मागील महिन्यांपासून राज्यातील अनेक भागात जनावरातील लम्पी आजार पसरला होता. या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या दुधात साधरण २० टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेली गाभण जनावरे आणि त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम झाला आहे. सध्या या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण पूर्णत: आटोक्यात आले असले तरी, बाधित जनावरांमध्ये विविध समस्या दिसून येत आहेत. नगरसह राज्यातील साधारण २५ जिल्ह्यांत जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. गाय वर्गातील जनावरांना या आजाराचा जास्त प्रादुर्भाव होतो.
काही ठिकाणी म्हशींमध्येही प्रादुर्भाव दिसून आला. नगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यात साधरण पावणे पाचशे जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यातील बहुतांशा जनावरे दुभती होती.पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करत जनावरांसह संपर्कात आलेल्या ९६ हजार जनावरांना लम्पी स्कीन आजार प्रतिबंधक लसीकरण केले. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या आजाराची साथ आटोक्यात आली आहे. ज्या जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला, त्यांच्या दूध उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात गाभण असलेल्या गाईला हा आजार झाला असेल तर गर्भपातही दिसून आला. लम्पी स्कीन आजार झालेल्या गाईच्या दुधात घट झाली असल्याचा पशूपालकांचा अनुभव आहे. ज्यांनी काळजी घेतली त्यांच्या जनावरांना मात्र यापासून बचाव करता आला, असे पशुपालक नितीन काकडे यांनी सांगितले.
काय आहेत लम्पी आजाराची लक्षणे
काय आहेत लंम्पी रोगाची लक्षणे-
1) जनावरांना प्रथम ताप येतो त्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते.
२) संक्रमित जनावराच्या नाकात व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात.
३) जनावरांना पोट, पाठ, पाय मान, डोके, तसेच शेपटी खाली त्वचेवर २ ते५ सें.मी व्यासापर्यंतच्या कडक व गोलाकार गाठी येतात व काही दिवसांनी त्यामधून पस येऊ शकतो.
४) रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळतो.
५) या रोगामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर अशक्त बनते.
६) गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो किंव्हा रोगट वासरे जन्मला येतात.
७) चारा-पाणी न खाल्याने जनावरे अशक्त बनतात तसेच डिहायड्रेशन मध्ये जातात.
८) योग्यवेळी उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
कसा होता लंम्पी रोगाचा प्रसार-
१) या रोगाचा प्रसार एका बाधीत जनावराच्या नाकातील स्त्राव, लाळ, मूत्र, दूध तसेच वीर्य इ. मार्फत हा रोग निरोगी जनावरात पसरतो.
२) रोग पसरविणारे कीटक, डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो.
३) विशेषत: उष्ण व दमट वातावरणात रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो.
४) दूषित चारा व पाणी सेवन केल्यास तसेच दूध पिणाऱ्या लहान वासरांनाबधित गाईंकडून संसर्ग होऊ शकतो.
५) बाधित वळूकडून नैसर्गिक रेतनातून गाई म्हशीमध्ये पसरू शकतो.
६) साधारणत: ४ ते१४ दिवसापर्यंत या रोगाचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये आढळतो नंतर शरीराच्या इतर भागात संक्रमण करतो.
Published on: 01 March 2021, 02:24 IST