महाराष्ट्रामधील वातावरणात शेळीपालनासाठी उपयुक्त अश्या शेळ्यांच्या जाती पाहूयात.
उस्मानाबादी शेळी:-
उस्मानाबादी शेळी ही मूळची महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, तुळजापूर आणि उदगीर तालुक्यांमधील आहे.उस्मानाबादी शेळी मांस आणि दूध यांच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहे. प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी वाढवल्या जातात. ही शेळीची जात रंगाने संपूर्ण काळी असते.कान मागील बाजूस पडलेले दिसतात. शिंगे मागील बाजूस झुकलेली असतात. पूर्ण वाढ झालेल्या शेळीची उंची 65-70 सेमी इतकी असू शकते. लांबी साधारण 60-65 सेमी इतकी असते.नवजात करडांचे वजन किमान 2.5 किलो असते. पूर्ण वाढ झालेली शेळी 30-35 किलो इतक्या वजनाची असते.जन्मापासून 7-8 महिन्यात शेळी प्रौढ बनते. या जातीचा गाभण काळ 8-9 महिन्यांचा पूर्ण होतो. नर-मादी जन्म गुन्नोत्तर 1:1 असे आहे.
संगमनेरी शेळी:-
नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या अर्ध -शुष्क प्रदेशात संगमनेरी शेळी जातीचे मूळ अधिवास आहे.या जातीचे नाव अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यावरून पडले आहे. ही प्रजात मध्यम मध्यम आकाराची तसेच शेळीचा रंग पूर्णपणे पांढरा असतो काही वेळेस साधारण काळपट तपकिरी रंगाचे शेड्स अंगावर दिसतात पण मूळ रंग हा पांढरा असतो. कान लांबट व खाली पडल्यासारखे असतात. नर आणखी मादी दोघांची शिंगे मागच्या आणि वरच्या दिशेने झुकलेली असतात. दुधाचे सरासरी उत्पादन 0.5 ते 1.0 किलो दरम्यान बदलते दूध देण्याचा कालावधी सुमारे 160 दिवस असतो. ही जात प्रामुख्याने मांसासाठी पाळली जात असली तरी ही जात दुधाची चांगली क्षमता दर्शवतात.
सुरती शेळी(खानदेशी):-
सुरती शेळ्या भारतामध्ये दुधासाठी खूप प्रसिध्द जात आहे. ह्या जातीच्या शेळ्या जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे दुध देतात त्यामुळे चांगला फायदा होतो. हि शेळ्यांची जात मुळची गुजरात मधून येणारी जात आहे.जा जातीस खानदेशी शेळी या नावाने सुद्धा ओळखले जाते. या प्रकारामध्ये मादा शेळ्या ह्या नर शेळ्यांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. सुरती शेळ्या ह्या शक्यतो पांढऱ्या रंगाच्या असतात.पण संगमनेरी शेळ्यांपेक्ष्या उजळ दिसतात.
कोकण कन्याळ:-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के आहे.
एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे २५ किलो आणि मादीचे २१ किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी ५० किलो, तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते. ही शेळी ११ व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यांत पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. दोन वेतातील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. दुधाचा कालावधी ९७ दिवसांचा आहे. भाकड काळ हा ८४ दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
-IPM SCHOOL
Published on: 20 October 2021, 08:18 IST