1. पशुसंवर्धन

उन्हाळ्यातील जनावारंचे व्यवस्थापन

KJ Staff
KJ Staff


आपला दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर राहावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो व त्यासाठी कायम नवनवीन तंत्रज्ञान आपण शोधून त्याचा अवलंब करत असतो. असे नवीन प्रयोग करत असताना आपण कायम आपल्या वातावरणाचा अभ्यास करून त्या तंत्रज्ञानात आपल्या पद्धतीने बदल करत गेलो तर ते तंत्रज्ञान आपल्यासाठी फलदायी ठरते व त्याचा आपणास व आपल्या सभोवतालच्या पशुपालकांसाठी त्याचा कायमस्वरूपी व सर्व ऋतुंमध्ये फायदा होतो. परंतु बर्‍याच वेळेस आपण आपल्या दुग्धव्यवसायात वातावरण व ऋतुमानानुसार आवश्यक बदल करत नाही व त्यामुळे आपणास त्यामुळे होणार्‍या अडचणींना सामोरे जावे लागते.

दुग्धव्यवसाय करत असताना अधिक पाऊस अधिक थंडी व अधिक उन्हाळा यापासून आपल्या पशुधनाचे आपणास सरंक्षण करून त्याच्या उत्पादनावर कोणताही अपाय होणार नाही याची व्यवस्था करणे आवश्यक असते. आपल्याकडील तपमान पाहिले तर 45 अंश से. पेक्षा सुद्धा जास्त असते व अशा तापमानात आपल्या जनावरे आवश्यकतेप्रमाणे उत्पादनक्षम राहत नाहीत. अशा वेळी जनावरांवर उष्णतेचा ताण येतो.

जनावरांचे संगोपन करत असताना आपण आपल्या जनावरांना योग्य वातावरण, योग्य प्रमाणात आहार तसेच इतर व्यवस्थापन योग्य ठेवल्यास आपण आपल्या जनावरांकडून चांगले दुध उत्पादन घेऊ शकतो. याबाबत आपल्या जनावराच्या गरजा आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. जर त्यातील एखादी गरज आपल्याकडे नाही म्हणून आपण पशुपालन करू शकत नाही असे नाही. बरेच पशुपालक असे म्हणत असतात कि आपल्या भागात संकरित गाई टिकत नाही किंवा आपणास पाहिजे त्या प्रमाणात दुध देत नाही. परंतु याबाबत आपण जर इतर देशातील वातावरणाचा अभ्यास केला व त्यांच्याकडील संकरित जनावरांचे दुध उत्पादन पाहिले तर असे वाटेल कि आपल्या पेक्षा अवघड परिस्थिती किंवा योग्य वातावरण नसतानाही याठिकाणी संकरित गाईंचे उत्पन्न एवढे कसे तर यासाठी आपले विचार बदलणे आवश्यक आहेत. यासाठी कमी खर्चाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.


दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढतच आहे याउलट आपल्या संकरित जनावरांची असे वाढीव तापमान सहन करण्याची क्षमता सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही अशा अवस्थेत आपल्यापुढे एकच पर्याय आहे कि आपण तापमान नियंत्रणाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे केले पाहिजे.

काय होते ?

वातावरणातील तापमान वाढल्याने जनावर त्याच्या शरीराचे तापमान वाढू नये व ते सर्वसाधारण रहावे यासाठी प्रयत्न करते ते दोनप्रकारे पहिले म्हणजे शरीरात तयार होणारी उर्जा शरीराबाहेर ढकलणे व दुसरे म्हणजे शरीरात कमीत कमी उर्जा तयार होण्यासाठी ते आपले ते आपली दैनिक व्यवस्थापनातील बदल करत असते. 

