Animal Husbandry

विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावा लागतो. कोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजिवजन्य, पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसीस व इतर विषबाधा आढळतात.

Updated on 27 November, 2019 4:12 PM IST


विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावा लागतो. कोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजिवजन्य, पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसीस व इतर विषबाधा आढळतात.

कुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, पक्षांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी रोगनियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये पक्षांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणाऱ्या अचानक बदलामुळे पक्षांच्या वर्तणुकीमध्ये वातावरणाशी समरस होण्यासाठी बदल होत असतात.

पक्षांच्या थंडीपासून बचावासाठी शरीरात ऊर्जा (उब) तयार करण्यासाठी पक्षी पंखाखाली पाय घेऊन मान पंखामध्ये घेऊन बसतात, खाद्य जास्त प्रमाणात खातात व पाणी कमी प्रमाणात पितात. अतिथंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक जिवाणू परजिवींची संख्या वाढते व या जिवाणू आणि परजिवींशी संपर्क येऊन कोंबड्यामध्ये रोग उद्भवतात व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हिवाळ्यामध्ये रोग उद्भवण्याचे प्रमाण, रोगी पक्षांचे प्रमाण व मृत्यूदर हा मुख्यतः व्यवस्थापनाच्या प्रकारावर व पक्ष्यांना केलेल्या लसीकरणावर अवलंबून असते.

विविध हवामानातील बदलांशी समरस होण्यासाठी पक्षांचे वय तितकेच महत्वाचे असते. दोन महिन्याच्या आतील (हा मुख्य वाढीचा काळ आहे) आणि सहा महिन्याच्या वरील वयाचे पक्षी (वयात येणारे पक्षी) हे संसर्गजन्य आजारांना जास्त प्रमाणात बळी पडतात. कोंबड्यामध्ये हिवाळ्यातील आजारांमध्ये मुख्यतः श्वसनास त्रास होणे, तणावाखाली असणे, नैराश्य असणेहगवण, खाद्य न खाणे, विखुरलेले पंख,सुजलेला चेहरा व पाय पुढे घेऊन पडून राहणे यासारखी लक्षणे आढळतात. अशी लक्षणे बऱ्याच रोगांमध्ये आढळतात. त्यामुळे रोगनिदान करणे अवघड होते. हिवाळ्यामध्ये मुख्यत: आय.बी.डी (गंबोरो), फाऊल पॉक्स, फाऊल कॉलरा, ई. कोलाय, सालमोनेला हे रोग आढळतात.

अति थंडीमध्ये हवेतील आर्दता वाढते. त्यामुळे गादी साहित्य तसेच खाद्यामध्ये कवकांची/बुरशीची वाढ होते. यामुळे अस्परजिलेसीस रोगाची लागण होऊन हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या गाठी फुफ्फुसात निर्माण होऊन श्वसनामध्ये अडथळा येतो.हिवाळ्यामध्ये पक्षांच्या जास्त प्रमाणात आजारी पडण्याच्या प्रमाणाला  शेडमधील अनियंत्रित हवामान कारणीभूत ठरते. यामध्ये शेड व्यवस्थापन नीट नसणे, शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे, एका ठिकाणी जास्त पक्षी ठेवणे, खाद्य कमी पुरवठा करणे हे घटक कोंबड्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात. कोंबड्यापासून चांगल्याप्रकारे उत्पादन मिळविण्यासाठी शेडमधील तापमान 21 ते 23 अंश सें.ग्रे. पर्यंत राहणे आवश्यक आहे. परंतु थंडीमध्ये काही भागातील तापमान 21 अंश सें.ग्रे. पेक्षा खूप कमी होते, अशावेळी पक्षांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जादा ऊर्जेची गरज असते. हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर पक्षी कोल्ड स्ट्रोकने (थंडीच्या कडाक्याने) मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिवाळ्यात पक्षांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हिवाळ्यातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

  • हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो तसेच ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्वे वाया जातात. त्याकरिता खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे.
  • शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे लावावेत. हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
  • शेडमधील तापमान विजेचे बल्ब, शेगडी किंवा बुडरच्या साहाय्याने वाढवावे.
  • लोडशेंडींगच्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीची सोय करावी.
  • मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्वांची कमतरता होणार नाही.
  • पक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
  • बऱ्याचवेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • कोंबड्यासाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतुमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल, असे नियोजनपुर्वक शेड तयार करावे. तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी.
  • ठरवून दिल्याप्रमाणे कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा.
  • ज्या ज्या वेळी हवामानात अचानक बदल होऊन पक्षांवर ताण येतो, त्यावेळी पक्षांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व 'ब' जीवनसत्वाचा वापर करावा, जेणेकरुन पक्षावरील ताण कमी होईल.

लेखक:
डॉ. गणेश यु. काळुसे (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)
डॉ. सी. पी. जायभाये (कार्यक्रम समन्वयक)
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.

English Summary: Poultry Bird Management in Winter Season
Published on: 27 November 2019, 04:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)