सध्या माणसांवर कोरोना विषाणूजन्य रोगाने हल्ला केलेला असताना गोवंशावर लंम्पी स्कीन विषाणूजन्य साथीच्या रोगाचा संसर्ग होताना दिसून येत आहे. हा आजार प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गायी, म्हैस या जनावरास होऊ शकतो.जनावरांच्या अंगावर कडक गोलाकार गाठी येतात या रोगाचा प्रसार कॅप्रिपॉक्स प्रवर्गातील विषाणूमुळे होतो. हिवाळ्यात या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो परंतु पशुपालकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे गरजेचे असते. सध्या हिवाळा ऋतूचे आगमन होत असल्याने तापमानातील चड-उतार त्यामुळे जनावरांमधील होणारे कायिक बदलांना समुजून घेऊन व्यवस्थापन करणे पशुपालकांना अवघड जाते. ऋतुमानानुसार नविन रोगाची साथ आणी त्यामुळे दूध उत्पादनात होणारी घट तसेच जनावरांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी खबरदारी घेणे महत्वाचे असते. अशावेळी रोगाची लक्षणे ओळखून निदान करणे गरजेचे असते कारण आजाराची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय आहेत लंम्पी रोगाची लक्षणे-
1) जनावरांना प्रथम ताप येतो त्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते.
२) संक्रमित जनावराच्या नाकात व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात.
३) जनावरांना पोट, पाठ, पाय मान, डोके, तसेच शेपटी खाली त्वचेवर २ ते५ सें.मी व्यासापर्यंतच्या कडक व गोलाकार गाठी येतात व काही दिवसांनी त्यामधून पस येऊ शकतो.
४) रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळतो.
५) या रोगामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर अशक्त बनते.
६) गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो किंव्हा रोगट वासरे जन्मला येतात.
७) चारा-पाणी न खाल्याने जनावरे अशक्त बनतात तसेच डिहायड्रेशन मध्ये जातात.
८) योग्यवेळी उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
कसा होता लंम्पी रोगाचा प्रसार-
१) या रोगाचा प्रसार एका बाधीत जनावराच्या नाकातील स्त्राव, लाळ, मूत्र, दूध तसेच वीर्य इ. मार्फत हा रोग निरोगी जनावरात पसरतो.
२) रोग पसरविणारे कीटक, डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो.
३) विशेषत: उष्ण व दमट वातावरणात रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो.
४) दूषित चारा व पाणी सेवन केल्यास तसेच दूध पिणाऱ्या लहान वासरांनाबधित गाईंकडून संसर्ग होऊ शकतो.
५) बाधित वळूकडून नैसर्गिक रेतनातून गाई म्हशीमध्ये पसरू शकतो.
६) साधारणत: ४ ते१४ दिवसापर्यंत या रोगाचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये आढळतो नंतर शरीराच्या इतर भागात संक्रमण करतो.
खबरदारीचा उपाय-
१) जनावरांना लक्षणे आढळून आल्यास बाधित जनावर तात्काळ इतर जनावरांपासून वेगळे करावे.
२) रोगाची लागण झालेल्या भागातील जनावरांची वाहतूक तसेच विक्री करू नये.
३) रोगी जनावरे व निरोगी जनावरे एकत्र चराईसाठी सोडू नयेत.
४) हा रोग कीटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील कीटकांचा त्वरित बंदोबस्त करावा.
५) रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी रोगाचा फैलाव करणारे किटक उदा.डास, माशा व गोचीड यांचे निर्मूलन करावे.
६) गोठ्यात की कीटकांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटनाशकांचा वापर करावा.
७) नेहमी जनावरांचा गोठा कोरडा,स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावा.
८) गोठ्यातील अडगळीच्या जागा, सांडपाण्याची ठिकाणे, शेण,मलमूत्र, यांचे योग्य व्यवस्थापन करावे.
९) या रोगाने जनावर दगावल्यास ८ ते १० फूट खोल खड्यात पुरून टाकावे.
१०) हा रोग जनावरांपासून मानवाला व शेळ्या मेंढ्याना होत नाही. तरीही गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
११) संसर्ग रोखण्यासाठी गोठा दिवसातून १ ते २ वेळा सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने निर्जंतुक करावा.
१२) वेळीच लक्षणे ओळखून उपचार केल्यास दोन ते तीन आठवड्यामध्ये जनावर पूर्णपणे बरे होऊ शकते.
१३) जनावरांना बाधा होण्याचे प्रमाण १० ते २० टक्के असून लागण झालेल्या जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १ ते ५ टक्क्यापर्यंत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय :-
- जनावरांच्या अंगावरील किटक माशा, गोचीड यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी १ ली पाण्यामध्ये ४० मी.ली करंज तेल ४० मी. ली निमतेल ४० ग्रॅम साबण यांचे एकत्रित मिश्रण करून हे मिश्रण जनावराच्या अंगावर तसेच गोठ्यात ३ दिवसाच्या अंतराने २-३ वेळा फवारावे.
- ताप कमी करणारी वेदनाशामक, औषधे शक्तीवर्धक टॉनिक तसेच प्रतिजैविके, जीवनसत्वे वेळेवर द्यावीत.
- जनावरांना मऊ तसेच हिरवा चारा व मुबलक पाणी द्यावे.
लसीकरण :-
- चार महिन्यावरील सर्व गाई-म्हशींना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने १ मिली प्रति जनावर गोट फॉक्स लस टिचून घ्यावी.
- या रोगाची लक्षणे जनावरात आढळल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
टिप- हा विषाणूजन्य रोग असल्याने या रोगावर प्रभावी लस किंवा औषध उपलब्ध नाही. तरीही रोगाची लागण होऊ नये म्हणून तातडीने पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन उपचार केल्यास जनावरे पूर्णपणे बरी होतात.
लेखक -
प्रा.नितीन रा. पिसाळ
डेअरी प्रशिक्षक,(स्किल इंडिया प्रोजेक्ट)
विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.
मो.नं- 8007313597; ई-मेल-nitinpisal2312@gmail.com
Published on: 05 November 2020, 11:21 IST