. या संसर्गामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येणे, नंतर त्या गाठी फुटून रक्तस्राव होणे, गंभीर ताप येणे, डोळ्यातून पाणी येणे, चारापाणी बंद होणे अशी मुख्य लक्षणे दिसून येत आहेत. तसंच या संसर्गाने आता पुन्हा फैलाव सुरु केला आहे. उपचारादरम्यान देखील जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन खाते देखील हैराण होत आहे.
दरम्यान, चुडावा येथील पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी डॉ. कसबे यांनी मृत्यू झालेल्या गाईचा पंचनामा करुन नोंद केली आहे. परभणी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी पशुसंवर्धन खात्याकडून कोणत्याही उपाययोजना दिसून येत नाहीत. या ठिकाणी पूर्वी कार्यरत असणारे पशूधन विकास अधिकारी डॉ. कनले यांनी उत्तम काम केले होते, असे शेतकरी सांगतात. पण त्यांची बदली झाल्यानंतर त्यानंतर शेतकऱ्यांसाठी काम करणारा एकही अधिकारी याठिकाणी परत आला नाही, असंही या भागातील शेतकरी सांगतात.
Published on: 03 August 2023, 03:34 IST