Animal Husbandry

रवंथ करणाऱ्या प्राण्यात पोटाचे विकार जास्त प्रमाणात आढळून येतात. यामध्ये पोटफुगी, पोट गच्च होणे, अपचन हे नेहमी होणारे विकार आहेत. हे विकार चाऱ्यातील बदलामुळे होतात आणि प्राथमिक अवस्थेत ओळखल्यास उपचारामुळे बरे होतात. काही वेळेस चाऱ्यामध्ये टाचणी, सुई, दाभण, तार इ. धारदार वस्तू जातात. वस्तू धारदार असल्यास पोट व छातीमधील पडद्याला छेदून हृदयाला इजा करते. हा धोका लक्षात घेऊन वेळीच पशुतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत.

Updated on 07 November, 2019 5:24 PM IST


रवंथ करणाऱ्या प्राण्यात पोटाचे विकार जास्त प्रमाणात आढळून येतात. यामध्ये पोटफुगी, पोट गच्च होणे, अपचन हे नेहमी होणारे विकार आहेत. हे विकार चाऱ्यातील बदलामुळे होतात आणि प्राथमिक अवस्थेत ओळखल्यास उपचारामुळे बरे होतात. काही वेळेस चाऱ्यामध्ये टाचणी, सुई, दाभण, तार इ. धारदार वस्तू जातात. वस्तू धारदार असल्यास पोट व छातीमधील पडद्याला छेदून हृदयाला इजा करते. हा धोका लक्षात घेऊन वेळीच पशुतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत.

रवंथ करणाऱ्या प्राण्याच्या पोटाचे चार कप्पे असतात. जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर हा चारा रूमेन नावाच्या कप्प्यात जातो. जनावरांच्या पोटाची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे पोटांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. रवंथ करणारी जनावरे समोर दिसेल तेवढा चारा खातात आणि नंतर सावकाश रवंथ करतात. काही जनावरे कचऱ्याच्या ढिगावर, उकिरड्यावर मिळेल त्या गोष्टी खाताना दिसतात, परंतु त्यांच्याकडे नकळतच सर्वांचे दुर्लक्ष होते. जनावरांना मिळेल तेवढा चारा खाण्याची सवय, कोणता चारा खावा आणि कोणता खाऊ नये याची निवड करता येत नसल्यामुळे नकळत त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू म्हणजेच पॉलिथिन, कपडा, टायर ट्यूब, चप्पल, माती, वाळू हे पदार्थ जातात.

वरील गोष्टींचा परिणाम दीर्घकाळ त्यांच्या पचनक्रियेवर होतो, त्यामुळे जनावर कमी दूध देते, चारा कमी खाते. निकृष्ट दर्जाचा चारा खाल्ल्यास लवकर माजावर येत नाही, जनावर गाभण राहिल्यास वासराची वाढ व्यवस्थित होत नाही, तसेच जनावरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. काही वेळेस चाऱ्यामध्ये टाचणी, सुई, दाभण, तार इ. धारदार वस्तू जातात. वस्तू धारदार असल्यास पोट व छातीमधील पडद्याला (डायफ्रॅग्म) छेदून हृदयाला इजा करते. परिणामी, जनावराचा मृत्यू होऊ शकतो. धारदार वस्तूंमुळे हृदय, फुफ्फुस, पोटाचा पडदा निकामी झाल्यास महागडा औषधोपचार करूनही प्रतिसाद मिळत नाही. याउलट शेळ्या-मेंढ्या निवडक चारा खातात, त्यांच्या चारा खाण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू क्वचितच जातात.

या कारणाने जातात जनावरांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू..

