राज्यातील पशु संवर्धनासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत आहे. दुधालाही एफआरपी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता राज्यातील कोल्हारपूरातील पाच तालुक्यांमध्ये जनावरांसाठी फिरते दवाखाने चासू करण्यात येणार आहेत.
या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पाच गाड्या जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. शिराळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, कागल या तालुक्यांसाठी या गाड्या शासनाकडून मिळाल्या आहेत.ज्या जनावरांची मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यांनी पुणे मुख्यालयात कॉल केल्यास तो कॉल संबंधित जिल्ह्याला जाईल. जिल्हास्तरावर कॉलबाबत खात्री करून घेतली जाईल. खातरजमा झाल्यानंतर आजाराची गंभीरता पाहिली जाईल. त्या नंतर फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे पथक खास जनावरांसाठी तयार केलेल्या वाहिकेतून थेट तुमच्या गावी दाखल होईल.या गाडीत फ्रिजसह ऑपरेशन थिएटरही सज्ज असेल.
आजारांच्या गांभीर्यानुसार तुमच्या गोठ्यात येऊन तातडीने उपचार सुरू करण्यात येतील. ज्या भागात पशुवैद्यकीय सेवा नाहीत, त्या भागासाठी ही सेवा पशुपालकांसाठी वरदान ठरणार आहे. शासनाने प्रत्येक गाडीसाठी ४१ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये चालक, इंधन मानधनासहित इतर खर्चाचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत या गाड्या दाखल झाल्या आहेत. डोंगरी तालुक्यासाठी त्यांची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे या तालुक्यांना या गाड्या मिळाव्यात, अशी आम्ही शासनाकडे मागणी करीत असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. एच. पठाण यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते चावी देऊन लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए. पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. विनोद पवार उपस्थित होते.
Published on: 01 March 2021, 11:45 IST