Solapur News : राज्यात जनावरांमधील लम्पीचा संसर्ग अद्यापही सुरु आहे. यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. यातच सोलापूरच्या एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. लम्पीपासून गाईचा बचाव व्हावा यासाठी या शेतकऱ्याने चक्क गाईला पीपीई कीट घातल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील पशुपालक लम्पीमुळे हैराण झाले आहेत. लम्पीमुळे लाखो रुपये किंमतीची जनावरांचा मृत्यू होऊ नये म्हणून या शेतकऱ्याने शक्कल लढवत गाईला पीपीई किट केले आहे. या किटची किमत दीड हजार रुपये आहे. संसर्ग थांबवण्यासाठी शासनावर गुरांचे बाजार, बैलांच्या शर्यतींवर निर्बंध आणण्याची वेळ आली आहे.
सोलापूरच्या जितेंद्र बाजारे यांनी गाईला पीपीई किट घातले आहे. तसंच यामुळे लम्पीचा संसर्ग देखील टाळता येतो असा दावा ही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत यामुळे आपले पशुधन वाचवता येईल यासाठी शासनाने हा प्रयोगाचा वापर करण्याचे आवाहन देखील बाजारे यांनी केले आहे.
लम्पीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला अभ्यास केला. त्यानंतर कॉटनच्या कापडापासून त्यांनी किट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी ९० जीएसएम जाडीचे नॉन ओवन फॅब्रिक घेऊन त्यापासून पीपीई किट बनवली.या किटला त्यांनी काही कप्पे देखील केले जेणेकरुन त्या कप्प्यात डांबरी गोळ्या ठेवता येतील. तसंच एक माणूस सहजासहजी हे किट जनावरांना घालू शकतो.
किट बनवण्यासाठी किती खर्च?
हे किट बनवण्यासाठी साधारणत: १ हजार ५०० रुपये खर्च येत आहे. यामुळे लाख रुपये किमतीच्या जनवरांचे संरक्षण होत आहे. शासनाने हे पीपीई किट वापरून लम्पी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन जितेंद्र बाजारे यांनी केले आहे. लम्पीमुळे राज्यातील बऱ्याच जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने याबाबत विचार करावा, असंही ते म्हणाले.
Published on: 12 October 2023, 12:03 IST