  • दुधाळ जनावरे प्रसूतीनंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्याकरिता मिळेल तो चारा खातात, त्यामुळे त्यांच्या पोटात चुकून सुई, तार जाऊ शकते. 
  • चारा वाया जाऊ नये, चारा व्यवस्थित खाता यावा आणि दुधाळ गाई-म्हशींचे दूध वाढावे या उद्देशाने पशुपालक चारा कापण्याच्या कटरने किंवा मशिनने चारा कापतात. मशिनमधून चाऱ्यासोबत आलेले बारीक वायरचे तुकडे, कुंपणाच्या तारांचे तुकडे जनावरांच्या पोटात जातात. यामुळे त्यांची पचनक्रिया काही प्रमाणात मंदावते. 
  • जमिनीवरून चारा गोळा करून तसाच जनावरास टाकला जातो, त्यामध्ये खिळा, वायर जाण्याची शक्यता असते. 
  • शेतात किंवा आखाड्यावर ठेवलेले जुने गाडीचे टायर कालांतराने कुजून त्यातील अडकलेले खिळे गळून पडतात आणि चाऱ्यात मिसळू शकतात.
  • शरीरात क्षार व खनिजाची कमतरता असल्यास लहान वासरे, मोठी जनावरे माती खातात किंवा गोठ्यातील भिंती चाटतात. 
  • कचऱ्याच्या पॉलिथिनमधील हिरव्या पालेभाज्यांचे देठ, भाकरीचे तुकडे खाताना जनावर पॉलिथिन खाते. 
  • जनावरास जास्त काळ उपाशी ठेवल्यास दिसेल तो चारा खाते.


आजारी जनावरांची लक्षणे..

  • वस्तू धारदार असल्यास जनावर रवंथ करताना पोटाच्या हालचालींमुळे पोट आणि छातीतील पडदा छेदून वस्तू हृदयाकडे जाते आणि जनावराचा मृत्यू होऊ शकतो.
  • खडे, माती, वाळू पोटाच्या खालच्या भागात जाऊन बसतात आणि जनावरांची रवंथ करण्याची क्रिया कमी होते, त्याचा जनावरांच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. धारदार वस्तू पोटात गेल्यावर जनावरे लवकर लक्षणे दाखवतात. वस्तूचा प्रकार आणि तिची पोटातील दिशा यावर लक्षणे अवलंबून असतात.
  • सुरवातीला जनावरांचे चारा खाणे पूर्ण बंद होते. दूध उत्पादनात अचानक तीनपट घट येते. जनावरास उठायला-बसायला त्रास होतो. 
  • औषधोपचार करूनही वारंवार पोट फुगूनच राहते. पोट दुखल्यामुळे जनावर पोटाकडे पाहते, दात खाते, जनावर पाठ ताणते. 
  • जास्त वेळ उभे टाकते आणि बसताना पोटात वस्तू टोचल्यामुळे त्रास झाल्यास एकदम अंग टाकून देते.
  • शेण कमी प्रमाणात आणि घट्ट टाकते. शेण टाकताना आणि लघवी करताना त्रास होऊ शकतो.
  • फुफ्फुसाला इजा झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, श्वासाची गती वाढते.

अशी घ्या काळजी.. 

  • जनावर शेतात चरावयास सोडल्यास ते टायर ट्यूब, कपडा, पॉलिथिन खाणार नाही याकडे लक्ष ठेवावे. 
  • जनावरास गावात भटकू देऊ नये. 
  • दुधाळ जनावरांच्या खुराकात नियमित क्षार मिश्रणे मिसळावीत. 
  • गोठ्यात खनिज मिश्रणाच्या विटा जनावरास चाटता येतील, त्याप्रमाणे त्या टांगत्या ठेवाव्यात.
  • जनावरांचा चारा कापताना कटरमध्ये वायरचे किंवा तारांचे तुकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.  
  • जनावरास नियमित जंतनाशके पाजावीत. 
  • जनावरास पाणी देताना त्यात थोडेसे मीठ टाकावे. 
  • कुठलाही औषधोपचार करण्याअगोदर पशुवैद्याचा सल्ला घ्यावा.

लेखक:
डॉ. गणेश यु. काळुसे (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)
डॉ. सी. पी. जायभाये (कार्यक्रम समन्वयक)
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.

English Summary: Livestock Digestive disorders, symptoms and care
Published on: 07 November 2019, 05:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)