भारतीय क्रिकेट टीम चे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या कडकनाथ कोंबड्यांचे पालन करत आहेत. महेंद्रसिंग धोनी यांच्या या कार्याला सोशल मीडिया मध्ये सध्या मोठी पसंती मिळत आहे. धोनीच्या बाबतीत असं बोललं जातं की, तो ज्या गोष्टीला हात लावतो ते सोने बनुन जाते. कडकनाथ पालनात देखील काहीसं असंच झालं कडकनाथ पालनातून धोनीने चांगली मोठी कमाई केली आहे. आपण देखील धोनी प्रमाणे कडकनाथ पालन करून चांगली मोठी कमाई करू शकता. संपूर्ण काळ्या रंगाची कडकनाथ कोंबडी बाजारात सदैव मागणीमध्ये बनलेली असते. शिवाय या कोंबडीला आपल्या इतर जातींच्या कोंबडी पेक्षा अधिक किंमत देखील मिळत असते. त्यामुळे अलीकडे कडकनाथ कोंबडीचे पालन अनेक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करताना बघायला मिळत आहेत. विशेष करून महेंद्रसिंग धोनीने कडकनाथ पालनास सुरुवात केली तेव्हापासून कडकनाथ कोंबडीचे पालन राज्यासमवेतच संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचा दावा केला जात आहे. कडकनाथ कोंबडी संपूर्ण काळ्या रंगाची असते शिवाय या कोंबडीचे मांस देखील संपूर्ण काळ्या रंगाचे असते, या कोंबडीला बाजारात पंधराशे रुपये किलो प्रमाणे विकले जाते. त्यामुळे कडकनाथ कोंबडी पालन शेतकरी बांधवांसाठी विशेष लाभदायक सिद्ध होत आहे.
कुठून आणणार कडकनाथ कोंबडी
कडकनाथ कोंबडी पालन करण्यासाठी आपणास सर्व प्रथम या जातीच्या कोंबड्यांची पिल्ले खरेदी करावी लागणार आहेत. कडकनाथ कोंबडीचे देशात जवळपास सर्वत्र पालन केले जाते मात्र असे असले तरी या कोंबडीचे पालन मध्यप्रदेश मधील झाबुआ जिल्ह्यात सर्वात जास्त होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपण या जिल्ह्यातून कडकनाथची पिल्ले खरेदी करू शकता. भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान महेंद्रसिंग धोनी यांनी देखील झाबुआ जिल्ह्यातूनच कडकनाथच्या पिल्लांची खरेदी केली होती. एका कडकनाथ कोंबडीच्या पिल्ल्याची किंमत जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांच्या दरम्यान असते. झाबुआ जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडी ला 2018 मध्ये भौगोलिक नामांकन अर्थात जी आय टॅग देण्यात आला आहे. त्यामुळे झाबुआ जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडीना विशेष ओळख प्राप्त झाली आहे. कडकनाथ कोंबडीच्या मांसात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते, औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने अनेक आहार तज्ञ या कोंबडीच्या मांसाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. या कोंबडीच्या मांसात कोलेस्ट्रॉल अतिशय नगण्य असते त्यामुळे याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते.
अंडे विक्री करून कमवा लाखों
कडकनाथ कोंबडीच्या मांसाप्रमाणेच अंड्याना देखील मोठी मागणी असते. या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत जवळपास 30 रुपये प्रति नग असते म्हणजे आपल्या इतर जातीच्या कोंबडी पेक्षा कडकनाथ कोंबडीचे अंडे महाग विकली जाते. हिवाळ्यात या कोंबडीच्या अंड्याला आणि मांसाला मोठी मागणी असते त्यामुळे हिवाळ्यात कडकनाथचे पालन फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते.
कसे सुरु करणार कडकनाथ कोंबडी पालन
कडकनाथ पालन सुरु करण्यासाठी आपणास कोंबडी फार्म ची आवश्यकता भासणार आहे. आपण आपल्या शेतात कडकनाथ कोंबडी पालन करण्यासाठी फार्मची व्यवस्था करू शकता. मात्र कोंबडी फार्म अशा ठिकाणी उभारा ज्या ठिकाणी रस्त्याची कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. रस्त्यालगत कोंबडी फार्म उभारल्यास पिल्लांची ने-आण करण्यासाठी तसेच अंडे व कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी आपणास सोयीचे होईल. कडकनाथ पालनातून आपणांस यशस्वी उत्पादन जर प्राप्त करायचे असेल तर आपण यासाठी एखाद्या ट्रेनिंग इंस्टिट्यूट मध्ये जाऊन ट्रेनिंग आवश्यक घेतले पाहिजे.
तसेच कडकनाथच्या पिल्लांची खरेदी करताना विशेष काळजी घेणे अनिवार्य आहे, आपण अशाच पिल्लांची खरेदी करा जे पुर्णतः स्वस्थ आणि तंदुरुस्त असतील. पोल्ट्री फार्म केव्हाही जमिनीपासून उंचीवरचा बनवला पाहिजे. उंचीवर पोल्ट्री बांधल्यास पावसाचे पाणी पोल्ट्रीमध्ये घुसत नाही आणि त्यामुळे आपल्या पशुधनाला हानी पोहचत नाही. तसेच कोंबडी फार्म मध्ये योग्य तापमानाची लाईटची आणि पाण्याची व्यवस्था असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published on: 31 January 2022, 11:19 IST