हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन थंडीच्या काळात व्यवस्थापनामध्ये बदल करावेत. पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होतात. पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत.
पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावेत. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत. पावसाळ्यामध्ये शक्योतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. पक्ष्यांना त्रास होत नाही.
पक्ष्यांची गादी (लिटर) दिवसातून किमान एक वेळातरी चांगली खाली-वर हलवून घ्यावी. ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते, पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल, तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी. गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीरडीऑसीस रोगाचे एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढते. गादीतील आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार चुना मिसळावा. शेडमध्ये माश्यां चा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये.
कोंबडी खाद्य तपासून घ्यावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्येता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये शिफारशीत जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्सायईड लावून घ्यावे. भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून चुना लावावा. हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन थंडीच्या काळात व्यवस्थापनामध्ये बदल करावेत.
पोल्ट्री शेडमधील लिटर
1) हिवाळ्यामध्ये पोल्ट्री शेडमध्ये लिटरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात लिटरचा ओलसर झालेला भाग काढून टाकावा.
2) ओल्या झालेल्या लिटरमध्ये चुनखडी मिसळून आर्द्रतेचे प्रमाण कमी करता येते. यासाठी दोन किलो चुना/ चुनखडी प्रति 100 चौरस फुटांसाठी लिटरमध्ये मिसळावी.
3) शक्य झाल्यास संपूर्ण लिटर बदलणे चांगले; परंतु यामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. हाताळणीमुळे कोंबड्यांवर ताण येतो.
पोल्ट्रीमधील पाणी व्यवस्थापन कसे असावे
1) हिवाळ्यात ज्या भागात पिण्याचे पाणी खूपच थंड होते, तेथे शक्य झाल्यास पाणी थोडेसे कोमट करून कोंबड्यांना पाजावे.
2) हिवाळ्यात पाण्याद्वारे झपाट्याने पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रथम पाण्यावर तुरटी फिरवावी. नंतर हे पाणी 25 तास संथ ठेवावे. यामुळे पाण्यातील गाळ तळास बसून पाणी स्वच्छ होते.
3) त्यानंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. यासाठी एक ग्रॅम ब्लिचिंग पावडर (ज्यामध्ये 33 टक्के क्लोयरीन असते) 500 लिटर पाण्यासाठी पुरेशी होते.
4) पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरावयाची इतर औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार वापरावीत.
कोंबड्यावरील येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन कसे कराल
1) थंड वातावरणामुळे कोंबड्यांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून आवश्यक जीवनसत्त्वे द्यावीत. यामध्ये जीवनसत्त्व "ब', "क' किंवा क्षारयुक्त पावडर किंवा ताण कमी करणाऱ्या औषधींचा पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वापर करावा.
2) ताण आल्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी होऊन कोंबड्या इतर रोगांस बळी पडण्याची शक्यता असते. यासाठी कोंबड्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाययोजना करून पाण्यातून जीवनसत्त्व "अ', "ई' व सेलेनियमचे द्रावण द्यावे.
खाद्याचे नियोजन
1) हिवाळ्यामध्ये कोंबड्या जास्त खाद्य खातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान वातावरणातील बदलांमध्ये कायम राखण्यासाठी त्यांना अन्नघटकांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा बराच भाग खर्च करावा लागतो.
2) हिवाळ्यामध्ये पक्ष्यांना आवश्यकतेपेक्षा कमी खाद्य दिल्यास ते त्यांना अपुरे पडण्याची शक्यता असते. खाद्य अपुरे पडल्यास वाढ खुंटण्याची भीती असते. त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्य घटकांमध्ये आवश्यक ते बदल करून खाद्य द्यावे.
3) थंडीच्या काळात कोंबड्यांच्या आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण (100 किलो कॅलरीज प्रतिकिलो खाद्यामध्ये) वाढवावे आणि प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के कमी करावे. यासाठी पशुआहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
4) कोंबड्यांच्या आहारात जास्त ऊर्जा निर्माण करणारे अन्नघटक, जसे की पिष्टमय कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) उदा. मका, ज्वारी इत्यादींचे प्रमाण वाढवावे आणि प्रथिने जसे की तेल काढलेले सोयाबीन मील पेंड, मासळीचा चुरा, शेंगदाणा पेंड, सरकीची पेंड यांचे प्रमाण थोडेसे कमी करावे.
खाद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण 3000 किलो कॅलरीवरून 3200 कॅलरीजपर्यंत वाढवावे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये खनिज, क्षार आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण योग्य असावे. जीवनसत्त्वे "अ' व "ई' हे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे ते त्यांना खाद्यातून पुरविल्यास योग्य वाढ होण्यास मदत होते. पोटॅशियम क्लो राईड्स, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लो राईड आणि सोडियम नायट्रेट इत्यादी पाण्यातून दिल्यास त्यांचा कोंबड्यांच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो.
व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे
हिवाळ्यात लहान पिलांच्या ऊबदार घरट्यामधील (ब्रूडर हाऊस) तापमान अचानक कमी होते. तेव्हा अशा पिलांमध्ये मरतुकीचे प्रमाण खूपच वाढते. अशातच जर विद्युतप्रवाह खंडित झाला आणि आवश्यक ती तातडीची उपाययोजना झाली नाही तर मरतुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. मरतुकीचे हे प्रमाण 50-60 टक्क्यांपर्यंतही जाते. म्हणून घरटे ऊबदार ठेवण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. रात्रीच्या वेळी कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये पडदे टाकावेत; परंतु कधी- कधी पडद्यांमुळे कोंबड्यांना पुरेशी हवा मिळत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे कोंबड्यांच्या पोटामध्ये पाणी होऊन त्या मरू शकतात. हे लक्षात घेऊन असे पडदे टाकताना शेडच्या वरच्या बाजूने एक फूट जागा सोडावी. दिवसा शक्यतो पडदे बंद ठेवू नयेत. हिवाळ्यात कोंबड्यांना मुख्यतः सर्दी (इनफेक्सिबअस कोरायझा), सीआरडी आणि साल्मोनेल्लेसीस (हगवण) यासारखे जीवाणूजन्य, तर अस्परजिल्लोसीससारखे बुरशीजन्य आणि रक्ती हगवण यासारखे आदिजीवजन्य आजार उ द्भवतात. यामुळे साहजिकच कोंबड्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढते. वातावरण अति थंड झाल्यास पक्षी गारठूनही मरण्याची शक्यतता वाढते. अशाप्रसंगी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपाययोजना व औषधोपचार करावेत.
लेखक :-
डॉ .गणेश यु .काळुसे
विषय विशेषज्ञ(पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय )
कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा
Published on: 01 September 2020, 03:38 IST