 • सर्वसाधारणपणे जनावरासाठी 10 अंश से. ते 26 अंश से. (24 अंश से. ते 26 अंश सेल्सिअस तापमान संकरित तर 33 अंश से. भारतीय देशी व म्हैशी साठी 36 अंश से. पर्यंत) हे वातावरणातील तपामान योग्य समजले जाते.
 • वातावरणातील तपामान ज्यावेळेस जास्त जाते. त्यावेळेस जनावरे आपल्या शरीराचे तापमान धर्मग्रंथी किंवा धापनेच्या प्राक्रियेमार्फत त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात.
 • ज्यावेळी वातावरणातील तपमान या कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी आपल्या जनावराला आपल्या शरीरावर होणार्‍या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.
 • जनावराच्या शरीरात तयार होणारी उर्जा हि जनावर बाहेर टाकत असते परंतु अशा वेळेस बाहेरील तपमान वाढल्याने उर्जा बाहेर टाकणे जिकरीचे होते व त्यातच बाहेरील उर्जेचा अधिक भार वाढल्याने जनावरांच्या उर्जा निस्सारण यंत्रणेवर याचा परिणाम होतो.
 • जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो, त्यामुळे जनावराचे उत्पादन, आरोग्य, आहार व प्रजनन यावर विपरीत परिणाम होतो.   
 • शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रण करण्यासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते, जनावराची आहार कमी होऊन तहान-भूक मंद होते.
 • जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वताची यंत्रणा वापरण्यास सुरवात करते यामध्ये  श्‍वासोच्छवासाचा दर वाढून धाप लागल्या सारखे करते. तोंडाने श्‍वासोच्छवास करते. श्‍वासोच्छवास उथळ व जास्त वेगाने होतो तसेच नाडीचा वेग वाढतो.
 • जनावर स्वत: तापमान नियंत्रण करण्यापलीकडे जाऊन नंतर जनावराचे शरीराचे तापमान 104 ते 106 ओ फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
 • जनावरांचे डोळे, लालसर होवून डोळयातून पाणी गळते.
 • जनावरांना पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते.
 • जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.
 • जनावारे बसून घेतात.
 • गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.
 • आपण जर उन्हाळ्याचे नियोजन चांगले केले तर आपल्या जनावरांवर असा विपरीत परिणाम होणार नाही.


का महत्वाचे आहे ?

आपल्याकडील देशी जनावरांमध्ये वातावरणातील बदल सहन करण्याची जास्त ताकद असते तीच ताकद संकरित जनावरांमध्ये कमी असते तर विदेशी जातीत फारच कमी असते. अशी जनावरे वातावरणातील तापमान वाढल्यानंतर त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान त्यांच्या शरीराचे तापमान योग्य त्या प्रमाणात ठेवण्यास अडचणी निर्माण होतात. व त्याचा परिणाम जनावराच्या दुध उत्पादनावर व त्याच्या आरोग्यावर होताना आपणास दिसतो. यामुळे होणारे परिणाम प्रामुख्याने

 • जनावराची उर्जेची गरज वाढते: आपणास माहित आहे कि गाई तिच्याकडे असणार्‍या उर्जेचा वापर दुध उत्पादन, वासराची वाढ यासाठी वापरली जाते याबरोबरच आपल्या गाईचे चालणे, श्‍वास घेणे, खाणे इत्यादीसाठी सुद्धा उर्जेची गरज असते. अशा वेळेस जर बाहेरील वातावरणात बदल झाला तर जो जनावरावर ताण येतो त्यावर मात करण्यासाठी जनावराला उर्जेची गरज असते.
 • जनावराचे दुध उत्पादन कमी होते. ज्यावेळेस तापमान 35 अंश डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त जाते अशा वेळेस दुध उत्पादनात 30 % पर्यंत घट येऊ शकते आणि जेव्हा हेच तापमान 40% पेक्षा जास्त जाते त्यावेळेस दुध उत्पादनमध्ये 50% पर्यंत घट होऊ शकते आणि योग्य काळजी न घेतल्यास हि घट वाढत जाते.
 • उष्णतेच्या वाढीचा परिणाम हा वासरांच्या व कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो.
 • दुधाच्या घटकांमध्ये बदल होतो जसे कि जनावराचे दुधातील स्निग्धांश व प्रथिनाचे प्रमाण कमी होते.
 • जनावरांचा आहार कमी होतो.
 • प्रजनन यंत्रणेवर परिणाम होते. उष्णतेची ताण असणारी गाय माजावर येत नाही व गाभण सुद्धा राहण्यास अडचणीची ठरते.
 • गाभण गाईंना उष्णतेचा ताण बसल्यास त्यांचे गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते.
 • ताण सहन करण्यासाठी व उष्णतेचे निस्सारण करण्यासाठी जनावर धापा टाकते.
 • जनावराच्या पोटातील हालचाली मंदावतात व संपुर्ण पचनक्रिया बाधित होते.
 • जनावराच्या शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे जनावराला आम्ल पित्ताचा त्रास होऊन पातळ जुलाब होऊ शकतात.
 • जनावराच्या कासेच्या आरोग्यावर परिणाम होतो.
 • दुध उत्पादन नियंत्रित करणार्‍या हार्मोन्स वर परिणाम होतो.
 • या कलावधीत जनावरांच्या खुरांचे आजार तसेच लंगडेपणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आस्ते.

कसे कराल संरक्षण ?

