पावसाळा म्हटलं की सगळीकडे दमट, ओलसर वातावरण असते. त्यामुळे बऱ्याचदा रोगजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. अशा वातावरणात शेळ्या, मेंढ्या एकादी पशुधनाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या लेखात आपण पावसाळ्यात शेळ्याची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
शेळी पालन हा व्यवसाय मुख्यत्वेकरून हिवाळ्यात सुरु करावा. कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी अतिशय पोषक असा मानला जातो. जर पावसाळ्यात चारा लागवड करून ठेवली व चारा खाण्या योग्य झाला की हिवाळ्यात शेळ्यांची खरेदी करावी. शक्यतो पावसाळ्यात शेळ्यांना जास्तीत जास्त रोगांची लागण होत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो शेळीपालनाची सुरुवात टाळावी. पावसाळ्यामध्ये पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो. त्यामुळे शेळ्यांचे येणाऱ्या पावसापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ती उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. जसे की शेळ्यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी दालने असावीत. ज्यामुळे आजारी शेळ्या, पिल्ले, गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील व शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा द्यावी जेणेकरून गर्दी होणार नाही.
पावसाळ्यातील शेळ्यांचा आहार
- ओला चारा थोडा वाळवून घेतला म्हणजे काढल्यानंतर दोन ते पाच तासानंतर द्यावा जेणेकरून पचनास त्रास होत नाही.
- गवतावर दव असताना शेळ्यांना आजूबाजूच्या परिसरात सकाळी सकाळी चरण्यासाठी सोडू नये.
- ओला चारा किंवा पशुखाद्य यांची साठवणूक करताना काळजी घ्यावी. कारण पावसाळ्यात अशा खाद्यान्न आणि चाऱ्याला बुरशी लागण्याची दाट शक्यता असते.
- ज्या शेळ्या भाकड असतात अशा शेळ्यांना पावसाळी अगोदर पंधरा दिवस शंभर ते दीडशे ग्रॅम प्रति दिन खुराक, भरडा दिल्यास बहुतांश शेळ्या काही दिवसातच माजावर येतात व दोन पिल्ले देण्याची दाट शक्यता वाढते.
- शेळ्यांना वकिलांना खनिज मिश्रण किंवा चाटण वीट पावसाळ्यामध्ये चालू ठेवावे. कारण शेळ्या किंवा पिल्ले खनिजांचे अभावामुळे माती चाटतात व त्यांना हगवण सदृश्य आजार होतात
- पैदाशीचा बोकडला ही पावसाळा अगोदर पंधरा दिवस तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम प्रतिदिन भरडा किंवा खुराक दिल्यास वीर्याची प्रत सुधारते.
- चारा कुट्टी करून खायला द्यावा. जेणेकरून जमिनीवर चारा पडून तो खराब होणार नाही.
- पावसाळ्यात शेळ्यांना दिले जाणारे पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे याची खात्री करावी.
- शेळ्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आवश्यक चारा, वाळलेला चारा व खुराक दिल्यास शेळ्यांचे आरोग्य पावसाळ्यात उत्तम राहते.
पावसाळ्यातील शेळ्यांचे आरोग्य
- शेळ्यांना पावसाळा अगोदर व पावसाळ्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, घटसर्प व पीपीआर या रोगांच्या प्रतिबंधक लसी देणे फार आवश्यक आहे.
- मे व सप्टेंबर महिन्यात शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशक योग्य मात्रा देऊन जंतनिर्मूलन करून घ्यावे. कारण ढगाळ व दमट हवामान जंतांच्या वाढीसाठी पोषक असते.
- शेळ्यांना लस कधीही रोग आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट रोगाच्या साथीमध्ये रोग झालेला शेळीला लस दिल्यास तो रोग बरा न होता बळावतो.
- पावसाळ्यामध्ये जखमांवर माशा बसून त्या चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी व माशांच्या आवश्यक तो बंदोबस्त करावा. यासाठी कडूनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून शेडचे निर्जंतुकीकरण करावे.
- पावसाळ्यात शेळ्यांच्या खुरंमध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात. यासाठी अशा शेळ्यांना वाळलेल्या जागेत ठेवून त्या जखम झालेल्या भागाला पोटॅशियम परमॅग्नेट ने धून त्यावर मलमपट्टी करावी.
- पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा. तसेच शेडमधील जमिनीवर ही चुना भरल्यास शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होईल.
Published on: 13 June 2021, 01:20 IST