वरील सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपणास माहीत आहे कि उन्हाचा गाईच्या आरोग्यावर, उत्पादनावर, आरोग्यावर व प्रजननावर कसा परिणाम होतो. यासाठी आता आपणास माहित आहे कि उन्हाळा चालू झाला असून या कलावधीत आपल्या पशुधनाचे आपण संरक्षण करून त्यांच्याकडून कसे आपणास जास्तीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे ते महत्वाचे आहे. यासाठी अशा अडचणी वर मात करण्यासाठी आपण काही बदल करणे आवश्यक आहेत. यामध्ये दोन पद्धती महत्वाच्या असून एक म्हणजे गाईच्या वातावरणात बदल करणे व दुसरे गाईच्या आहारात बदल करणे.


गोठा: 

 1. जनावरांना उन्हात उभे न करता त्यांना जास्तीत जास्त सावली पुरविणे आवश्यक आहे.
 2. आपल्या जनावरांना आपण अशा उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना प्रथम प्रत्यक्ष सूर्याच्या संपर्कातून वाचविण्यासाठी हवेशीर गोठ्यात ठेवणे आवश्यक आहे.
 3. उन्हाळ्यात जनावरांना बसण्या-उठण्यासाठी सरासरी पेक्षा जास्त जागा देणे आवश्यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी असल्यास उष्णतेचे निस्सारण होण्यास वेळ लागतो.
 4. गोठ्याचे आजूबाजूने झाडे लावावीत जेणे करून वातावरण थंड राहील.
 5. आपला गोठा हवेशीर असावा, गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.
 6. गोठा करताना त्याच्या छताची उंची जास्त असावी.
 7. छताच्या पत्र्याला जर वरून पांढरा रंग दिला तर उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांना उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो.
 8. उन्हाळ्याच्या कालावधीत छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
 9. आपल्या गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत.
 10. उन्हाळ्याच्या कालावधीत छतावर पाण्याच्या स्पिंकलर्सद्वारे सुद्धा छतावरील तापमान नियंत्रित करता येईल.
 11. गाई थंड ठेवणे: आपल्या जनावरास आपण जास्तीत जास्त थंड या गरम वातावरणात ठेऊ शकतो याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये गाईच्या स्प्रिंकलर, फोगर्स किंवा इतर मार्गाने पाणी मारून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
 12. फोगर्स : यामध्ये पाण्याच्या थेंबाचे रुपांतर हे लहान कणांच्या स्वरूपात केल्याने ते गोठ्यात किंवा गाईच्या अंगावर चिकटतात व अश्या लहान कणांचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातील उर्जा वापरल्याने आपल्या गाईचे शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
 13. स्प्रिंकलर: यामध्ये पाण्याच्या कणांचा जनावराच्या केसांवर एक थर तयार होतो. अशा परीस्थितीत आपण जर पंखा लावला असेल किंवा खेळत्या हवेत अशा जल कणांमुळे गाईच्या शरीराला थंडावा मिळतो .
 14. गोठ्याचा भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा जेणे करून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल व आतील थंड हवा आतच राहील.
 15. जनावरांना जास्तीत जास्त वेळ पाणी पिण्यास उपलब्ध असेल याची दक्षता घ्यावी.
 16. आपण उपलब्ध केलेले पाणी हे उन्हाने गरम झालेले नसावे ते जास्तीत जास्त थंड असावे. त्यासाठी मुक्तसंचार गोठ्यात पाण्याच्या टाक्या या सिमेंटच्या असाव्यात किंवा स्टेनलेस स्टीलच्या असतील तर त्यांना बारदानाने ओले करू गुंडाळल्या नंतर पाणी थंड राहण्यास मदत होते.
 17. जनावरांना उन्हाळ्यातील आहाराचे व्यवस्थापन चांगले करणे फार महत्वाचे आहे.
 18. जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी म्हणजे ज्यावेळी उन्हाचा तडाखा नसेल अशा वेळेस द्यावा. कारण असा चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.
 19. या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांना आपली उर्जा खर्च करावी लागते तसेच जनावरांचा आहार सुद्धा कमी होतो यामुळे आपल्या जनावरास अतिरीक्त उर्जा या कालावधीत जास्त पुरविणे गरजेचे आहे.
 20. या कालावधीत ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाणे दिले गेले पाहिजे.
 21. आपण कायम आपले व्यवस्थापन करत असताना आपल्या जनावरातील ताण कायम कमी राहील याची काळजी घेतली पाहिजे.

लेखक: 
डॉ. शांताराम गायकवाड 

(सहाय्यक महाव्यवस्थापक) 
दुग्धव्यवसाय विकास विभाग 
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा
९८८१६६८०९९

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters